प.पू. भक्तराज महाराज रचित भजने ऐकतांना अनुभवलेली भावावस्था आणि रात्री नामजप होत असल्याने मिळत असलेला आनंद

कार्तिक कृष्ण पक्ष नवमी (९.१२.२०२०) या दिवशी असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाण उत्सवाच्या निमित्ताने…

१. प.पू. भक्तराज महाराज रचित भजने ऐकतांना आणि सनातनच्या आश्रमाविषयी बोलतांना भाव जागृत होणे

‘मी चारचाकीने प्रवास करत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांची भजने चालू केल्यावर माझी पुष्कळ भावजागृती होते. माझ्या डोळ्यांतून सतत अश्रू येतात. एरव्ही दिवसभर घरात काम करतांना असे होत नाही. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) आणि सनातनचे आश्रम यांच्याविषयी काही बोलणे होत असतांना माझा भाव जागृत होतो. मी अन्य वेळी दिवस-रात्र अखंड नामस्मरण करते.

श्रीमती शुभा राव

२. वयोमानाप्रमाणे रात्री झोप न्यून होणे आणि त्या वेळेत नामजप केल्यावर आनंद मिळणे

पूर्वी रात्री झोप येत नाही; म्हणून मला त्रास वाटायचा; परंतु आता ‘पुष्कळ चांगले झाले’, असे मला वाटते. मला रात्री झोप लागली नाही, तरी माझा नामजप चांगला होतो. सकाळी उठल्यावर मी ‘झोप येत नाही’, हा विचारच करत नाही. त्यामुळे माझी रात्र चांगली गेल्यावर दिवसही चांगला जातो. मला नामस्मरण केल्यामुळे चांगले वाटते. मला थोडा वेळ झोप लागली, तरी पुरेसे होते. वयोमानानुसार माझी झोप न्यून झाली आहे; पण माझे रात्री नामस्मरण चांगले होऊन दिवसही चांगला जातो आणि मानसिक त्रासही होत नाही.’

आलेल्या अनुभूती

१. भजने ऐकतांना प्रत्येक वेळी वेगळा अर्थ असल्याचे वाटून पुष्कळ आनंद मिळणे

‘प.पू. भक्तराज महाराज रचित भजने ऐकतांना प्रत्येक वेळी मला भजनात वेगवेगळा अर्थ असल्याचे जाणवते. तेव्हा मला नवल वाटते आणि ‘प.पू. भक्तराज महाराज यांना ही भजने कशी सुचली असतील ?’, असा विचार माझ्या मनात येतो. मी सतत ती भजने ऐकत असते. मला इतर कोणतीही गाणी ऐकायला आवडत नाहीत. ‘ती रडगाणी ऐकण्यापेक्षा नामस्मरण करत भजने ऐकूया’, असे वाटते. ही भजने मी सतत कितीही वेळ ऐकत राहिले, तरी मला कंटाळा न येता आनंद मिळतो.’

२. भ्रमणभाषवर मोठ्या आवाजात नामजप लावल्याने इतरांचाही नामजप होणे

माझ्या घरी भ्रमणभाषवर ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप मोठ्या आवाजात लावलेला असतो. त्यामुळे आमच्याकडे घरकामाला येणार्‍या बायकाही तो नामजप करतच त्यांची कामे करतात. भ्रमणभाषवर नामजप लावल्यानेे प्रत्येकाचा नामजप चालू रहातोे.’

– श्रीमती शुभा राव (प.पू. भक्तराज महाराज यांनी ठेवलेले नाव) (श्रीमती स्मिता राव), पणजी, गोवा. (११.७.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक