किल्ल्याला अतिक्रमणांचा विळखा
छत्रपती शिवरायांच्या शौर्य आणि अस्मिता यांचे प्रतीक असलेल्या किल्ल्यांची अशी दुरवस्था होणे दुर्दैवी आहे. त्यासाठी शासन आणि पुरातत्व विभाग यांनी नुसते आदेश देऊन न थांबता कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे !
जुन्नर – मानवाच्या अतिक्रमणामुळे पश्चिम घाट धोक्यात आल्याची चेतावणी ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन्) संस्थेने नुकतीच भारताला दिली आहे. ‘आउटलूक ३’ या अहवालात संस्थेने हे वास्तव मांडले आहे. पश्चिम घाटातील सह्याद्रीचा भाग असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी प्लॉट पाडून घरबांधणी करणे, तसेच पत्र्याच्या शेडमधून दुकाने थाटण्याचे काम चालू असल्यामुळे शिवनेरी किल्ल्याच्या परिसरातील वनसंपदा धोक्यात आली आहे.
१. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने शिवनेरीच्या पायथ्यालगत ३०० मीटरच्या अंतरात बांधकामे करता येणार नसल्याचे आदेश दिले होते.
तसेच २०१४ मध्ये शिवनेरी परिसराचे नैसर्गिक सौंदर्य बिघडू नये, यासाठी हा परिसर ‘हरित पट्टा’ म्हणून घोषित करण्याचे धोरण केंद्रीय पुरातत्व विभागाने निश्चित केले.
२. पायथ्यापासून काही मीटर अंतरातील बांधकामे प्रतिबंधित करण्यात आली होती; मात्र निर्बंध डावलून बांधकामे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
३. हा परिसर हरित पट्टा म्हणून जाहीर करण्याची मागणी १५ वर्षांपासून केली जात आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
४. ‘राष्ट्रीय स्मारक असलेल्या शिवनेरी किल्ल्याला अतिक्रमणांचा विळखा पडू नये, याचे दायित्व राज्य सरकारचे आहे’, असे विधान जुन्नरचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काजळे यांनी केले.