श्री. रामनारायण मिश्र हे नागपूर येथील हिंदुत्वनिष्ठ असून ते हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’, तसेच ‘मंदिर महासंघ शिबिर’, यांसारख्या विविध हिंदुत्वनिष्ठ कार्यक्रमांना उपस्थित असतात. त्यांना आलेली गुरुतत्त्वाची प्रचीती पुढे दिली आहे.

१. जीवनात गुरुतत्त्वाचा प्रवेश झाल्यापासून स्वतःत झालेले परिवर्तन

‘जेव्हापासून माझ्या जीवनात गुरुतत्त्वाचा प्रवेश झाला आहे, तेव्हापासून अनपेक्षितपणे माझ्या व्यक्तीमत्त्वामध्ये पुष्कळ परिवर्तन झाल्याचे मी अनुभवत आहे.
अ. माझ्या पूर्वजीवनातील दिनचर्येत शिस्तीचा अत्यंत अभाव होता; परंतु आता मी शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचे शिकून तसे करण्याचा प्रयत्न करत आहे.
आ. ‘माझे जीवन दोषरहित व्हावे’, यासाठी मी प्रयत्नशील असतो.
इ. माझ्यावर क्षणोक्षणी गुरूंच्या नामस्मरणाचा असा प्रभाव होत असतो की, जणू माझे संपूर्ण शरीर ऊर्जावान आणि पुष्कळ चैतन्याने भारित रहात असल्याचे मला जाणवते.
ई. माझ्या मनात जर कधी काही इच्छा जागृत झाली, तर मला असा विश्वास वाटतो की, ती इच्छा आज ना उद्या निश्चितच पूर्ण होणार; कारण गुरुकृपा असेल, तर अशक्य ते शक्य होऊ शकते.
२. रद्दीत देण्यासाठी काढलेल्या पाक्षिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून चकित होणे आणि तेव्हापासून ‘सनातन प्रभात’ रद्दीत न घालता संग्रही ठेवणे
मी सनातन संस्थेशी पुष्कळ आधीपासून जोडला गेलो होतो आणि हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चा वर्गणीदार झालो होतो. मी त्याचे नियमितपणे वाचन करत होतो. माझ्याकडे इतरही वर्तमानपत्रे येत होती. एकदा सर्व वर्तमानपत्रांचा पुष्कळ मोठा गठ्ठा जमा झाल्याने मी तो रद्दीत विकण्याचा निर्णय घेतला. रद्दी विकायला नेण्यापूर्वी एकाएकी माझी दृष्टी ‘सनातन प्रभात’च्या एका अंकाच्या मुखपृष्ठावर पडली आणि त्यावर मी प.पू. गुरुदेवांचा चेहरा पाहिला. त्यानंतर मी अत्यंत चकित झालो. माझ्या आश्चर्याला काही सीमाच राहिली नाही. खरेतर मी तेच वर्तमानपत्र नेहमी वाचत होतो; परंतु ते वाचतांना मला अशी कोणतीही अनुभूती आली नव्हती. त्या दिवशी मला तीव्रतेने वाटले, ‘सनातन प्रभात’चे अंक रद्दीत विकता कामा नये; म्हणून मी ‘सनातन प्रभात’च्या अंकांव्यतिरिक्त बाकी सर्व वर्तमानपत्रे विकून टाकली. तेव्हापासून आजपर्यंत ‘सनातन प्रभात’चा प्रत्येक अंक मी संग्रही ठेवत आलो आहे. कदाचित् हा प.पू. गुरुदेवांच्या कृपेचा परिणाम आहे. त्यांनीच मला अंक संग्रही ठेवण्याची प्रेरणा दिली. तोपर्यंत मला प.पू. गुरुदेवांचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते.
३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीनंतर क्रियाशीलता वाढणे आणि ‘ते सतत समवेत आहेत’, असे जाणवणे
हिंदु राष्ट्राचे प्रणेते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याशी माझी प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर मागील ३ वर्षांत माझी क्रियाशीलता अधिक प्रमाणात वाढली आहे. जेव्हा मला त्यांचा आत्मिक स्नेह प्राप्त झाला, त्या वेळी माझे संपूर्ण शरीर झंकारून उठले, रोमांचित झाले आणि ऊर्जेने ओतप्रोत भरले. तेव्हापासून ‘प्रत्येक क्षणी ते माझ्या समवेत आहेत’, अशी जाणीव मला होऊ लागली. तेव्हा ‘त्या दिवशी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या मुखपृष्ठावरील प.पू. गुरुदेवांचा चेहरा पाहिल्यानंतर मला ‘सनातन प्रभात’चा अंक विकणे योग्य का वाटले नाही ?’, याचा मला उलगडा झाला. कदाचित् गुरुजींनी त्या क्षणापासूनच मला आपल्या आश्रयाखाली घेतले होते.
४. अमरनाथ यात्रेमध्ये तीव्र आपत्कालीन स्थितीतही केवळ गुरुकृपेने शिवलिंगाचे दर्शन होऊ शकणे
मागील वर्षी मी पत्नीसह ‘पवित्र अमरनाथ यात्रे’ला गेलो होतो. आम्ही अमरनाथ गुहेजवळ पोचलो असता दुर्दैवाने तेथे भयंकर भूस्खलन झाले होते आणि जवळजवळ ७ दिवस मला पत्नीसह तेथे उभारलेल्या तात्पुरत्या तंबूमध्ये रहावे लागले. त्या ७ दिवसांच्या कालावधीत दिवसेंदिवस परिस्थिती बिघडतच चालली होती. पुष्कळ लोकांना काळाने गिळंकृत केले होते. प्रत्येक वेळी मला अप्रिय घटना होण्याचे भय वाटत होते. ‘केव्हा कोणती आपत्कालीन स्थिती निर्माण होईल ?’, हे सांगता येत नव्हते. अशा वेळी माझ्याकडे केवळ गुरूंच्या आधाराविना दुसरे काहीच नव्हते. मी गळ्यात गुरूंचे छायाचित्र असलेले पदक (‘लॉकेट’) घातलेले होते. मी नियमितपणे ते गळ्यात घालतो आणि त्या वेळी केवळ तेवढाच एकमात्र आधार शिल्लक होता. गळ्यातील पदकामुळे मला ‘प.पू. गुरुदेव माझ्या समवेत आहेत आणि त्यांच्यामुळे माझ्यावर कोणतेही संकट येणार नाही’, अशी जाणीव होत होती. अक्षरशः घडलेही तसेच ! मी सतत गुरुमंत्राचा जप करत होतो आणि माझ्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. माझ्या लक्षात आले की, संकटाचे मळभ दूर झाले आहे. त्यानंतर माझा देवदर्शनाचा मार्ग अत्यंत सुगम अन् सोपा झाला. मी कधी कल्पनाही केली नव्हती, अशा सर्व सुविधा मला उपलब्ध झाल्या आणि श्री भोलेनाथाच्या बर्फाळ शिवलिंगाचे दुर्लभ असे दर्शन मला अत्यंत सहजतेने झाले. मी छातीठोकपणे सांगतो की, हे केवळ आणि केवळ गुरुकृपेमुळेच शक्य झाले.
५. रामनाथी आश्रमात रहाण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होणे आणि तेथे प.पू. गुरुदेवांचे सान्निध्य सूक्ष्मातून अनुभवणे
मी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी गोवा येथे गेल्यावर मला प.पू. गुरुदेवांच्या दर्शनाचा लाभ होत असे. तेव्हा एक इच्छा माझ्या मनात बळावू लागली होती, ‘माझ्यावर गुरूंची कृपादृष्टी व्हावी आणि मला गुरूंच्या आश्रमात रहाण्याचे सौभाग्य प्राप्त व्हावे. मला गुरूंच्या निकट रहाता यावे आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूपाने गुरुकृपेचा आनंद घेता यावा.’ मी माझी ही इच्छा वेळोवेळी आश्रमातील काही साधकांसमोर व्यक्तही केली होती.
आता पहा माझ्या गुरुदेवांचा चमत्कार ! गोवा येथे जिल्हास्तरीय मंदिर महासंघाचे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. मला त्यामध्ये सहभागी होण्याचे परम सौभाग्य प्राप्त झाले आणि त्या कालावधीत रामनाथी आश्रमात रहायला मिळाले. त्या वेळी माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही; कारण अनेक वर्षांपासून माझ्या मनात असलेली इच्छा एवढ्या लवकर पूर्ण होईल, याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी तेथे जोपर्यंत राहिलो, तोपर्यंत प्रत्येक क्षणी मी प.पू. गुरुदेवांचे सान्निध्य सूक्ष्म रूपातून अनुभवले. मी नेहमी हे अनुभवत असतो की, ते सदैव माझ्या समवेत आहेत. त्यामुळे मला एकटेपणाची जाणीव मुळीच झाली नाही. प्रत्येक क्षणी मला वाटत होते, ‘प.पू. गुरुदेव मला हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दिशेने कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहेत.’ अशाच कितीतरी घटना माझ्या जीवनात अनपेक्षितपणे होत असतात आणि मला उद्देशपूर्ती करण्यासाठी निर्भीडतेने कार्य करण्याची प्रेरणा देत असतात.
‘गुरुतत्त्वाचे माझ्या जीवनात पदार्पण झाल्यामुळे माझे संपूर्ण व्यक्तीमत्त्वच परिवर्तित झाले आहे, उजळत चालले आहे’, हे एक प्रमाणित झालेले सत्य आहे. ते मी १०० टक्के अनुभवले आहे.
गुरुचरणी माझा साष्टांग दंडवत, नमन आणि भावपूर्ण वंदन !’
– श्री. रामनारायण मिश्र, नागपूर (६.१२.२०२४)
|