साधकांना ‘गुरुपादुका मानसरित्या प्रत्येक साधकाच्या हृदयात स्थापन केल्या आहेत’, असा भाव ठेवायला सांगितल्यावर त्यांना स्वतःत जाणवलेले पालट

भाववृद्धी सत्संगात साधकांना ‘गुरुपादुका मानसरित्या प्रत्येक साधकाच्या हृदयात स्थापन केल्या आहेत’, असा भाव ठेवायला सांगितल्यावर आणि साधकांना त्यांच्याकडून झालेल्या चुका स्वीकारून सुधारण्यासाठी प्रयत्न केल्यावर त्यांना स्वतःत जाणवलेले पालट

‘श्री गुरु’ हे साधकांच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहेत. श्री गुरूविना साधकाला पूर्णत्व नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले हे पूर्णस्वरूप आहेत. ते सत्-चित्-आनंद स्वरूप आहेत. केवळ त्यांच्या चरणांच्या स्मरणानेच साधकांचा उद्धार होतो. गुरूंच्या स्मरणानेच साधकाच्या जन्मोजन्मींच्या पापांचा नाश होतो. श्री गुरूंनी धारण केलेल्या अशा या पवित्र पादुका साधकांनी स्वतःच्या हृदयात मानसरित्या स्थापन केल्या आहेत. (महर्षींच्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूजेपुरत्या पादुका धारण केल्या होत्या. १२.२.२०१९ या दिवशी या श्री गुरुपादुकांच्या प्रतिष्ठापनेचा मंगलमय सोहळा सनातनच्या रामनाथी (गोवा) आश्रमात झाला. भाववृद्धी सत्संगात साधकांना ‘या गुरुपादुका मानसरित्या प्रत्येक साधकाच्या हृदयात स्थापन केल्या आहेत’, असा भाव ठेवण्यास सांगितले होते.) गुरुपादुकांच्या तेजस्वरूप चैतन्यामुळे साधकांच्या अनेक पापांचा आपोआप नाश होत आहे आणि साधकांना भरभरून चैतन्य मिळत आहे. 

साधकांच्या हृदयात गुरुपादुका असल्या, तरी साधकांच्या मनातील जन्मोजन्मींचे अयोग्य संस्कार आणि स्वभावदोष यांमुळे त्यांच्याकडून चुका होतात. त्यामुळे त्यांच्या अंतरातील चैतन्याचा नाश होतो. अशा चुकांमुळे अंतरातील गुरुपादुकांचेही चैतन्य अल्प होते, तसेच त्या चुकांविषयी खंत न वाटल्याने साधकांच्या साधनेची अपरिमित हानी होते. भाववृद्धी सत्संगात साधकांना ‘त्यांच्याकडून झालेल्या चुका स्वीकारणे आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे’, असे ध्येय दिले होते. त्यानुसार साधकांनी केलेले प्रयत्न पुढे देत आहोत.

१. कु. दीपाली कदम, ठाणे

१ अ. सत्संगातील मार्गदर्शनामुळे समष्टीत चुका सांगण्याची तळमळ वाढणे, परात्पर गुरु डॉक्टरांना आत्मनिवेदन केल्यावर त्यांनी ‘समष्टीत चुका सांगितल्याने प्रारब्ध लवकर नष्ट होते’, असे सांगणे आणि त्यानंतर सत्संगात स्वतःची चूक सांगू शकल्याने पुष्कळ हलके वाटणे : माझ्याकडून झालेल्या चुका मला लक्षात येत होत्या; पण मला त्यांविषयी खंत वाटत नव्हती. भाववृद्धी सत्संगात याविषयी सांगितल्यावर मला त्याची जाणीव होऊन माझी समष्टीत चुका सांगण्याची तळमळ वाढली. याआधी मला स्वभावदोष निर्मूलन सत्संगात चुका सांगायला भीती वाटायची. ‘साधकांनी मला प्रश्‍न विचारले, तर काय होईल ?,’ असे मला वाटायचे. माझे प्रयत्न अल्प असूनही देवाच्या कृपेने मला शुद्धी सत्संगात माझी चूक सांगण्याची संधी मिळाली. त्यापूर्वी मी मनातून गुरुदेवांना म्हणाले, ‘मला चूक सांगायला पुष्कळ भीती वाटते. ‘मी भाव कसा ठेवू ?’, ते तुम्ही मला सांगा.’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला विचार दिला, ‘समष्टीत चुका सांगितल्याने प्रारब्ध लवकर नष्ट होते.’ त्यामुळे मी माझ्याकडून झालेली चूक सत्संगात सांगू शकले. नंतर मला पुष्कळ हलके वाटले. मागील आठवड्यापासून मला माझ्या हृदयात गुरुपादुका दिसतात.

२. श्री. दीपक आगावणे, पुणे

श्री. दीपक आगावणे

२ अ. सत्संगापूर्वी स्वभावदोष निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करावे लागणे, सत्संगानंतर अंतर्मुखता वाढणे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर समवेत असून ते स्वभावदोष निर्मूलन करण्यासाठी साहाय्य करत आहेत’, असे जाणवणे

२ अ १. सत्संगापूर्वीची स्थिती : माझ्यात ‘स्वतःच्या मनाने करणे’ हा तीव्र स्वभावदोष होता. ‘मी सहसाधकांपेक्षा चांगले बोलतो. मी विषय चांगला सांगतो’, असे मला वाटायचे. माझ्यातील ‘कर्तेपणा घेणे’, या अहंच्या पैलूमुळे मी शिकण्याच्या स्थितीत राहू शकत नव्हतो.

२ अ २. सत्संगानंतर झालेला पालट : सत्संगानंतर मी आपोआपच अंतर्मुख झालो. मला आतूनच ‘मी शिकण्याच्या स्थितीत रहायला हवे. ‘माझ्या मनानुसारच व्हायला हवे’, ही माझी तीव्र अपेक्षा आहे. त्यावर मी मात करायला हवी. मी परिस्थिती स्वीकारून त्यात स्थिर रहायला हवे. गुरुमाऊलीने सहसाधकांना प्रदान केलेले गुण मला त्यांच्याकडून शिकायचे आहेत’, असे विचार येऊन माझी अंतर्मुखता वाढली आणि मला आतूनच कृतज्ञता वाटू लागली. ‘साक्षात् गुरुमाऊली माझ्या समवेत आहे. प्रसंग घडत असतांना ती मला ‘तुझे चुकत आहे. येथे तुला पालटायला हवे. होणार्‍या चुकीवर तुला मात करायची आहे’, असे सांगत आहे. गुरुमाऊली मला ‘स्वतःच्या मनानुसार करणे’, या स्वभावदोषावर मात करण्यासाठी साहाय्य करत आहे’, असे मला जाणवते.

३. सौ. विनुता शेट्टी, भाग्यनगर

३ अ. भाववृद्धी सत्संगात सांगितल्याप्रमाणे वारंवार होणार्‍या चुकांविषयीचे चिंतन लिहून त्यानुसार प्रयत्न करणे, त्यामुळे स्वतःकडून झालेली चूक स्वीकारून त्याविषयी खंत निर्माण होणे : या आठवड्यात साधकांनी मला माझी एक चूक लक्षात आणून दिल्यावर मी ती स्वीकारली नाही आणि त्यावर प्रतिक्रियाही दिली. त्या चुकीमुळे माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष झाला. तेव्हा भाववृद्धी सत्संगात सांगितलेले सूत्र मला आठवले आणि ‘माझ्याकडून एवढी मोठी चूक होऊन मी ती स्वीकारलीही नाही’, याची मला जाणीव झाली. त्यानंतर ‘मी कुठे न्यून पडले ?’, याविषयी मी चिंतन केले. त्यानंतर झालेल्या स्वभावदोष निर्मूलन सत्संगात मी ती चूक स्वीकारली. आधी केलेली प्रक्रिया माझ्या अंतर्मनात गेल्यामुळे माझ्यात चुकीची खंत निर्माण झाली. सत्संग झाल्यावर मला हलकेपणा जाणवला आणि मला आनंद झाला.

४.  श्री. शंभू गवारे, झारखंड

श्री. शंभू गवारे

४ अ. स्वतःकडूून चूक झाल्यावर ती सांगण्यासाठी संघर्ष होऊन अस्वस्थ होणे, त्यानंतर ‘चूक सांगायला हवी’, याची जाणीव होऊन चूक सांगितल्यावर मन शांत होणे आणि ‘चुकांतून शिकून गुरूंना अपेक्षित असे घडायचे आहे’, अशी विचारप्रक्रिया होऊन चांगले वाटणे : पूर्वी माझ्या मनात प्रतिमेचे विचार यायचे आणि काही वेळानंतर ते विचार निघून जायचे; पण त्याविषयी मला खंत वाटत नव्हती. या आठवड्यात माझ्याकडून झालेली एक चूक पू. नीलेश सिंगबाळ यांना सांगण्यासाठी माझा संघर्ष होत होता. त्याच वेळी ‘ती चूक सांगायला हवी’, असेही मला वाटत होते. या विचारांमुळे मी अस्वस्थ झालो. त्यानंतर मी पू. नीलेशदादांना चूक सांगितल्यावर माझे मन शांत झाले. मी प्रयत्न करूनही न्यून न होणारी अस्वस्थता केवळ मी माझ्याकडून झालेली चूक सांगितल्याने न्यून झाली. पू. नीलेशदादांनी माझ्या चुका लक्षात आणून दिल्यावर मला खंत वाटली, तसेच ‘चुकांतून शिकून गुरूंना अपेक्षित असे मला घडायचे आहे’, अशी विचारप्रक्रिया होऊन मनाला चांगले वाटले. त्यामुळे माझी अस्थिरता आणि मनावरील ताण न्यून झाला. भाववृद्धी सत्संगातील सूत्रांमुळे माझी स्वभावदोष निर्मूलनाची संवेदनशीलता वाढली आहे.

५. सौ. छाया मिराशी, चिंचवड, पुणे

५ अ. एका प्रसंगात स्वतःतील स्वभावदोषांची जाणीव होऊन संयमाने वागता येणे : आमच्या कुटुंबातील जवळच्या एका नातेवाईकाचा विवाह ठरला. त्या वेळी माझ्या मनात ‘या नातेवाईक मुलाची अडचण आहे. त्या मुलाला साहाय्य म्हणून आपण त्याला २० सहस्र रुपये तरी देऊया’, असा विचार आला. मी त्याला लगेच भ्रमणभाष करणार होते; पण त्या वेळी मला ‘माझ्या जवळचे पैसे म्हणजे गुरुधन आहे’, याची जाणीव झाली. या प्रसंगातून मला माझ्यातील ‘उतावीळपणा, प्रतिमा जपणे, कौतुकाची अपेक्षा करणे’ इत्यादी स्वभावदोषांची जाणीव झाली. नंतर मला वाटले, ‘गुरूंचे धन न विचारता खर्च करणे अयोग्य आहे. ‘मी जे पैसे देणार होते, त्यांतून माझे पूर्वीचे देवाण-घेवाण हिशोब फिटणार आहेत कि नवीन हिशोब निर्माण होणार आहेत ?’, याविषयी मी काहीच जाणू शकत नाही. ‘त्या नातेवाईकाला पैसे देण्याचा विचार माझ्या मनात २ दिवसांनंतरही राहिला, तर हा गुरूंनी दिलेला विचार आहे’, असे समजून मी त्याला साहाय्य करीन.’ माझी अशी विचारप्रक्रिया होऊन मला संयमाने वागता आले.

५ आ. एका साधिकेविषयी पूर्वग्रह असल्याने स्वतःकडून झालेली चूक स्वभावदोष निर्मूलन सत्संगात सांगणे, त्यानंतर ‘स्वतःच्या हृदयात गुरुपादुका असल्याने पूर्वग्रहाने वागणे अयोग्य आहे’, याची जाणीव होऊन प्रयत्न केल्यावर पूर्वग्रह नाहीसा होणे : ‘मला एका साधिकेविषयी तीव्र पूर्वग्रह होता. त्यासंदर्भात माझ्याकडून झालेली एक चूक मी स्वभावदोष निर्मूलन सत्संगात सांगितली. त्या वेळी सहसाधकांनी मला ‘माझ्यात कोणते स्वभावदोष आहेत आणि मी त्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याची जाणीव करून दिली. त्या रात्री माझा संघर्ष झाला. दुसर्‍या दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘माझ्या हृदयात गुरुपादुका आहेत. मी असे का वागत आहे ?’ त्यानंतर मी ‘त्या साधिकेचे गुण आणि आजपर्यंत तिने मला कसे साहाय्य केले ? ती माझ्याशी किती चांगली वागली’, याविषयी लिहिले. त्या वेळी मला पुष्कळ हलके वाटले. ‘तिच्यातील गुणांच्या विरुद्ध माझ्यात कोणते स्वभावदोष आहेत’, याचा मी अभ्यास केला. तेव्हा माझ्या मनातील त्या साधिकेविषयीचा पूर्वग्रह नाहीसा झाला.

६. सौ. राधा सोनवणे, पुणे

६ अ. पूर्वी इतरांनी स्वभावदोष सांगितल्यावर नकारात्मक विचार येणे; पण भाववृद्धी सत्संगानंतर साधकांनी स्वभावदोष सांगितल्यावर सकारात्मक रहाता येणे आणि प्रयत्न करण्याची जाणीव निर्माण होऊन आनंदावस्था अनुभवणे : पूर्वी इतरांनी मला माझे स्वभावदोष सांगितल्यावर ताण यायचा. माझ्या मनात ‘माझ्याकडून प्रयत्न होत नाहीत. मला दायित्व नको’, असे विचार येऊन न्यूनगंड निर्माण व्हायचा. या वेळी साधक मला साहाय्य करत असतांना ‘मी कुठे चुकत आहे’, हे लक्षात येऊन ‘मी प्रयत्न करायला हवेत’, अशी मला प्रकर्षाने जाणीव झाली. गुरुकृपेने मला १०० टक्के सकारात्मक रहाता आल्याने मला हलके वाटले. मला प्रयत्न करण्याची जाणीव झाल्यामुळे आनंदावस्था अनुभवता येत आहे.’

७. सौ. निशा बिरारी, भिवंडी, ठाणे

७ अ. देवाला प्रार्थना केल्याने नकारात्मक विचारांवर मात करता येणे आणि अंतर्मुख झाल्याने अल्प वेळेत परिणामकारक सेवा होणे : पूर्वी मी अधिक बोलायचे, तसेच माझा इतरांना शिकवण्याचा भागही अधिक होता; पण ते माझ्या लक्षात यायचे नाही. या वेळी भाववृद्धी सत्संग झाल्यानंतर मी देवाला प्रार्थना केली, ‘देवा, मी १८ वर्षांपासून अहं निर्मूलनाची प्रक्रिया करत आहे; पण त्यासाठी मी असमर्थ आहे. मला प्रक्रिया राबवता येत नाही. माझ्यातील सर्व स्वभावदोष आणि अहं यांचे तूच निर्मूलन कर. येणार्‍या महाशिवरात्रीचा मला आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता येऊ दे.’ त्यानंतर महाशिवरात्रीची सेवा करतांना अनेक प्रसंग घडले. माझ्याकडून चुका झाल्या. माझ्या जिवावर बेतण्याइतके प्रसंग घडले; पण त्या प्रसंगांत माझ्या मनात कोणत्याही साधकाविषयी नकारात्मकता आली नाही. या वेळी माझ्या मनात नकारात्मक विचार आले, तरी संघर्ष करून मला त्यावर मात करता येत होती. या दिवसांमध्ये मला शारीरिक त्रास झाले; पण माझे मन सदैव सेवेतच होते. पूर्वी माझा सेवेतील वेळ बोलण्यातच जायचा; पण आता मी अंतर्मुख झाल्याने देवाने मला ४ घंट्यांची सेवा १ घंट्यात करायला शिकवली. देवानेच माझ्याकडून अल्प वेळेत परिणामकारक सेवा करवून घेतली.

८. सौ. मीनाक्षी पाटील, जळगाव

सौ. मीनाक्षी पाटील

८ अ. चुकांची वाटणारी भीती न्यून होणे आणि चुकांतून शिकता येणे : ‘मी कितीही तळमळीने सेवा केली, तरी चुका होतातच’, अशी माझी अयोग्य विचारप्रक्रिया होती; पण आता देवाच्या कृपेने मला वाटते, ‘ज्या वेळी माझ्याकडून चूक होते, त्या वेळी माझा कोणतातरी स्वभावदोष उफाळून आलेला असतो; म्हणूनच चूक होते.’ त्यामुळे मला चुकांची वाटणारी भीती आणि त्यामुळे येणारा ताण न्यून झाला आहे. आता मला चुकांतून शिकता येत आहे.

८ आ. अनुभूती – मनात अयोग्य विचार आल्यावर देवाला शरण जाऊन क्षमायाचना करणे, त्या वेळी ‘हृदयातील गुरुपादुकांमधून पांढरा आणि पिवळा प्रकाश येऊन देहाभोवती संरक्षक कवच निर्माण होत आहे’, असे जाणवणे, यावरून देवाने साधकांच्या अंतरात गुरुपादुकांचे अस्तित्व निर्माण करून त्यांच्यातील स्वभावदोष मूळापासून नष्ट करायला आरंभ केल्याचे जाणवणे : ‘स्वतःच्या हृदयातील गुरुपादुकांचे पावित्र्य राखण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी भाववृद्धी सत्संगात सांगितले होते. त्यानुसार माझ्यातील ‘पूर्वग्रह, तर्क-वितर्क करणे, निष्कर्ष काढणे, कर्तेपणा स्वत:कडे घेणे’, या स्वभावदोष आणि अहंच्या पैलूंसंदर्भात माझ्या मनात एखादा विचार आला, तरी देवाच्या कृपेने माझ्याकडून ‘देवाला शरण जाणे आणि क्षमायाचना करणे,’ असे प्रयत्न होऊ लागले. त्या वेळी ‘माझ्या हृदयातील गुरुपांदुकामधून पांढरा आणि पिवळा प्रकाश येऊन माझ्या संपूर्ण देहाभोवती संरक्षक कवच निर्माण होत आहे’, असे मला जाणवते.

यावरून ‘आपले स्वभावदोष घालवण्यासाठी आपण असमर्थच होतो; म्हणून देवाने प्रत्येक साधकाच्या अंतरात गुरुदेवांच्या पादुकांचे अस्तित्व निर्माण केले आणि त्या माध्यमातून साधकांच्यातील स्वभावदोष मूळापासून नष्ट करायला आरंभ केला आहे’, असे जाणवून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

९. सौ. जयश्री पाटील, संभाजीनगर

९ अ. भाववृद्धी सत्संगात ‘सेवेत झालेल्या चुका न सांगणे, म्हणजे त्या न स्वीकारणे’, हे सूत्र सांगितल्यावर चुका स्वीकारत नसल्याची जाणीव होणे आणि त्यानंतर चुका स्वीकारल्यावर देवाकडे एक पाऊल जाणार आहे’, हे लक्षात येऊन चुकाविषयी वाटणारी भीती न्यून होणे आणि समष्टीत चुका सांगण्यासाठी उत्साह निर्माण होणे : भाववृद्धी सत्संगात ‘सेवेत झालेल्या चुका न सांगणे, म्हणजे त्या न स्वीकारणे’, असे सूत्र सांगितले. ते ऐकल्यावर ‘मी चुका स्वीकारत नाही आणि त्यामुळे मी भगवंतापासून मी एकेक पाऊल दूर जात आहे’, याची मला जाणीव झाली. तेव्हापासून ‘सेवेचा आढावा देतांना ‘सेवा करतांना मी कुठे अल्प पडले ?’, हे सांगूया. माझ्याकडून झालेली चूक मी १०० टक्के स्वीकारली, तरच मी देवाकडे एक पाऊल पुढे जाणार आहे’, असे माझ्या मनात विचार येऊन मला हलके वाटले. त्यामुळे मला चुकांविषयीची वाटणारी भीती न्यून झाली आणि समष्टीत चुका सांगण्यासाठी माझ्यात उत्साह निर्माण झाला.

९ आ. अनुभूती – पूर्वी मी कोणतीही चूक स्वीकारायचे नाही. तेव्हा ‘मी एक गोळा असून अनेक धाग्यांनी मला घट्ट बांधले आहेत’, असे दिसायचे. आता ‘माझ्याकडून झालेली चूक मला १०० टक्के स्वीकारायची आहे’, असा मी विचार केला. तेव्हा मला ‘त्या गोळ्याला बांधलेले धागे सैल होत आहेत. त्यामुळे मी मोकळा श्‍वास घेत आहे’, असे दृश्य दिसले.

१०. सौ. सीमा श्रीवास्तव, सोनपूर

१० अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेली प्रार्थना केल्याने ‘अंतर्मुखतेत ईश्‍वर आहे’, याची जाणीव होऊन चुका स्वीकारता येणे : एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना अंतर्मुख होण्यासाठी पुढील प्रार्थना सांगितली, ‘हे देवा, तूच मला सर्वत्र अंतर्मुखतेने बघण्याची शक्ती दे. माझे अंतःकरण शुद्ध होऊ दे.’ ही प्रार्थना केल्यामुळे मला माझ्याकडून होणार्‍या चुकांची जाणीव होते आणि मी त्या चुका सारणीत लिहिते. मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेली ही प्रार्थना पुन:पुन्हा आठवते.

याआधी कुणी माझी चूक सांगितली, तर माझ्याकडून ती लगेच स्वीकारली जात नव्हती. आता माझ्या लक्षात यायला लागले, ‘या चुकीमुळे मी देवापासून दूर जात आहे. गुरुदेव मला सांगत आहेत, ‘अंतर्मुखतेत ईश्‍वर आहे.’ त्यानंतर मी अंतर्मुख होऊन विचार केल्यावर मला माझी चूक स्वीकारता येऊ लागली आणि मी क्षमा मागण्याचा प्रयत्नही केला.

११. भाववृद्धी सत्संग ऐकल्याने साधकांना झालेले लाभ

भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून देवाने साधकांची चुकांच्या संदर्भात असलेली अयोग्य विचारप्रक्रिया पालटली. ‘चुकांविषयी नकारात्मकता, चुकांची भीती, बहिर्मुखता, प्रतिमा जपणे, परिस्थितीला दोष देणे’, यांमुळे साधकांना चुका स्वीकारता येत नव्हत्या. त्यांना चुकांविषयी खंत वाटण्याचा टप्पा तर दूरच होता. साधक चुकांच्या विचारांत अडकल्याने त्यांची साधना व्यय होत होती. भगवंताने भाववृद्धी सत्संगातून साधकांना दिशा दिली. ‘प्रत्येक चूक ईश्‍वरापासून दूर कशी नेते’, याविषयी साधकांना दिशा मिळाल्यामुळे साधक अंतर्मुख झाले. त्यांना अंतर्मुखतेतील भगवंताचे अस्तित्व जाणवले.

१२. साधनेसाठी ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती अखंडपणे पुरवणार्‍या गुरुमाऊलीच्या चरणी अनन्यभावाने व्यक्त केलेली कृतज्ञता

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने या अमूल्य अशा भाववृद्धी सत्संगातील प्रत्येक शब्द गुरूंच्या संकल्पासहितच कार्यरत होतो आणि साधकांच्या अंतर्मनातील रज-तम नष्ट करून त्यांना कृतीप्रवण करतो. ‘हे गुरुदेवा, भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून तुम्हीच सर्वांना ज्ञानशक्ती देत आहात. त्यामुळे साधकांच्या मनामध्ये सतत साधनारत रहाण्याची इच्छाशक्ती निर्माण होते. पुढील आठवडाभर प्रयत्न करण्यासाठी तुम्हीच त्यांना क्रियाशक्तीही पुरवत आहात. साधकांना साधनेसाठी ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती अखंडपणे पुरवणार्‍या हे गुरुमाऊली, आम्ही आपल्या चरणी अनन्यभावाने कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’

– कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.६.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक