कोरोनाच्या विरोधातील लस घेणे ऐच्छिक ! – केंद्र सरकार

नवी देहली – कोरोनाच्या विरोधातील लस घेणे ऐच्छिक आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले की,

१. एखाद्याला पूर्वी कोरोनाची लागण झाली असेल किंवा नसेल, तरीही लसीची पूर्ण मात्रा घेणे आवश्यक आहे, तरच विषाणूच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होईल. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी आवश्यक त्या अँटिबॉडीज निर्माण होतात. २८ दिवसांच्या अंतराने २ डोस घ्यायचे आहेत.

२. इतर लसींप्रमाणे या लसीचेसी काही दुष्परिणाम (साइड इफेक्ट) आहेत. काहींना ही लस घेतल्यानंतर हलका ताप, वेदना होऊ शकतात. याविषयी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा सर्व रुग्णांनी ही लस घ्यायची आहे. या गटातील लोक संवेदनशील प्रकारांत येत असल्याने त्यांनी लस घेणे आवश्यक आहे.

३. सरकारने लसीची उपलब्धता ध्यानात घेऊन प्राधान्याने लसीकरण करायच्या व्यक्तींचे गट बनवले आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य आणि कोरोना सेवेत आघाडीवर काम करणारे, तसेच ५० हून अधिक वयोगटातील लोकांचे लसीकरण केले जाईल. संबंधित व्यक्तींना नोंदणीकृत भ्रमणभाष क्रमांकावर लसीकरणाचे ठिकाण आणि वेळ यांविषयी  कळवले जाईल.

४. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर लसीकरणाविषयीची माहिती संबंधित व्यक्तीला भ्रमणभाषवर लघुसंदेश पाठवून कळवली जाईल. वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड, बँक अथवा पोस्टाचे पासबूक, पारपत्र, नोकरीतील ओळखपत्र आणि मतदार ओळखपत्र यापैंकी एक कागदपत्र नोंदणीसाठी आवश्यक आहे. लसीकरण झाल्यानंतरही संबंधित व्यक्तीला लघुसंदेश पाठवून कळवले जाईल. दोन्ही डोस दिल्यानंतर ‘क्यूआर कोड’ असलेले प्रमाणपत्र भ्रमणभाषवर पाठवले जाईल.

५. लसीकरण झाल्यानंतर किमान अर्धा घंटा केंद्रावर थांबावे. लस घेतल्यानंतर त्रास झाला तर तातडीने आरोग्य अधिकारी किंवा आशासेविका यांना माहिती देणे आवश्यक आहे.