साधकांना पित्याप्रमाणे मार्गदर्शन करून प्रीतीचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी सौ. सुमा सुदिश पुथलत यांनी वाहिलेली कृतज्ञतापुष्पे !

केरळ येथील साधिका सौ. सुमा पुथलत आणि त्यांचे यजमान श्री. सुदिश पुथलत (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) हे वर्ष १९९३ पासून ‘सनातन संस्थे’च्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते दोघेही वर्ष २००० पासून पूर्णवेळ साधना करत आहेत. सौ. सुमा पुथलत यांना त्यांच्या साधना प्रवासात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांनी अनुभवलेली गुरुदेवांची अथांग प्रीती याविषयीचे वर्णन त्यांच्याच शब्दांत पुढे दिले आहे.

सौ. सुमा पुथलत

१. ‘अभ्यासवर्गाला येणारे नवीन जिज्ञासू किंवा अन्य कुणी डबा आणला नसल्यास त्यांच्या जेवणाची सोय व्हावी’, असा व्यापक विचार करून साधकांनी जास्तीची पोळी-भाजी डब्यात आणणे आणि या कृतीतून परात्पर गुरुदेवांनी साधकांमध्ये ‘इतरांचा विचार करणे, इतरांविषयी आपुलकी असणे आणि दायित्व वाटून घेणे’, इत्यादी गुण रुजवल्याचे लक्षात येणे

‘नोव्हेंबर १९९३ मध्ये मी आणि माझे यजमान श्री. सुदिश पुथलत रुईया महाविद्यालयात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रवचनाला गेलो होतो. ती माझी गुरुदेवांशी झालेली पहिलीच भेट होती. तो अनुभवही मला वेगळा होता आणि विषयही नवीन होता. (मी मूळची ख्रिस्ती आहे आणि मी लग्नानंतर हिंदु धर्मीय झाल्यामुळे मला देव अन् धर्म यांविषयी काही ठाऊक नव्हते.) अभ्यासवर्गाचे सकाळचे सत्र झाल्यावर आम्ही जेवणासाठी थांबलो. आम्ही जेवणासाठी बाहेर जाण्याचा विचार करत होतो. तेव्हा त्या आधीच आम्हाला कुणीतरी जेवणाचे ताट आणून दिले. मी पाहिले, तर काहींनी जेवणाचे डबे समवेत आणले होते आणि ज्यांनी जेवणाचा डबा आणला नाही, अशा व्यक्तींना ते देऊन ते त्यांच्यासमवेत जेवण करत होते. या छोट्याशा प्रसंगातून परात्पर गुरुदेवांनी ‘दुसर्‍यांचा विचार करणे, सर्वांविषयी आपुलकी असणे, सर्वांनी वाटून खाणे आणि सर्वांनी दायित्व वाटून घेणे’, असे पुष्कळ गुण रुजवून बरेच काही शिकवले. तेव्हा ‘प्रत्येकाने आपल्या डब्यात थोडी अधिक पोळी – भाजी आणली होती’, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘कुणी नवीन आले असेल, किंवा कुणी डबा आणला नसेल, तर त्यांच्या जेवणाची सोय व्हावी’, हा त्यामागील व्यापक विचार होता.

​या अभ्यासवर्गात गुरुदेवांनी आम्हाला तात्त्विक आणि प्रायोगिक दोन्ही भाग शिकवले होते. अभ्यासवर्ग संपल्यावर पुढच्या कार्यक्रमांचे नियोजनही तिथेच व्हायचे. अशा प्रकारे हे अभ्यासवर्ग सायंकाळपर्यंत असायचे.

२. कापडी फलक (बॅनर) रंगवण्याविषयी काहीच ठाऊक नसतांनाही तो रंगवायची संधी मिळणे आणि सहसाधकांच्या मार्गदर्शनानुसार तो रंगवून झाल्यावर गुरुदेवांच्या कृपेने अवर्णनीय आनंद अनुभवायला मिळणे

श्री. सुदिश पुथलत

​त्यानंतर आम्ही नियमित परात्पर गुरुदेवांच्या प्रवचनाला जाऊ लागलो. त्यांचे तिसरे प्रवचन ठाण्याला होते. आम्ही दोघे सकाळीच तेथे पोचलो. तेव्हा आम्हाला पाहून परात्पर गुरु डॉक्टर हसून म्हणाले, ‘‘अरे, तुम्ही इथेही पोचलात का ?’’ मला त्यांच्या सहवासात पुष्कळ आनंद मिळत होता. त्यांनी काही करण्यास सांगितले, तरी मी ते करण्यास उत्सुक असे. प्रवचनानंतर त्यांनी सांगितले, ‘‘रविवारी मुंबईतील सेवाकेंद्रात कापडी फलक (‘बॅनर’) रंगवायचे आहेत. ज्या कुणी त्यात सहभागी होऊ इच्छितात, ते सेवेला येऊ शकतात.’’ रविवारी आम्ही दोघे सकाळीच सेवाकेंद्रात पोचलो. आम्हाला पाहून त्यांनी आमचे हसून स्वागत केले. ‘पुष्कळ दिवसांनी आपले मूल घरी आल्यावर वडील जसे आपुलकीने त्याचे स्वागत करतात’, तसेे त्यांनी आमचे स्वागत केल्यासारखे मला वाटले. मला कापडी फलक रंगवण्याविषयी काहीच ठाऊक नव्हते, तरीही मला ते रंगवायची संधी मिळाली. आम्ही सेवा करत असतांना परात्पर गुरुदेव मधूनमधून यायचे आणि आमच्याकडून सेवेत झालेल्या चुका दाखवून त्या सुधारायला सांगायचे. त्यांनी श्री. जाधव आणि अमरजीत या साधकांना ‘अक्षराच्या कडा (curve) कशा रंगवायच्या ?’, हे मला शिकवण्यास सांगितले होते. त्यामुळे मी रंगवतांना कुठे चुकले, तर ते दोघे सुधारणा करायचे. त्यामुळे ‘कापडी फलक खराब होईल ?’, अशी भीती मला वाटत नसे. फलक पूर्ण रंगवून झाल्यावर मी जो आनंद अनुभवला, तो अवर्णनीय होता आणि तो आनंद केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच मी अनुभवू शकले. ही सेवा करतांना ‘एक मोठे कुटुंब एकत्र येऊन रंगकाम करत आहे किंवा चित्र काढत आहे’, असे मला वाटायचे.

३. अंतर्ज्ञानी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या इच्छा ओळखून त्या पूर्ण करणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

३ अ. एका साधकाच्या मनात गोड खाण्याचा विचार आल्यावर त्याच क्षणी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याला लाडू आणून देणे : सेवा चालू असतांना एखाद्या साधकाच्या मनात ‘काहीतरी गोड खावे’, असा विचार आला की, आश्‍चर्य म्हणजे त्याच वेळी परात्पर गुरुदेव एका वाटीत थोडे लाडू घेऊन खोलीत यायचे. त्या वेळी त्या साधकाला पुष्कळ आश्‍चर्य वाटायचे आणि त्याची कृतज्ञता व्यक्त व्हायची; कारण एवढी छोटीशी इच्छाही गुरुदेव पूर्ण करतात.

३ आ. रुग्णाईत अवस्थेत साधिकेला पुष्कळ भूक लागली असता अंतर्ज्ञानी गुरुदेवांनी तिच्या घरी जाऊन तिला पुरणपोळ्या देणे : वर्ष १९९५ मध्ये माझ्या हाताचा अस्थीभंग झाला होता. हाताला ‘प्लास्टर’ घातले होते. तेव्हा सुदिशजी कापडी फलक रंगवत होते आणि मला पुष्कळ भूक लागली होती. ते त्या सेवेत एवढे रंगून गेले होते की, माझी हाक त्यांना ऐकूच जात नव्हती. ‘त्यांना पुन्हा हाक मारून त्रास द्यावा’, असे मला वाटले नाही; म्हणून मी उठले आणि शीतकपाटात खाण्यासाठी काही आहे का, हे पाहू लागले, इतक्यात मला दाराजवळ कुणाची तरी चाहूल लागली; म्हणून पाहिले, तर प्रत्यक्ष गुरुदेव दारात उभे होते. त्यांच्या हातात एक पुडी होती. ती त्यांनी मला दिली आणि म्हणाले, ‘‘तुला भूक लागली होती ना ? मी तुम्हा दोघांसाठी पुरणपोळ्या आणल्या आहेत.’’ नंतर दिनेशदादा (श्री. दिनेश शिंदे जे त्यांच्यासमवेत होते) मला म्हणाले, ‘‘आम्ही उरणहून येतांना त्यांनी अकस्मात् गाडी तुमच्या घरी घ्यायला सांगितली आणि पुरणपोळी आणून दिली.’’

परात्पर गुरुदेव, मी तुम्हाला शरणागत भावाने प्रार्थना करते, ‘त्या दिवशी तुम्ही माझ्या पोटाची भूक भागवलीत. आता माझ्यात ईश्‍वर प्राप्तीची भूक निर्माण करा आणि ती भूकही तुम्हीच भागवा.

४. सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व सर्वत्र जाणवणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेले प्रोत्साहन आणि त्यांच्यातील प्रेमामुळे आम्ही अनेक गोष्टी शिकत होतो. एका क्षणी ते ग्रंथ लिखाण करतांना दिसायचे, तर ‘दुसर्‍या क्षणी कुणा साधकाला शिकवत आहेत’, असे दिसायचे. सेवाकेंद्रात मला प्रत्येक क्षणी त्यांचे अस्तित्व सर्वत्र जाणवायचे.

​प.पू. डॉक्टरांचेे वागणेच असे असायचे की, प्रत्येकाला वाटायचे ‘त्यांचे आपल्याकडे लक्ष आहे.’ त्यांनी आम्हाला ‘समोरच्याला प्रेमाने जिंकायला’ शिकवले.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या केवळ अस्तित्वामुळे स्वतःचा विसर पडणे

गुरुदेव कितीही व्यस्त असले, तरी कुणी जायला निघाले की, ते त्याला आपलेपणाने उद्वाहनापर्यंत (लिफ्टपर्यंत) सोडायला येत असत. एकदा आम्ही जायला निघालो. आम्ही उद्वाहनामध्ये चढून उद्वाहनाचे दार बंद केले; पण उद्वाहनाची कळ (बटण) न दाबता गुरुदेवांचे बोलणे ऐकत तसेच उभे राहिलो. थोड्या वेळाने ते हसून म्हणाले, ‘‘अगं, तू बटण दाबले, तरच ‘लिफ्ट’ खाली जाणार ना ?’’ तेव्हा मला भान आले. तोपर्यंत मला त्यांच्या अस्तित्वामुळे स्वतःचा विसर पडला होता.

६. पनवेल येथील जाहीर सभेनंतर वाशी येथील साधकांना सेवा आवरून परत जाण्यास विलंब होणे, घरी जाण्यासाठी वाहनाची कुठलीही सुविधा नसणे आणि त्या वेळी गुरुदेवांची गाडी अचानक तिथे येऊन त्यांनी सर्व साधकांना त्यांच्या गाडीने घरी पोचवणे

​एकदा परात्पर गुरु डॉक्टरांची पनवेलला जाहीर सभा होती. जाहीर सभेनंतर वाशी-तुर्भे येथील सर्व साधक कापडी फलक काढण्यासाठी आणि सभेनंतरची आवराआवर करण्यासाठी थांबले होते. आम्हाला पुष्कळ उशीर झाला होता. आम्हाला परत घरी जाण्यासाठी वाहनाची सुविधा नव्हती. शेवटची बसही निघून गेली होती, तरी ‘सर्व आवरूनच घरी जायचे, जरुर पडल्यास वाशीपर्यंत चालत जाऊया’, असा आम्ही निश्‍चय केला होता. आम्ही ३ स्त्रिया आणि अन्य पुरुष होते. एवढ्यात गुरुदेवांची गाडी सभेच्या पटांगणात येतांना दिसली. त्यांनी आम्हा सर्वांना अगदी घरापर्यंत पोचवले. त्या वेळी ‘आम्ही इतके साधक गाडीत कसे बसलो ?’, ते ठाऊक नाही. यातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की, आपण स्वतःचा विचार केला नाही की, देवच आपली काळजी घेतो.

७. ‘टाकाऊ वस्तूंचा उपयोग कसा करायचा ?’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कृतीतून शिकवणे

प्रत्येक वर्षी सेवाकेंद्रात दिवाळीची स्वच्छतेची सेवा असायची. एकदा मी या सेवेत सहभागी झाले होते. आम्ही साधिका भांडी काढून, पुसून त्यांचे वर्गीकरण करत होतो. आम्ही खराब झालेली भांडी वेगळी काढून खोलीच्या बाहेर ठेवत होतो. आम्हाला डॉ. (सौ.)  कुंदाताई ‘भांड्यांचे वर्गीकरण कसे करायचे ?’, ते सांगत होत्या. मध्येच परात्पर गुरु डॉक्टर बाहेर ठेवलेली एक कप-बशी घेऊन आत आले आणि म्हणाले, ‘‘आपल्याला कापडी फलक रंगवतांना रंग एकत्र करायला याचा उपयोग होईल.’’ त्या वेळी मला ‘सतर्कता आणि टाकाऊ वस्तूंचा उपयोग कसा करायचा ?’, हे शिकायला मिळाले.

८. रात्री ११.३० वाजता प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणांची रांगोळी काढण्याची तीव्र इच्छा झाल्याने बाहेरच्या दारासमोर आणि शयनकक्षासमोर तशी रांगोळी काढणे, त्यानंतर रात्री मुख्य दारातून पुष्कळ जोराने हवेचा झोत येऊन तो जोराने बाहेर निघून जाणे आणि तेव्हा प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणांच्या रांगोळीनेच संभाव्य अरिष्टापासून रक्षण केल्याचे जाणवणे 

आम्ही वाशी, नवीन मुंबई येथे रहात होतो. सुदिशजी आणि छोटा सौरभ (आमचा मुलगा, तेव्हा तो ६ – ७ वर्षांचा होता) झोपले होते. मी प.पू. भक्तराज महाराज यांचा (प.पू. बाबांचा) भजनाचा ग्रंथ वाचत बाहेर बसले होते. एवढ्यात माझ्या मनात ‘बाहेर दारासमोर प.पू. बाबांच्या चरणांची रांगोळी काढावी’, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. रात्रीचे ११.३० वाजले होते, तरीही मी बाहेरच्या दारासमोर रांगोळी काढली. नंतर आत येऊन आम्ही झोपतो, त्या खोलीच्या बाहेरही तशीच रांगोळी काढली. त्या वेळी रात्रीचे १२.३० वाजून गेले होते. मी तृप्त मनाने आणि आनंदाने झोपले. माझा जरा डोळा लागला असेल, एवढ्यात मुख्य दारातून पुष्कळ जोरात हवेचा झोत आत येत असल्याचे जाणवले. त्याचा वेग पुष्कळ होता. तो त्याच वेगाने शयनकक्षात येऊन बाहेर पडला. त्यामुळे सौरभची झोप चाळवली; म्हणून तो थोडा रडला आणि पुन्हा झोपून गेला. सुदिशही जागे झाले. तेव्हा हे काहीतरी वेगळे (अरिष्ट) असल्याचे आम्हा उभयतांना जाणवले. मला अजूनही वाटते की, ‘त्या दिवशी प.पू. बाबांच्या चरणांच्या रांगोळीनेच आमचे येणार्‍या अरिष्टापासून रक्षण केले.’ ‘गुरुदेवा, तुम्ही त्या दिवशी झोपेतही आमचे रक्षण केलेत’, यासाठी मी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

९. परात्पर गुरु डॉक्टरांनी वडिलांप्रमाणे विचारांची योग्य दिशा देणे आणि स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिकवणे

‘केरळमध्ये अध्यात्माचा प्रसार करायचा’, असे ठरल्यानंतर आम्ही नोकरी सोडून प्रसारसेवेसाठी केरळला जायचा निश्‍चय केला. मी माझ्या अधिकोषातून घरासाठी कर्ज घेतले होते. ‘ते कसे फेडायचे ?’ याची मला काळजी होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला आमच्याजवळील मालमत्ता (संपत्ती) (Assets) आणि आमचे उत्तरदायित्व (liabilities) यांची सूची लिहून काढायला सांगितली आणि ‘त्याप्रमाणे निर्णय घ्या’, असे सांगितले, तसेच काही वेगळा पर्याय असेल, तर ‘तो का योग्य वाटतो ?’, हेही पहायला सांगितले. गुरुदेवांनी आम्हाला विचारांची योग्य दिशा दिली आणि स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिकवले. आम्ही आमच्या दोघांचे Provident fund आणि अन्य काही बचत यांतून ते कर्ज चुकवले. तेव्हा वडील जसे मुलाला ‘योग्य काय करायचे ?’ याविषयी मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखवतात, तसे परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्यासंदर्भात केल्याचे मला वाटले. कर्ज चुकवून आम्ही दोघांनीही स्वेच्छानिवृत्ती घेतली. आम्ही ईश्‍वरप्राप्तीसाठी घेतलेल्या या निर्णयाविषयी इतक्या वर्षांनीही आम्हाला खेद वाटत नाही.

१०. केरळला सेवेसाठी जातांना परात्पर गुरु डॉक्टरांनी मार्गातील सर्व नियोजन करून देणे आणि ‘यापुढे प्रत्येक गावात आपले साधक असतील आणि त्यामुळे साधकांना कुठेही प्रवास करतांना कसलीही काळजी करावी लागणार नाही’, असे सांगणे अन् आता प्रत्यक्षात तसाच अनुभव येणे

​आम्ही पूर्णवेळ होऊन केरळला सेवेसाठी निघणार होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ‘वाशीपासून कोची, केरळपर्यंतचा प्रवास कसा करायचा ?’ याचा आराखडा काढून दिला होता. त्यात त्यांनी ‘आम्ही वाशीवरून किती वाजता निघायचे ? संध्याकाळी चहासाठी कुठल्या साधकाकडे थांबायचे ? रात्रीचे जेवण आणि निवासाची सोय कुठल्या साधकाकडे असेल’, हे सर्व सविस्तर सांगितले आणि ते म्हणाले, ‘‘पुढे अशी वेळ येईल की, प्रत्येक गावात आपले साधक असतील. त्यामुळे साधकांना कुठेही प्रवास करतांना कसलीही काळजी करावी लागणार नाही. सर्व सोयी इतर साधकांच्या साहाय्याने होतील.’’ साधक आता प्रत्यक्षातही तसाच अनुभव घेत आहेत.

११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘आपत्काळात प्रत्यक्ष बोलता येणार नसल्याने सूक्ष्मातून बोलावे लागेल’, याची सिद्धता करून घेणे

मला वर्ष २००३ मध्ये गुरुदेवांची पुष्कळ आठवण आली; म्हणून मी त्यांना भ्रमणभाष केला. त्या वेळी बोलतांना ते म्हणाले, ‘‘आता आपण आठवण आल्यावर भ्रमणभाष करून बोलू शकतो; परंतु पुढे आपत्काळात भ्रमणभाषही नसेल. तेव्हा आपल्याला सूक्ष्मातून बोलावे लागेल.’’ ‘तेव्हाच त्यांनी आपत्काळासाठी माझ्या मनाची सिद्धता करून घेतली आहे’, असे मला वाटते.

​परात्पर गुरुदेव, मी माझ्या या भावना कृतज्ञतेने तुमच्या चरणी अर्पण करते.’

– सौ. सुमा सुदिश पुथलत, कोची, केरळ. (१.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक