तीव्र शारीरिक त्रास असूनही गुरूंप्रती असलेल्या अपार भावामुळे धानोरा (जिल्हा बीड) येथील श्री. महादेव गायकवाड (वय ८२ वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

धानोरा (जिल्हा बीड) – तीव्र शारीरिक त्रास असूनही अखंड नामस्मरण करणारे आणि वारकरी संप्रदायानुसार साधना करणारे धानोरा येथील श्री. महादेव गायकवाड (वय ८२ वर्षे) यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सनातनच्या संत पू. दीपाली मतकर यांनी दिली. २४ मार्च २०२५ या दिवशी धानोरा येथील गायकवाड वस्तीवर आयोजित एका अनौपचारिक सत्संगात पू. दीपाली मतकर यांनी श्री. गायकवाड यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये उलगडून त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची आनंदवार्ता दिली. या वेळी श्री. गायकवाड यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांचे कुटुंबीय, तसेच साधक श्री. हिरालाल तिवारी, श्री. ज्ञानदीप चोरमले, ‘अहिल्यानगर मंदिर महासंघा’चे संयोजक श्री. भरत शिंदे, श्री. रामेश्वर भुकन आणि श्री. सुनील ससाणे आदी उपस्थित होते. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारे त्यांच्या मोठ्या मुलाचे कुटुंबीयही संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून या सोहळ्यात सहभागी झाले होते. या वेळी सर्व कुटुंबीय आणि साधक यांना पुष्कळ आनंद झाला आणि त्यांचा भाव जागृत झाला. 

श्री. महादेव गायकवाड

माझे गुरु संत बाळूदेव महाराज यांनीच सर्व केले ! – महादेव गायकवाड

माझे गुरु संत बाळूदेव महाराज यांनीच सर्व केले आहे, मी काहीच केले नाही. मला कुठलीच प्रसिद्धी नको आहे.

श्री. महादेव गायकवाड यांच्या साधनाप्रवासाविषयी नातेवाईकांनी व्यक्त केलेले मनोगत 

ही वार्ता आम्हा कुटुंबियांसाठी आनंदाची मोठी पर्वणी आहे !– दामोदर गायकवाड (श्री. महादेव गायकवाड यांचा मोठा मुलगा), रामनाथी आश्रम, गोवा 

परमपूज्यांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) बाबांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले, ही आम्हा गायकवाड कुटुंबियांसाठी आनंदाची पुष्कळ मोठी पर्वणी आहे. त्याविषयी परमपूज्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

श्री. महादेव गायकवाड यांचा सन्मान करतांना पू. दीपाली मतकर

काकांनी लहानपणापासून भोळ्या भाबड्या भावाने साधना केली ! – सौ. मनीषा गायकवाड (श्री. महादेव गायकवाड यांची मोठी सून)

काकांनी लहानपणापासून भोळ्या भाबड्या भावाने साधना केली त्याचे फळ देवाने त्यांना दिले. (हे सांगतांना त्यांची भाव जागृती होत होती.) काकांनी सासरी आल्यापासून मला माझ्या वडिलांप्रमाणे सांभाळले, तसेच माझ्या सर्व भावंडांना आणि आईलाही वडिलांप्रमाणे आधार देऊन सांभाळले. ते मला एकदाही रागावून बोललेले नाहीत.

आज आनंदी आनंद झाला ।
संत बाळूदेव महाराजांचा शिष्य
जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाला ।।

भोळ्या भाबड्यापणाने निःस्वार्थपणे केली गुरुसेवा ।
त्याचा आज मिळाला गोड गोड मेवा ।
गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ।।

आजोबांची निःस्वार्थ समाजसेवा भगवंताच्या चरणी पोचली ! – ऋषिकेश गायकवाड, (श्री. महादेव गायकवाड यांचा नातू), देवद आश्रम

आजोबा अध्यात्माविषयी, गुरूंकडून त्यांना होत असलेल्या आत्मज्ञानाविषयी सांगत असतांना ऐकत रहावे वाटते. त्यांचे गुरु बाळूदेव महाराज यांच्या विषयीचे प्रसंग ते पुष्कळ भावपूर्ण सांगतात. त्यातून त्यांचा गुरूंप्रती अत्युच्च भाव अनुभवायला मिळतो. त्यांची निःस्वार्थ समाजसेवा भगवंताची चरणी पोचली, असे वाटले.

श्री. आशुतोष गायकवाड (श्री. महादेव गायकवाड यांचा नातू), रामनाथी आश्रम

पूर्वी त्यांना वाटायचे आम्ही हुशार आहोत, तर चांगली नोकरी करावी; मात्र नंतर आम्ही पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यावर आमच्यावर समाजातील मुलांपेक्षा चांगले संस्कार आहेत, हे पाहून त्यांना अभिमान आणि कौतुक वाटायचे. यावरून देव कसे कुटुंबियांमधे पालट करतो, हे लक्षात आले. आजोबांची चांगली साधना असल्यामुळे आम्ही पूर्णवेळ साधना करत आहोत.

देवाच्या अनुसंधानात असणारे श्री. महादेव गायकवाड !

‘१९.२.२०२५ या दिवशी धानोरा (जिल्हा बीड) येथे श्री. महादेव गायकवाड यांच्याशी माझी भेट झाली. श्री. महादेव गायकवाड वारकरी आहेत. या भेटीच्या दरम्यान देवाच्या कृपेमुळे त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. राम होनप

१. गुरूंच्या आज्ञेने निष्काम भावाने लोकांची सेवा करणे

वर्ष १९७६ मध्ये आजोबांना गुरुमंत्र मिळाला. ते त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनुसार मंत्रांद्वारे लोकांना झालेला नागीण हा आजार बरा करतात आणि विंचू दंश उतरवतात. आतापर्यंत त्यांनी ४०० गावांतून आलेल्या लोकांवर विनामूल्य उपचार केले आहेत. त्यानिमित्त लोकांनी आजोबांना काही पैसे दिल्यास ते पैसे स्वतःसाठी न वापरता त्याचा गुरुकार्यासाठी उपयोग करतात.

२. उतारवयातही सतत इतरांचा विचार करणे 

आजोबांची दृष्टी अंधूक झाली आहे. त्यांचे वय ८२ वर्षे आहे. त्यांच्याकडे अनेक जण कोणत्याही वेळी नागीण उतरवण्यासाठी येत असतात. त्या वेळी आजोबा स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता तत्परतेने त्या लोकांवर उपचार करतात.

३. आजोबांशी साधलेला संवाद आणि त्यातून लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

३ अ. अनेक लोकांवर उपचार करूनही गुरूंच्या कृपेमुळे त्रास न होणे 

मी : तुम्ही आतापर्यंत मंत्रांद्वारे अनेक लोकांचा नागीण हा आजार बरा केला किंवा त्यांना झालेला विंचूदंश उतरवले आहेत. त्यामुळे तुम्हाला काही त्रास होतात का ?

श्री. गायकवाडआजोबा : ‘गुरूंनी दिलेला मंत्र आणि गुरूंची शक्ती’, हीच कार्य करत असते. त्यामुळे मला कधीच त्रास झाला नाही.

३ आ. अखंड देवाच्या स्मरणात असणारे महादेवआजोबा !

मी : आपला दिवसभर नामजप चालू असतो ना ?

श्री. गायकवाडआजोबा : हो. गुरूंनी मला दिलेला मंत्र सतत चालू असतो.

मी : जेव्हा तुमचा नामजप होत नाही, तेव्हा तुम्हाला आतून ईश्वरी आनंद जाणवत असतो ना ?

श्री. गायकवाडआजोबा : हो.

३ इ. मला ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटत होते.

३ ई. ‘त्यांच्या वाणीत चैतन्य आहे. त्यामुळे मला चैतन्य मिळत आहेत’, असे मला जाणवले.

३ उ. मला त्यांच्या सहवासात आनंद जाणवत होता.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०२५)

काकांची साधना पुष्कळ भोळ्या भावाने चालू आहे ! – श्रीमती इंदुबाई भुकन (श्री. महादेव गायकवाड यांच्या मोठ्या सुनेची आई)

काकांची साधना पुष्कळ भोळ्या भावाने चालू आहे. काका आणि मी पहिल्यापासून बहीण-भाऊ या नात्यानेच वागलो. आम्ही एकमेकांना भेटलो की, माझ्या सख्ख्या भावालाच भेटले असे वाटते. माझ्या पतींचे निधन झाल्यानंतर गायकवाड काकांकडून मला सर्व शिकवण मिळाली. देवाने मला त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे साधना कशी करायची, हे शिकवले. काकांचा साधनाप्रवास जलद गतीने होवो, हीच गुरुचरणी शरणागतभावाने प्रार्थना !

काकांना भेटल्यावर साधनेचीच प्रेरणा मिळते ! – रामेश्वर भुकन (सुनेचा भाऊ)

काकांनी आमच्या कुटुंबियांना निरपेक्षपणे पुष्कळ साहाय्य केले आहे. त्यांनी केलेल्या साहाय्यामुळेच आमचे सर्व व्यवस्थित होऊन आम्ही पूर्णवेळ साधना करू शकलो. काकांना भेटल्यावर त्यांच्याकडून मला साधनेचीच प्रेरणा मिळते. त्यांच्या आठवणीनेही मन शांत आणि स्थिर होते.

ते नेहमी देवाविषयी बोलायचे ! – वाल्मीक भुकन (सुनेचा भाऊ)

काकांचा मला लहानपणापासून सत्संग मिळाला. ते नेहमी देवाविषयी बोलायचे. ते त्यांच्या गुरूंची लहानपणापासून कशी सेवा करायचे ? ते आम्हाला सांगायचे. त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. ते कधीही कुणावर रागावले नाहीत आणि कुणाशी भांडले नाहीत.