‘३ ते ८.१०.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री शाकंभरीदेवीचा होम चालू होता. तो पहात असतांना मला पुढील अनुभूती आल्या.

१. श्री अन्नपूर्णादेवीचे चित्र सजीव वाटणे
होमाच्या दुसर्या दिवशी सभागृहामध्ये होमाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीम) चालू होते. मी पडद्यावर श्री अन्नपूर्णादेवीचे चित्र पहात होते. तेव्हा ‘मला ते चित्र सजीव वाटून श्री अन्नपूर्णामाता सर्व साधकांकडे वात्सल्यभावाने पहात आहे’, असे मला जाणवले. नवरात्रीच्या तिसर्या दिवशी आश्रमात श्री शाकंभरीदेवीचा होम चालू झाला. तेव्हा मी सेवा करत होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला ‘आज सेवा करत श्री अन्नपूर्णामातेचा नामजप करूया.’ मी प्रार्थना केली, ‘हे श्री अन्नपूर्णामाते, या होमाचे चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे.’
२. ‘श्री अन्नपूर्णादेवीच्या आज्ञाचक्रातून पिवळसर प्रकाश बाहेर पडून तो साधिकेच्या आज्ञाचक्रात जाऊन तिच्या संपूर्ण शरिरात पसरत आहे’, असे तिला जाणवणे
सेवा संपल्यानंतर मी सभागृहात गेले. तेथे पडद्यावर शाकंभरीदेवीच्या होमाचे थेट प्रक्षेपण चालू होते. तेव्हा पडद्यावर श्री अन्नपूर्णादेवीचे चित्र दिसत होते. मी त्या चित्राकडे पहात असतांना ‘देवीच्या आज्ञाचक्रातून पिवळसर प्रकाश माझ्या दिशेने येत आहे आणि माझ्या आज्ञाचक्रातून संपूर्ण शरिरामध्ये पसरत आहे’, असे मला साधारण ५ मिनिटे जाणवत होते. तेव्हा माझ्या आज्ञाचक्रावर मला संवेदना जाणवत होत्या. माझे मन निर्विचार झाले होते. मला पुष्कळ शांत वाटत होते.
३. चंडी होमाच्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आज्ञाचक्रातून पिवळसर प्रकाश वातावरणात प्रक्षेपित होत असल्याचे दिसून मन निर्विचार होणे
९.१०.२०२४ या दिवशी आश्रमात चंडी होम होता. त्या वेळी प.पू. गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला यज्ञस्थळी बसण्याची संधी मिळाली. चंडी होमाच्या वेळी हवन चालू होते. तेव्हा मला ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे रूप विशाल वाटत होते आणि ‘त्यांच्या आज्ञाचक्रातून पिवळसर प्रकाश वातावरणात प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवत होते. असे मला ५ मिनिटे दिसत होते. तेव्हा माझे मन निर्विचार झाले होते. मला पुष्कळ हलके वाटत होते.
४. ‘साधिकेची दोन सूक्ष्म रूपे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांजवळ जाऊन त्यांची आरती करत आहेत’, असे दृश्य तिला दिसणे
होमाच्या समाप्तीनंतर सर्वांनी देवीची आरती म्हणण्यास आरंभ केला. तेव्हा मला माझ्या आज्ञाचक्रावर संवेदना जाणवत होत्या. माझे मन निर्विचार झाले होते. त्या वेळी माझ्या देहातून माझी २ सूक्ष्म रूपे बाहेर पडलेली मला दिसत होती. त्यातील एक रूप श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणांजवळ गेले आणि दुसरे रूप श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरणांजवळ गेले. ‘ती सूक्ष्म रूपे श्रीसत्शक्ति (साै.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची आरती करत आहेत’, असे दृश्य मला दिसत होते. नंतर मी प्रार्थना केली, ‘हे मातांनो, मला तुमच्यामध्ये एकरूप होता येऊ दे. मला अन्य काही नको.’ माझी प्रार्थना आणि नामजप चालूच होता.
५. साधिकेची ‘दोन्ही सूक्ष्म रूपे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या देहामध्ये सामावली जात आहेत’, असे दृश्य दिसणे
थोड्या वेळाने मला ‘माझे एक सूक्ष्म रूप श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या देहामध्ये, तर दुसरे रूप श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या देहामध्ये सामावले जात आहे’, असे दृश्य दिसत होते. तेव्हा मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. माझ्या मनाची एक वेगळीच स्थिती निर्माण झाली होती. जेव्हा शेवटी पुरोहित साधकांनी आता ‘सद्गुरूंचा श्लोक म्हणूया’, असे सांगितले, तेव्हा मी भानावर आले. तेव्हा मला पुष्कळ हलके आणि अतिशय शांत वाटत होते.
दोन्ही सद्गुरूंच्या कृपेने मला हे अनुभवता आले. याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता पुष्पे अर्पण करते.’
– सौ. संगीता शिवाजी चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |