‘फायझर’ने भारताकडे मागितली कोरोनावरील लसीची विक्री करण्याची अनुमती !

नवी देहली – अमेरिकेतील प्रसिद्ध औषधनिर्मिती आस्थापन ‘फायझर’ने कोरोनावरील लसीची निर्मिती केली आहे. या आस्थापनाने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे भारतात आपत्कालीन स्थितीत या लसीची विक्री आणि वितरण करण्याची अनुमती मागितली आहे. अशी मागणी करणारे ‘फायझर’ हे पहिले औषधनिर्मिती करणारे आस्थापन ठरले आहे.

१. काही दिवसांपूर्वी ब्रिटीश सरकारने फायझर आणि ‘बायोएन्टेक’ यांनी विकसित केलेल्या लसीच्या वापराला त्यांच्या देशामध्ये अनुमती दिली. तसेच बहारीनमध्येही ही लस वापरण्यास संमती देण्यात आली आहे. त्यानंतर फायझरने भारत सरकारकडे अनुमती मागितली आहे.

२. जगात फायझरच्या लसीचे वर्ष २०२० मध्ये ५ कोटी डोस सिद्ध केले जाणार आहेत. वर्ष २०२१ मध्ये १०३ कोटी डोस उपलब्ध केले जातील. ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वांमध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आले होते.