साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !

‘विष्णुभक्ती करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळालेली अमूल्य संधी म्हणजे ‘वैकुंठचतुर्दशी !’ वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते. जो भक्त या दिवशी थोडीशीही विष्णुभक्ती करतो, त्याच्यासाठी वैकुंठधामात स्थान मिळणे सुनिश्‍चित आहे. ‘वैकुंठचतुर्दशीच्या निमित्ताने श्रीविष्णूच्या दिव्य वैकुंठधामाची प्राप्ती करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे शिकवण्यासाठी या लेखाच्या माध्यमातून साक्षात् श्रीविष्णु वैकुंठलोकाचे महाद्वार उघडून आपल्याला साधनेची पुढची दिशा देणार आहे. भगवंताच्या या भावलीलेविषयी आपण त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करूया.  

(भाग ४)

लेखाचा भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426464.html

लेखाचा भाग २ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426738.html

लेखाचा भाग ३ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/427123.html

१ डिसेंबर या दिवशी आपण साधकांना वैकुंठधामाची प्राप्ती करून देणारी वैकुंठलोकाची सप्तद्वारे यातील काही भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

६. साधकांना वैकुंठधामाची प्राप्ती करून देणारी वैकुंठलोकाची सप्तद्वारे

६ इ. वैकुंठलोकाची सप्तद्वारे

६ इ ४. वैकुंठलोकाचे चौथे महाद्वार – श्रद्धा

६ इ ४ अ. ‘साधक, संत आणि सद्गुरु यांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेव जे काही सांगतात, त्यातून १०० टक्के माझा उद्धार होणार आहे’, ही दृढ श्रद्धा मनी ठेवल्यास वैकुंठाचे चौथे द्वार साधकांसाठी खुलेच असणे : ‘शरणागतीचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर ‘भगवंत आणि गुरुदेव आपल्याला जो मार्ग दाखवतील, त्या मार्गावर चालत रहाणे’, ही आपली पुढील साधना आहे. त्यासाठी आवश्यकता आहे, श्रद्धेची ! गुरुदेवांचे प्रत्येक वाक्य हे ब्रह्मवाक्यच आहे. ‘परात्पर गुरुदेवच समष्टीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिशादर्शन करतात’, याविषयी मनामध्ये श्रद्धा ठेवूया. ‘परात्पर गुरुदेव आपल्याला साधक, संत आणि सद्गुरु यांच्या माध्यमातून जे काही सांगतात, त्यातून १०० टक्के माझा उद्धार होणार आहे’, ही दृढ श्रद्धा मनी ठेवून आपण सर्वांनी त्यांनी सांगितलेला प्रत्येक प्रयत्न अथवा प्रत्येक सेवा केली, तर वैकुंठाचे चौथे द्वार आपल्यासाठी खुलेच असणार आहे.

६ इ ५. वैकुंठलोकाचे पाचवे महाद्वार – आज्ञापालन : आपल्या मनामध्ये असलेली श्रद्धा आपण ‘आज्ञापालन’ या गुणाद्वारे कृतीमध्ये आणतो. जेव्हा आपल्याकडून असे प्रयत्न होतील, तेव्हा आपल्यासाठी वैकुंठाचे पाचवे भव्य दिव्य महाद्वारही आपोआपच उघडणार आहे. ‘आज्ञापालन’ हा साधनेतील सर्वांत महत्त्वाचा गुण आहे. साधनेत सांगितलेले प्रत्येक सूत्र श्रद्धापूर्वक ऐकून त्याचे आज्ञापालन करूया. ‘साधनेत आपल्याला जो कुणी योग्य दिशा दाखवेल, तोच आपला गुरु आहे. गुरुच त्याच्या रूपात आपल्याला दिशा दाखवायला अवतरलेले असतात’, हे ओळखून ‘गुर्वाज्ञापालन’ या भावाने गुरूंच्या समष्टी रूपाचा लाभ करून घेऊया आणि साधनेत ‘आज्ञापालन’ या गुणाद्वारे श्री गुरूंचे मन जिंकूया.

६ इ ६. वैकुंठलोकाचे सहावे महाद्वार – सातत्य 

६ इ ६ अ. प्रयत्नांमध्ये कुठेच अल्पसंतुष्ट न होता अथवा ‘आणखी पुढे किती मार्ग राहिला असेल ?’, या विचाराने निराश न होता ध्येयाचा ध्यास घेऊन प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक ! : ‘आज्ञापालन’ या गुणाद्वारे जरी वैकुंठाचे पाचवे द्वारे उघडलेले असले, तरी वैकुंठलोकात प्रवेश करण्यासाठी आणि श्रीविष्णूचे दर्शन घेण्यासाठी ज्या गुणाची आवश्यकता आहे, तो म्हणजे ‘सातत्य.’ आधीची पाच द्वारे उघडतांना आपण साधनेसाठी जे जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नांमध्ये अल्पसंतुष्ट न होता अथवा ‘आणखी पुढे किती मार्ग राहिला असेल ?’, या विचाराने निराश न होता ध्येयाचा ध्यास घेऊन प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले, तर महाविष्णु स्वतः या गुणाद्वारेच वैकुंठाचे सहावे द्वार उघडणार आहे.

६ इ ६ आ. सातत्य न रहाण्यामागील दोष-अहंचे अडथळे दूर करूया ! : साधनेत सातत्य असणे अत्यंत आवश्यक आहे. ‘प्रयत्नांमध्ये सातत्य राखणे’, हे आपले ध्येय आहे. ‘सातत्य आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे’, ही आपली साधना आहे. ते प्रयत्न करत करतच ‘साधनेच्या प्रयत्नांमध्ये आपोआपच कधी सातत्य निर्माण झाले ?’, हे आपल्यालाही कळणार नाही. ‘महाप्रसाद घेणे, स्वतःचे आवरणे, झोपणे’, या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कुणाला सांगावे लागत नाही. त्या दैनंदिन कृती आपल्या अंगवळणी पडलेल्या असल्याने आपल्याकडून नियमितपणे आपोआपच होतात. त्याचप्रमाणे साधनेचे प्रयत्नही आपल्या अंगवळणीच पडले पाहिजेत. त्या दृष्टीने आपण सर्वांनी आपल्या साधनेच्या प्रयत्नांत सातत्य ठेवूया. सातत्य न रहाण्यामागील दोष-अहंचे अडथळे दूर करूया.

६ इ ७. वैकुंठलोकाचे सातवे महाद्वार – कृतज्ञता 

६ इ ७ अ. सातव्या द्वारापर्यंत पोचल्यावर कृतज्ञता वाटल्यावर अंतरातील निःशब्द कृतज्ञतेचे बोल अंतर्यामी महाविष्णूला ऐकू येणे आणि तो स्वतः प्रसन्न होऊन सातवे अंतिम द्वार साधकांसाठी उघडत असणे : अशा प्रकारे वरील सर्व गुणांच्या आधारे वैकुंठलोकाच्या सातव्या द्वारापर्यंत पोचल्यावर ‘हे अंतिम द्वार उघडले की, साक्षात् श्रीमन्नारायणाचे दर्शन आपल्याला होईल’, या विचाराने आपल्याला अत्यंत आनंद आणि कृतज्ञता वाटत आहे. मनामध्ये कृतज्ञतेचा अपार भाव दाटून आला की, अंतरातील निःशब्द कृतज्ञतेचे बोल अंतर्यामी महाविष्णूला ऐकू येतात आणि तो स्वतः प्रसन्न होऊन सातवे आणि अंतिम द्वार आपल्यासाठी उघडतो.

६ इ ७ आ. भगवंताने आपल्याला दिलेले सर्वकाही त्याच्या श्री चरणी कृतज्ञतेने अर्पण करूया ! : कृतज्ञतेविना साधनेतील कोणताच प्रयत्न पूर्ण होत नाही. प्रयत्न करून आपल्याकडे जर त्याचा कर्तेपणा राहिला, तर आपण वैकुंठधामापर्यंत पोचू शकणार नाही. त्यामुळे ईश्‍वराने जे शिकवले, जे करवून घेतले, जे जे दिले, त्याचे सर्व श्रेय त्याच्या चरणी समर्पित करणे अत्यंत महत्त्वाचे असते. ‘कृतज्ञता’ या लहानशा शब्दात उच्च कोटीचा समर्पणाचा भाव आणूया आणि भगवंताने आपल्याला दिलेले सर्व त्याच्या श्री चरणी कृतज्ञतेने अर्पण करूया. या कृतज्ञताभावाच्या पुष्पांची भरलेली आेंजळ आपण श्रीविष्णूच्या कोमल चरणांवर समर्पित करूया.

७. सप्तद्वारांना पार करून साक्षात् वैकुंठलोकातील महाविष्णूचे मनोहारी दर्शन घेऊन वैकुंठलोकात असल्याचीच अनुभूती क्षणोक्षणी घेऊया !

विष्णुलोकाच्या सप्तद्वारांचे अवलोकन करूया. विष्णुलोकाची सप्तद्वारे – १. गुरुकृपा, २. तळमळ, ३. शरणागती, ४. श्रद्धा, ५. आज्ञापालन, ६. सातत्य आणि ७. कृतज्ञता.

विष्णुलोकाच्या या सप्तद्वारांना पार करण्यासाठी क्षणोक्षणी प्रयत्न करूया. हाच ध्यास धरून आपण प्रत्येक कृती करूया. या सप्तद्वारांना पार करून आपण साक्षात् वैकुंठलोकातील महाविष्णूचे मनोहारी दर्शन घेऊया. वैकुंठलोकात असल्याचीच अनुभूती आपल्याला क्षणोक्षणी घ्यायची आहे. आताच्या क्षणापासून आपण सर्वांनी आपल्या मूळ घरात, म्हणजे वैकुंठातच रहायचे आहे.

८. कृतज्ञता

भगवान श्री विष्णुच आपल्या सर्वांचे आश्रयस्थान आहे. अशा श्रीविष्णूने वैकुंठलोकाच्या सप्तद्वारांची ओळख करून देऊन त्यांतून आत प्रवेश करण्याचा मार्गही आपल्याला दाखवला आहे. त्या सप्तद्वारांनी वैकुंठलोकात प्रवेश करून आपण महाविष्णूचे पावन दर्शन घेऊन त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया. अत्यंत दयाळू, कृपाळू, करुणामय आणि भक्तवत्सल असणार्‍या श्रीहरीने आपल्या हातांमध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केले आहे. पितांबरधारी, कौस्तुभ मणी धारण करणार्‍या, सुंदर कमलासमान नेत्र असणार्‍या भगवान श्रीविष्णूूच्या कोमल चरणी कृतज्ञतेची भावसुमनांजली समर्पित करूया !’

(समाप्त)

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(संदर्भ : २६.११.२०२० या दिवशी भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतलेला ‘वैकुंठ चतुर्दशी’ हा विषय)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक