पणजी, ९ डिसेंबर (वार्ता.) – १२ डिसेंबर या दिवशी होणार्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी कोरोनाबाधित रुग्णांना दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘पीपीई किट’ घालून मतदान करावे लागणार आहे. शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जि.पं. निवडणुकीसाठी नियमावली ९ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध केली आहे.
या नियमावलीत म्हटले आहे की, प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक मतदाराच्या शरिराचे तापमान (थर्मल स्कॅनिंग) तपासले जाणार आहे. मतदान केंद्रात २ मतदारांमध्ये २ मीटर अंतर रहावे, यासाठी आवश्यक खुणा करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रात ठराविक संख्येनेच मतदारांना प्रवेश दिला जाणार आहे. मतदान केंद्राबाहेर ‘हँड सॅनिटायझर’ उपलब्ध करण्यात येणार आहे. मतदान केंद्राची उभारणी करण्यापूर्वी मतदानासाठी वापरात येणारी सर्व उपकरणे किंवा साहित्य ‘सॅनिटाईझ’ केले जाणार आहे. मतदार केंद्रातील कर्मचार्यांना हातमोज दिले जाणार आहेत. तोंडाला मास्क घालणे सर्वांना बंधनकारक असणार आहे. मतदान केंद्रात एखाद्या मतदाराचे शरिराचे तापमान अधिक असल्याचे आढळल्यास त्याला १० मिनिटे केंद्रात बसायला सांगण्यात येईल आणि त्यानंतर त्याच्या शरिराचे पुन्हा तापमान मोजून ते अधिक असल्यास त्याला नियमानुसार सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मतदान करण्यासाठी येण्यास सांगण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर येणार्या कोरोनाबाधित रुग्णांना त्यांचे ओळखपत्र संबंधितांना दाखवावे लागेल.
जिल्हा पंचायतीची १५ ठिकाणी होणार मतमोजणी
पणजी – जिल्हा पंचायतीची एकूण १५ ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. यामधील ९ मतमोजणी केंद्रे दक्षिण गोव्यात, तर उर्वरित ६ मतदान केंद्रे उत्तर गोव्यात असतील. मतमोजणीला १४ डिसेंबरला सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने १२ डिसेंबरला सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. सरकारी आणि खासगी आस्थापनांसाठी ही सार्वजनिक सुटी असेल.
राज्यातील सर्व मद्यविक्री केंद्रे ११ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून १२ डिसेंबर या दिवशी मध्यरात्रीपर्यंत, तसेच १३ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून १४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंद रहाणार आहेत. या अनुषंगाने शासनाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.