भरमसाठ वीजदेयक आकारल्याच्या निषेधार्थ भाजपकडून राज्यभर वीजदेयकांची होळी

लातूर – कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटात असतांना दळणवळण बंदीच्या काळात ग्राहकांना भरमसाठ वीजदेयके दिल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने राज्यभर वीजदेयकांची होळी करण्यात आली. लातूर येथे वीज वितरण आस्थापनाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. घरगुती वापराच्या मीटरसमवेत शेतीपंपाचे वीजदेयक अधिक प्रमाणात आकारल्याने भाजपच्या वतीने वीजदेयकांची होळी करण्यात आली.

या वेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

धाराशिव – येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी वीजदेयकांची होळी करून घोषणा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे म्हणाले की, यापूर्वीही वाढीव वीजदेयकांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली; मात्र सर्वसामान्य जनतेला या सरकारने न्याय दिला नाही, तसेच कोणतीही सवलत दिली नाही. त्यामुळे आम्ही सरकारचा तीव्र निषेध करत आहोत.

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – येथे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन यांच्यासह अन्य पदाधिकारी यांंच्या उपस्थितीत महावितरण कार्यालयासमोर वीजदेयकांची होळी करण्यात आली.