कामकाजात मराठी भाषेचा उपयोग करत नसल्यावरून राज्यशासनाकडून कोकण रेल्वे प्रशासनाकडे विचारणा

केंद्रशासनाच्या अखत्यारितील कार्यालयांमध्ये स्थानिक भाषेला डावलले जात असेल, तर केंद्रशासनाने संबंधित कार्यालयांना योग्य त्या सूचना देणे अपेक्षित आहे.

मुंबई – फलकावरील लिखाण, प्रसिद्धीपत्रक, विज्ञापन यांसाठी मराठी भाषेचा उपयोग करत नसल्याच्या कारणावरून राज्यशासनाच्या मराठी भाषा विभागाने कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे विचारणा केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अक्षय महापदी आणि मारुती पाटील यांनी ‘आपले सरकार’ या प्रणालीवर याविषयीची तक्रार केली आहे.


या तक्रारीवरून शासनाकडून कोकण रेल्वे प्रशासनाला वरील पत्र पाठवले आहे. ‘या चुकीविषयी कोकण रेल्वेचे अधिकारी आणि मराठी भाषा संचालक यांना शिक्षा करावी’, अशी मागणी महापदी अन् पाटील यांनी तक्रारीमध्ये केली आहे. केंद्रशासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार कार्यालयीन कामकाजामध्ये हिंदी आणि इंग्रजी यांसह राज्याच्या प्रादेशिक भाषेचा वापर करणे कायद्याने बंधनकारक आहे.