बेंगळुरू (कर्नाटक) – २६ नोव्हेंबर या दिवशी तुळशीविवाहाच्या निमित्ताने दुपारी २.३० वाजता ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन करण्यात आले. या वेळी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप सामूहिकरित्या करण्यात आला. त्यामध्ये ४५० हून अधिक जिज्ञासूंनी सहभाग घेत चैतन्याची अनुभूती घेतली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्र मोगेर यांनी तुळशीच्या पूजेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, वनस्पतींमध्ये तुळस अत्यंत सात्त्विक आहे. हिंदु धर्मीय तिला देवता मानून तिची पूजा करतात. तुळस वैद्यांसाठी वनस्पती, तर ऋषिमुनींसाठी संजीवनी आहे. धर्मशास्त्रानुसार तुळस असलेल्या जागी सदैव हरिचा (श्रीविष्णूचा) वास असतो. शैव, वैष्णव, गाणपत्य, देवी उपासक असे सर्वजण तिची पूजा करतात. तुळस-कृष्ण विवाह यालाच ‘तुळशीविवाह’ म्हणतात. कार्तिक मासातील तुळशीविवाहाच्या पवित्र समयी श्रीमन्नारायण निद्रावस्थेतून बाहेर येऊन भक्तांना दर्शन देतात. त्यामुळे आपण भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी त्याचे स्मरण म्हणजेच त्याचा नामजप करूया, असे त्यांनी आवाहन केले.
विशेष
या सामूहिक नामजपाचे थेट प्रसारण फेसबूक आणि यूट्यूब यांच्या माध्यमातून करण्यात आले. फेसबूकच्या माध्यमातून सामूहिक नामजपाचा कार्यक्रम १६ सहस्र ७०० जणांनी प्रत्यक्ष पाहिला आणि ४७ सहस्र ७४ जणांपर्यंत कार्यक्रमाची लिंक पोचली (रिच), तसेच यूट्यूबवरून सामूहिक नामजपाचा कार्यक्रम १ सहस्र २०० जणांनी पाहिला.
अनुभूती
१. सामूहिक नामजपामुळे घरातील वातावरण मंदिरासारखे झाले. – हेमा गणेश
२. सामूहिक नामजप करतांना तुळशीच्या मागे सूक्ष्मातून श्रीकृष्ण बासरी वाजवत आहे, असे वाटत होते. – कलावती, बेंगळुरू.
अभिप्राय
अधिकाधिक वेळेसाठी अशा नामजपाचे आणखी नियोजन करावे. – आनंद उप्पार