‘२.२.२०२५ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘आयुष्य होम’ आणि ‘देवी होम’ झाले. त्या वेळी मला आश्रमात उपस्थित रहाता आले नाही. तेव्हा रात्री ७.३० वाजता घरी मी या होमांचा मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी प्रार्थना करून नामजप करत होते.

१. नामजप करत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याशी संबंधित भावजागृतीचा प्रयोग करणे
मी नामजप करत असतांना मानसरित्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मांडीवर जाऊन बसले. तेव्हा मला प्रत्यक्षात यज्ञकुंडाजवळ बसल्यावर जशी उष्णता जाणवते, तशी धग जाणवत होती. मी पांढर्या रंगाच्या गोळ्याच्या स्वरूपात होते. काही कालावधीनंतर मी उठून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उजव्या चरणाच्या अंगठ्याशी जाऊन बसले. त्यांच्या चरणांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला सहन झाले नाही; म्हणून मी तेथून उठून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मांडीवर जाऊन बसले. होमाची उष्णता जाणवू लागल्यावर मी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उजव्या चरणाच्या अंगठ्याशी जाऊन बसले. ‘त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य सहन करता यावे’, यासाठी मी त्यांनाच प्रार्थना केली.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दोन्ही आध्यात्मिक उत्तराधिकारी बाह्यांगाने भिन्न असल्या तरी अंतर्यामी एकरूप असल्याविषयी साधिकेला दिसलेले दृश्य
माझ्या मनात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासंबंधी विचार चालू झाले. मला अकस्मात् दोघी एकमेकींत विलीन झालेल्या दिसल्या. मी नीट पाहिल्यावर मला एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे दर्शन झाले. मी डोळे मिटून त्यांचे दर्शन घेतले. नंतर मी डोळे उघडून पाहिल्यावर मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे दर्शन झाले. मी परत डोळे मिटले आणि प्रार्थना केली. मी डोळे उघडल्यावर मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे दर्शन झाले. त्यांच्या या दर्शनाने मी भावविभोर झाले. प्रत्येक वेळी मला दोन्हींपैकी एकीचेच दर्शन होत होते.
३. दोन्ही देवींचे दर्शन झाल्याने आनंद होणे
‘माझी ही स्थिती किती वेळ होती ?’, हे माझ्या लक्षात आले नाही. भ्रमणभाषवर गजर वाजल्यावर मी डोळे उघडले. माझी नामजपाची वेळ संपली होती. दोन्ही देवींचे ( श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे) दर्शन झाल्याने मी पुष्कळ आनंदात होते. मी होमाच्या ठिकाणी प्रत्यक्ष न जाताही देवाने मला जे अनुभवायला दिले, ते अलौकिक होते.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या देहाने भिन्न असल्या, तरी अंतरी एकरूप झाल्या आहेत’, हे मला अनुभवायला दिले’, त्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– श्रीमती सुनीता चितळे (वय ७२ वर्षे), फोंडा, गोवा. (२४.२.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |