वन्य प्राण्यांच्या घटना हाताळण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षणही द्यायला हवे !

पुणे – येथे रानगव्याची घटना नुकतीच घडली. त्याच्याप्रमाणेच वाट चुकल्याने शहरात येणार्‍या वन्य प्राण्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन वन विभागाच्या वतीने पोलिसांसह नियमित बैठकांसह संबंधित पोलिसांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्याचा प्रस्ताव सिद्ध करण्यात आला आहे. वन्य प्राण्यांच्या प्रकारानुसार त्याला कसे हाताळावे, यात पोलिसांसह जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका यांच्या सहभागाविषयी वन विभागाने काही वर्षांपूर्वीच सविस्तर नियमावली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स) सिद्ध केली होती. त्याच्या कार्यवाहीसाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे.

यापुढे वन्य प्राणी शहरात आल्यास ‘तातडीने त्या भागात जमावबंदी करावी’, असे पत्रही वन विभागाच्या वतीने पोलिसांना देण्यात येणार आहे. ‘रेस्क्यू ऑपरेशन’मधील पोलिसांची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे. त्यामुळे गृह खात्याला पत्र पाठवून राज्यातील सर्वच वरिष्ठ पोलिसांना वन विभागाने ‘एस्.ओ.पी.’ पाठवण्याची आवश्यकता आहे. ‘वन्य प्राण्यांच्या घटना हाताळण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षणही द्यायला हवे’, अशी मागणी राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे केली आहे, असे राज्य वन्य जीव मंडळाचे सदस्य अनुज खरे यांनी सांगितले.

वन्य प्राणी मनुष्यवस्तीत येण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता यापुढे वनाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यातील नियमित संवाद वाढण्याची आवश्यकता आहे. या दोघांमध्ये योग्य समन्वय राहिल्यास घटनेची तीव्रता अल्प करणे शक्य आहे, असे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) सुनील लिमये यांनी सांगितले.