मराठा आरक्षणाविषयीची सरकारची भूमिका पालटलेली नाही ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – काही समाजविघातक शक्ती मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून समाजात आग लावण्याचे काम करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देतांना अन्य समाजाचे आरक्षण काढण्यात येणार नाही, हे मी मुख्यमंत्री म्हणून सांगत आहे. मराठा आरक्षणाविषयी आधीच्या शासनाने जे अधिवक्ते नियुक्त केले होते, त्यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. आमची भूमिकाही पालटलेली नाही. वेळोवेळी संघटनांसमवेत चर्चा चालू आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वानुमते लढाई लढत आहोत, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केलेल्या भाषणात केले.

ते पुढे म्हणाले…

१. कोरोनाच्या कालावधीत राज्यशासनाने केलेल्या कामाची नोंद जागतिक आरोग्य संघटना आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राने घेतली; मात्र हे विरोधी पक्षाला दिसले नाही.

२. पाश्‍चिमात्य देशात कोरोनाने उसळी मारली आहे, तशी परिस्थिती येथे निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. त्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात आली. अशी मोहीम राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे.

३. मेट्रो प्रकल्प आरे येथून कांजूरमार्ग येथे स्थलांतरीत केल्याचे लाभ भविष्यात दिसून येतील. हा निर्णय राज्य आणि मुंबई यांच्या हिताचा आहे. ‘राज्याचे हित’ हे आमचे प्राधान्य आहे. विकास म्हणजे केवळ मेट्रो, रस्ते आणि मोठी रुग्णालये हे अपेक्षित नाही. केवळ विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही. अशा प्रकारे राज्याला मातीत घालणारे राजकारण थांबवायला हवे.

४. आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणे, हे आपल्या संस्कृतीमध्ये बसते का ?

५. ‘शासनावर टीका करणार्‍यांना कारागृहात टाकले जाते’, असे म्हणता, तर प्रताप सरदेसाई आणि त्यांचा मुलगा यांचे अंमलबजावणी संचालनालयाकडून होत असलेले अन्वेषण, असे विकृत राजकारण आम्ही करत नाही. अंमलबजावणी संचालनालयाला घरातील नोकराप्रमाणे वागवून आमच्यावर टीका करायची, हे आम्हाला मान्य नाही.