रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘महासुदर्शन यागा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

‘२३ ते २५.१०.२०१९ या कालावधीत रामनाथी आश्रमात महासुदर्शन याग झाला. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. यागाच्या पहिल्या दिवशी वातावरणात पुष्कळ दाब जाणवणे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते गणपतीचे पूजन झाल्यावर वातावरणातील दाब न्यून होणे

​महासुदर्शन यागाच्या पहिल्या दिवशी वातावरणात पुष्कळ दाब जाणवत होता. यागाची सिद्धता होत होती; पण नेहमीपेक्षा गती पुष्कळ अल्प होती. यागाच्या आरंभी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते गणपतीचे पूजन झाले. त्यानंतर वातावरणातील दाब न्यून झाला आणि यज्ञसेवेला गती मिळाली. सुदर्शन देवतेसाठी हवन करतांना ‘वातावरण सूक्ष्म युद्धजन्य झाले आहे’, असे मला वाटत होते.

कु. ईशान जोशी

२. याग चालू असतांना मंत्रांतून अधिक प्रमाणात चैतन्यशक्ती प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे आणि सुदर्शनदेवतेच्या समवेत नृसिंहाचेही उग्र रूपात दर्शन होणे

​दुसर्‍या दिवशी वातावरण आरंभी थोडे शांत आणि नंतर पुन्हा सूक्ष्मातील युद्ध चालू असल्याप्रमाणे वाटत होते. याग चालू असतांना मंत्रांतून अधिक प्रमाणात चैतन्यशक्ती प्रक्षेपित होत असल्याचे जाणवत होते. काही वेळा मला सुदर्शनचक्राचे (देवतेचे) दर्शन होत होते. ते चक्र सुवर्णाचे आणि पुष्कळ मोठे होते. त्यामुळे चक्राचे केवळ आरेच दिसत होते. सुदर्शनदेवतेच्या समवेत नृसिंहाचेही उग्र रूपात दर्शन झाले.

३. यज्ञाच्या ज्वाळांमधून सुदर्शनदेवतेच्या समवेत गरुड देवतेचेही दर्शन होणे

दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी यज्ञाच्या ज्वाळांमधून सुदर्शनदेवतेच्या समवेत गरुड देवतेचेही दर्शन होत होते. नंतर सूक्ष्मातील जाणणार्‍या साधकांनी सर्व साधकांना सांगितले, ‘‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गरुड देवतेवर आरूढ होऊन यज्ञस्थळी आल्या आहेत.

४. डोळे मिटल्यावर आज्ञाचक्राच्या ठिकाणी बिल्वपत्र दिसणे आणि सुदर्शनचक्राचे महाकाय रूपात दर्शन होणे

तिसर्‍या दिवशी डोळे मिटल्यावर मला माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी बिल्वपत्र दिसत होते. मी याविषयी सूक्ष्म ज्ञान-प्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘भगवान शिवानेच श्रीविष्णूला सुदर्शनचक्र दिले आहे. त्यामुळे असे दिसले.’’ यज्ञ चालू असतांना सुदर्शनचक्राचे महाकाय रूपात दर्शन झाले. त्या चक्रातून असंख्य वेगवेगळी शस्त्रे निघतांना दिसत होती.’

– श्री. ईशान जोशी, सनातन पुरोहित पाठशाळा, रामनाथी, गोवा. (२४.४.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक