देवावर श्रद्धा आणि प्रेमभाव असणारे श्री. संदीप शिंदे अन् भावावस्थेत रहाणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड !

९.१२.२०२० या दिवशी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. संदीप शिंदे अन् ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड

चि. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांना शुभविवाहानिमत्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !


चि. संदीप शिंदे यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

श्री. संदीप शिंदे

प्रा. हेमंत शिंदे, गावठाण, पुणे.

१. मायेची ओढ अल्प असणे

‘साधनेचे महत्त्व समजल्यानंतर संदीपने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. त्याचा मोठा भाऊ सागर याने अनेक व्यावहारिक निर्णय घेतांना त्याच्यासाठी काही गोष्टी करण्याची सिद्धता दर्शवली. तेव्हा त्याने ते सर्व नम्रपणे नाकारले. तो ज्या आस्थापनात काम करत होता, तेथे तो आज उच्च पदावर पोचू शकला असता; परंतु या गोष्टींचा त्याग करून त्याने नेहमी सेवा आणि साधनेला प्राधान्य दिले. वर्षातून केवळ दोन वेळा घरी (पुणे येथे) आल्यानंतर तो ८ – १० दिवसांनी लगेच आश्रमात जातो.

२. देवावर श्रद्धा

आम्ही काही विषयांवर चर्चा करतांना ‘देव काळजी घेईल, देव योग्य ते करेल, देवाला सर्वांची काळजी आहे’, असे तो नेहमी सांगतो.

३. शांत आणि स्थिर

तो मुळातच शांत आणि स्थिर असून आता साधनेमुळे स्थिरता वाढल्याचे जाणवते. ‘सेवा करतांना किंवा अन्य वेळी त्याच्या मनाचा गोंधळ उडाला आहे’, असे कधीच जाणवले नाही.

४. आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे

दैनिकातील चौकटी, सूचना यांविषयी चर्चा करतांना तो मानसिक स्तरावर न सांगता नेहमी आध्यात्मिक स्तरावर सांगून साहाय्य करतो.

५. निरपेक्ष वृत्ती

कोणतेही सूत्र सांगताना तो आग्रही राहून किंवा ‘तसेच व्हायला हवे’, अशी अपेक्षा ठेवून सांगत नाही. साधना म्हणून सूत्र सांगून सोडून देतो.

६. आसक्ती नसणे

खाणे, पिणे आणि कपडे यांविषयी त्याला कसलीही आसक्ती नाही. तो नेहमी साधे कपडे वापरतो.

७. काटकसरी

आतापर्यंत त्याने नेहमीच अल्प दरातील सदरा आणि पायजमा, तसेच भ्रमणभाष खरेदी केला आहे. एकदा आम्ही एका उपाहारगृहात जेवल्यानंतर आवश्यकता नसतांना मी अन्य उपाहारगृहापेक्षा अधिक व्यय केल्याची जाणीव त्याने करून दिली.

८. सेवेची तळमळ

‘विवाह कुठे करायचा ?’, याविषयी ठरवतांना जर पुणे येथे विवाह करण्याचे निश्‍चित झाले, तर ‘लगेचच आश्रमात जाऊन सेवांचे नियोजन करून परत येता येईल’, याचा विचार तो करत होता. त्याने नेहमीच वैयक्तिक किंवा कौटुंबिक कामांपेक्षा सेवेला प्राधान्य दिले आहे.’

९. इतरांचा विचार करणे

आश्रमात त्याच्या परिचयाचे पुणे येथील साधक किंवा धर्माभिमानी आले की, तो सेवेची कितीही व्यस्तता असली, तरी सर्वांची आवर्जून भेट घेतो. आपत्काळाविषयी दैनिकात चौकट आल्यानंतर त्याने आम्हा साधक मित्रांना संपर्क करून ‘पूर्वसिद्धतेविषयी काय विचार केला आहे ? कसे प्रयत्न करणार आहात ?’, याविषयी विचारपूस केली.

श्री. अरविंद पानसरे, सनातन आश्रम, गोवा.

१. नम्रता

‘संदीप याच्यात नम्रता आणि विनयशीलता आहे. मी त्याला कधीही अधिकारवाणीने किंवा मोठेपणाने बोलतांना पाहिले नाही.

२. जवळीक साधणे

त्याची सर्वांशी चांगली जवळीक आहे. अगदी लहान मुले असो किंवा वयस्कर, सर्वांनाच त्याच्याशी बोलतांना निखळ आनंद मिळतो.

३. कोणताही विषय सहजतेने हाताळणे

संदीप कोणताही विषय शांतपणे आणि चांगल्या प्रकारे हाताळतो. त्याची विषय हाताळण्याची पद्धत पाहिल्यावर ती समस्या न रहाता उपाययोजना वाटते. काही वेळापूर्वीच आलेल्या प्रसंगावर किंवा समस्येवरही त्याचे खोल चिंतन होते.

४. सेवेची तळमळ

संदीपने एकदा सेवेला आरंभ केला की, उत्साहाने रात्री उशिरापर्यंत सेवा करू शकतो. ‘त्याला सेवा करतांना झोप आली’, असे कधी होत नाही. तो अगदी शेवटपर्यंत उत्साहाने आणि सतर्कपणे सेवा करतो. त्यामुळे त्याच्या सेवेत चुकांचे प्रमाण अल्प असते.

५. त्याच्या मनात सेवेविषयी नेहमी कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव असतो.’ (४.१२.२०२०)   


चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

चि.सौ.कां. स्वाती गायकवाड

कु. वृषाली कुंभार आणि मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. ‘स्वाती निरागस आणि निर्मळ आहे.

२. प्रेमभाव : स्वाती सर्वांशी फार प्रेमाने आणि नम्रतेने बोलते. एखाद्या प्रसंगात साधकाची काही चूक झाली असल्यासही ती त्या साधकांना प्रेमाने समजावून सांगते.

३. स्वाती छोट्या छोट्या प्रसंगांमध्येही इतरांना विचारून कृती करते.

४. अल्प अहं : एखादा प्रसंग झाल्यानंतर ती त्या प्रसंगांमध्ये अडकून रहात नाही. ती स्वतःकडे न्यूनपणा घेते. त्यामुळे तिला सर्वांशी सहजपणे जुळवून घेता येते.

५. स्थिर : स्वाती प्रत्येक प्रसंगामध्ये स्थिर रहाते. कितीही कठीण प्रसंग असला किंवा कितीही सेवा आल्या, तरी ती स्थिर राहून सेवा करते.’

श्री. अरविंद पानसरे, सनातन आश्रम, गोवा.

‘मी व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात आल्यावर श्री गुरुकृपेने मला स्वातीताई घेत असलेल्या काही भावसत्संगांना बसायला मिळाले. त्या वेळी मला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. तत्त्वनिष्ठ : ‘स्वातीताई साधकांना त्यांच्या चुका तत्त्वनिष्ठपणे सांगतात. त्या साधकाला चुका सांगतांना त्यांच्या तोंडवळ्यावरील हावभाव पालटत नाहीत.

२. स्वतःमधील भावामुळे इतरांना भावस्थितीत नेणे

२ अ. स्वातीताई भाववृद्धी सत्संगात प्रार्थना आणि भावप्रयोग घ्यायच्या. त्या भावस्थितीत मला सहजपणे जाता यायचे. त्यामुळे माझ्या मनाला आनंद मिळून माझा उत्साह वाढायचा. मला या अनुभूती ‘स्वातीताईंचा आध्यात्मिक स्तर आणि त्यांच्यामध्ये असलेला भाव यांमुळे येत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

२ आ. अनेकदा स्वयंसूचनांचे सत्र करायचे ठरवल्यावर मला ‘कुठली स्वयंसूचना घ्यायची ?’, हे आठवत नाही; मात्र स्वातीताईंनी ‘सतत भावस्थितीत रहाता यावे’, यासाठी भाववृद्धी सत्संगात एक स्वयंसूचना सांगितली. माझ्याकडून ती स्वयंसूचना उत्स्फूर्तपणे होऊ लागली. ४ वर्षे झाली, तरी ती स्वयंसूचना मला उत्स्फूर्तपणे आठवते अन् दिली जाते. त्यामुळे अन्य स्वयंसूचना देण्याचेही माझ्या लक्षात येते. स्वातीताईंनी भावस्थितीत रहाता येण्यासाठी आम्हाला सांगितलेली स्वयंसूचना येथे दिली आहे.

भावसूचना

‘प्रत्येक कृती भावाला जोडून भावपूर्ण केल्यावरच माझ्यातील ‘मी’चे, म्हणजे अहंचे प्रमाण न्यून होऊन माझा भाव वाढणार आहे. त्यामुळे मला ईश्‍वराचे अस्तित्व जाणवणार आहे’, हे लक्षात घेऊन मी प्रत्येक कृतीला भाव जोडून ती भावपूर्ण करीन.’

३. त्यांच्या मनात गुरुदेवांविषयी अपार भाव आहे. तो कवितांच्या माध्यमातून व्यक्त होतो. त्याचप्रमाणे कविता वाचणारे साधकही ते भावविश्‍व अनुभवतात.’

श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, गोवा.

१. ‘चि. स्वातीताई समयसूचकतेने विनोद करतात. त्यामुळे वातावरण हलके होते. त्यांच्यात प्रसंगानुरूप बाळकृष्णाप्रमाणे खट्याळपणा, तर संत आणि सद्गुरु यांच्याविषयी बोलतांना गोपीभाव जाणवतो.

२. साधकांना साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन अंतर्मुख करणे : ताई साधकांच्या व्यष्टी साधनेचे आढावे आणि स्वभावदोष-निर्मूलन सत्संग घेतात. या सत्संगांमध्ये त्या साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन साधकांना चुकांची जाणीव करून देतात अन् त्यांना अंतर्मुख करतात.

३. त्यांच्यात नम्रता, विनयशीलता, अंतर्मुखता आणि अल्प अहं असून त्या अनेकदा परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात.’

४. भाव

४ अ. पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी आश्रमात आल्यानंतर त्यांना एका संतांची सेवा मिळाली होती. त्या वेळी अनुभवलेले भावाचे क्षणमोती सांगतांना, तसेच परात्पर गुरुदेवांविषयी बोलतांना त्या भावविभोर होतात.

४ आ. त्या भाववृद्धीसाठी साधकांचे भाववृद्धी सत्संगही घेतात. त्यांच्या भावस्थितीमुळे उपस्थित साधकही भावविश्‍वात जातात.

या दोन्ही भिन्न प्रकारच्या सत्संगांमध्ये त्यांचा शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव जाणवतो.’ (५.१२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक