सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पासाठी (एस्.टी.पी.) सर्वंकष धोरण सिद्ध होणार ! – पुणे महानगरपालिका

पुणे – शहरातील गृहसंकुले , तसेच मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये उभारण्यात आलेला सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प (एस्.टी.पी.) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर बंद ठेवले जात असल्याने या प्रकल्पांसाठी सर्वंकष धोरण सिद्ध केले जाणार आहे. सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहेत कि नाही ? यावरही ऑनलाईन पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. १०० हून अधिक सदनिका असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये सांडपाणी आणि मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. त्या अन्वये सोसायट्यांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जातात; मात्र पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर हे प्रकल्प बंद ठेवले जात असल्याने महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पांवरील ताण वाढत आहे. त्यामुळे सोसायट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भातील सर्वंकष धोरण आखण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.