‘देहली येथील सेवाकेंद्राची जागा अपुरी पडत असल्याने सेवाकेंद्रासाठी नवीन वास्तू पाहिली. नवीन वास्तू पाहिल्यावर साधकांना जाणवले, ‘देवाने जणू सनातनच्या सेवाकेंद्रासाठी हीच जागा सुनियोजित केली आहे.’ १.११.२०१९ मध्ये या वास्तूत गृहप्रवेश करण्यात आला.
ही जागा शोधतांना, जुन्या सेवाकेंद्रातून नवीन वास्तूत सामानांचे स्थलांतर करतांना, तसेच गृहप्रवेश करतांना साधकांना ‘देव समवेत आहे. तोच शक्ती देत आहे. देवामुळेच सर्व सहजतेने होत आहे’, अशा अनुभूती आल्या. त्या येथे दिल्या आहेत.
१. सेवाकेंद्रासाठी जागा शोधतांना साधकांना आलेल्या अनुभूती
१ अ. सेवाकेंद्रासाठी नवीन सदनिका शोधतांना एका व्यक्तीने ‘फार्म हाऊस’ बघण्यास सुचवणे, एके ठिकाणी ‘फार्म हाऊस’ पाहिल्यावर ‘देहलीसारख्या शहरात आर्थिकदृष्ट्या परवडेल’, अशा किमतीत ‘फार्म हाऊस’ मिळणे’, हे केवळ दैवी नियोजनाप्रमाणे होत असल्याचे जाणवणे आणि ‘घरमालकानेही तुम्हाला पाहिल्यावर तुमच्यासाठीच हे घर आहे’, असे सांगून घर भाड्याने देणे : ‘देहली येथील सध्याची सेवाकेंद्राची जागा अपुरी पडत असल्याने ‘सेवाकेंद्रासाठी नवीन जागा मिळते का ?’, ते पहाण्याचे ठरले. आम्ही विविध ठिकाणी जाऊन सदनिका पहात होतो. एका व्यक्तीने आम्हाला ‘तुम्ही सदनिका का पहाता ? तुम्हाला ‘फार्म हाऊस’ चालेल का ?’, असे विचारले. आम्ही ‘फार्म हाऊस’ची कल्पनाच केली नव्हती; कारण ‘देहलीसारख्या शहरात ‘फार्म हाऊस’ पुष्कळ महाग असेल, तसेच ते शहरापासून फार दूर असेल’, असे आम्हाला वाटले होते. ‘या व्यक्तीच्या माध्यमातून देवानेच सुचवले होते’, हे आमच्या लक्षात आले. त्या भागात न्यूनतम २०० ‘फार्म हाऊस’ असतील; पण ‘त्यातील नेमके हेच घर आणि आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडेल अशा किमतीत मिळणे’, हे केवळ दैवी नियोजनाप्रमाणे होत आहे’, असे आम्हाला ‘फार्म हाऊस’ पाहिल्यावर जाणवले. घरमालकांनीही आम्हाला सांगितले, ‘‘आमच्याकडे अनेक जण घर भाड्याने घेण्यासाठी आले होते; पण आम्ही त्यांना हे घर दिले नाही. ‘तुमच्याकडे पाहून हे घर तुमच्यासाठीच आहे’, असे आमच्या लक्षात आले. तुम्हालाच हे घर द्यायचे आहे.’’ त्यानंतर काही कारणास्तव आम्ही अन्य ठिकाणे पाहिली; पण सर्व ठिकाणे पाहिल्यावर ‘देवाने सनातनच्या सेवाकेंद्रासाठी हेच घर ठरवले आहे’, ते आम्हाला लक्षात आणून दिले.
१ आ. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे घर पहाण्यासाठी गेल्यावर लख्ख ऊन असतांना पावसाची रिमझिम चालू होणे : आम्ही सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना घर दाखवण्यासाठी घेऊन आलो. त्या वेळी लख्ख ऊन होते; पण त्याच वेळी पावसाची रिमझिम चालू झाली. तेव्हा सद्गुरु पिंगळेकाकांनी ‘देवाने हा संकेत दिला आहे’, असे सांगितले.’
– श्री. अभय वर्तक
१ इ. ‘नवीन सेवाकेंद्र घ्यायचे आहे, असे निश्चित झाल्यापासून माझ्या मनाची एक वेगळी स्थिती होती.’ – सौ. केतकी येळेगावकर
१ ई. अनुभूतींच्या माध्यमातून गुरुदेवांनी स्थानमहात्म्य सांगितल्याने सेवाकेंद्राची स्थानदेवता आणि वास्तुदेवता यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे अन् नवीन सेवाकेंद्रात गेल्यानंतर ‘साधनेत पुढे जाण्यासाठी आणखी प्रयत्न करायचे आहेत’, या विचाराने उत्साह वाढणे : ‘नवीन सेवाकेंद्रात जायचे ठरल्यावर मला गुरुदेवांच्या संदर्भात अनुभूती यायला लागल्या. त्या अनुभूतींच्या माध्यमातून सूक्ष्मातून गुरुदेवांनी मला सांगितले, ‘या स्थानावर राहून तुझी जेवढी साधना होणार होती, ती झाली आहे. आता पुढील साधनेसाठी वेगळे स्थान निश्चित आहे.’ यावरून ‘प्रत्येक स्थानाचे महत्त्व आहे’, हे लक्षात येऊन मला सध्या रहात असलेल्या सेवाकेंद्राची स्थानदेवता आणि वास्तुदेवता यांच्याप्रती कृतज्ञता वाटू लागली. नवीन सेवाकेंद्रात गेल्यानंतर ‘साधनेत पुढे जाण्यासाठी आणखी प्रयत्न करायचे आहेत’, या विचाराने माझा उत्साह वाढला.’ – प्रियंका सिंह
१ उ. पूर्वसूचना
१ उ १. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी देहली सेवाकेंद्र दुसर्या ठिकाणी होणार असल्याचे सांगून नवीन वास्तूचे छायाचित्र दाखवणे, त्या वेळी २ दिवसांपूर्वी स्वप्नात दिसलेले सभागृह तसेच असल्याचे लक्षात येणे : ‘३०.१.२०१९ या दिवशी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे मथुरा येथे आले होते. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘देहली येथील सेवाकेंद्र दुसर्या ठिकाणी असणार आहे.’’ त्यांनी मला त्यांच्या भ्रमणभाषवर नवीन वास्तूचे एक छायाचित्र आणि एक ‘व्हिडिओ’ (चलत्चित्र) दाखवला. ते पाहून २ दिवसांपूर्वी मला दिसलेल्या स्वप्नाची आठवण झाली. त्या स्वप्नात मला दिसले होते, ‘एका सभागृहात बरेच साहित्य पसरले आहे. तेथे पुष्कळ साधक सेवा करत आहेत. सद्गुरु पिंगळेकाका साधकांना ‘त्या साहित्याचे काय करायचे ?’, ते सांगत आहेत.’ त्यानंतर माझे डोळे उघडले. सद्गुरु पिंगळेकाकांनी ‘व्हिडिओ’त दाखवल्याप्रमाणे ते सभागृह होते. ‘२ दिवसांपूर्वी देहली सेवाकेंद्र नवीन ठिकाणी असणार आहे’, ते मला ठाऊक नव्हते. त्या स्वप्नातील दृश्य, म्हणजे देहली सेवाकेंद्राच्या स्थलांतराची मला मिळालेली पूर्वसूचना होती.’ तेव्हा सद्गुरु पिंगळेकाकांच्या चरणी माझी कृतज्ञता व्यक्त झाली.’ – विनय वर्मा, मथुरा
१ ऊ २. सेवाकेंद्रात गेल्यावर ३ दिवसांपूर्वी स्वप्नामध्ये सेवाकेंद्र पाहिल्याचे लक्षात येणे : ‘गृहप्रवेशाच्या दिवशी मला सेवाकेंद्रात सेवेला जाण्याची संधी मिळाली. सेवाकेंद्रात गेल्यावर माझ्या लक्षात आले, ‘३ दिवसांपूर्वी मी स्वप्नात पाहिलेले सेवाकेंद्र असेच होते.’
त्या रात्री स्वप्नात मला पुढील दृश्य दिसले, ‘सद्गुरु पिंगळेकाका सर्व साधकांच्या हस्तरेषा पहात आहेत. तेव्हा मी पाठीमागे राहिले. त्यानंतर मी सद्गुरु पिंगळेकाकांना म्हटले, ‘तुम्ही माझा हात पाहिला नाही.’ त्यावर सद्गुरु पिंगळेकाका मला म्हणाले, ‘तुमचाही हात पाहीन; पण आता लवकरात लवकर येथून बाहेर पडा.’ तेव्हा मला कळले, ‘तेथे जोरदार लढाई चालू झाली आहे.’ सद्गुरु काका सर्व साधकांचा हात पकडून त्यांना पुढे घेऊन जात आहेत. ते सर्वांना ‘इथून लवकरात लवकर बाहेर पडून पुढे जा’, असे सांगत आहेत.’ त्या दिवशी सेवाकेंद्रात सेवा करतांना माझा अधिक प्रमाणात नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त झाल्या.
– सौ. राजबाला यादव, फरीदाबाद
२. भगवान श्रीविष्णूच्या कृपाशीर्वादाने सेवाकेंद्रासाठी मिळालेल्या नवीन वास्तूची वैशिष्ट्ये
२ अ. देहलीतील अल्प प्रदूषण असणारे ठिकाण : ‘देहली शहर प्रदूषणाच्या विळख्यात असतांना केवळ सेवाकेंद्र असलेल्या ठिकाणचा परिसर अल्प प्रदूषण असणारा आहे. देहलीचा प्रदूषण नियंत्रण निर्देशांक (इंडेक्स) सर्वसाधारणपणे ३०० अंश सेल्सिअसपर्यंत असतो. तो अतीप्रदूषित भागात ५०० अंश सेल्सिअसच्या आसपास असतो. या नवीन सेवाकेंद्राच्या परिसराचा पट्टा हा १८० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.
२ आ. मुख्य शहर आणि विमानतळ यांपासून जवळ : ‘देहलीसारख्या महागड्या शहरात विमानतळापासून केवळ ३० मिनिटांच्या अंतरावर आणि मुख्य शहरापासून १७ कि.मी. अंतरावर एखादे ‘फार्म हाऊस’ मिळणे अन् तेही सात्त्विक मालकांचे मिळणे’, हे केवळ आणि केवळ सृष्टीच्या निर्माणकर्त्या भगवान श्रीविष्णूच्या कृपाशीर्वादानेच होऊ शकते’, असे सर्व साधक अनुभवत आहेत.
२ इ. सात्त्विक परिसर : ‘फार्म हाऊस’, म्हणजे ‘पार्ट्या’ आणि रज-तम यांचे आगर असते; पण केवळ हेच ‘फार्म हाऊस’ आणि त्या सभोवतीचा परिसरही सात्त्विक आहे. या ‘फार्म हाऊस’शेजारी शिव आणि हनुमान या देवतांची मंदिरे आहेत अन् थोड्या अंतरावर जैन मंदिर आहे. सभोवती मोर आहेत. या परिसरात गाड्यांचा आवाज ऐकू येत नाही, तर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो.
देवाने साधकांच्या साधनेसाठी असे सात्त्विक वातावरण दिले आहे. यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांशी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे. ‘साधकांची साधना व्हावी, त्यांनी साधनेत पुढे जावे, त्यांना साधना करतांना त्रास होऊ नये’, याची ते पदोपदी आणि क्षणोक्षणी काळजी घेत आहेत. त्यांना ‘माझ्या मुलांची (साधकांची) आध्यात्मिक प्रगती व्हावी’, एवढेच वाटते.’
– श्री. अभय वर्तक (१०.११.२०१९)
३. नवीन वास्तूत साहित्य स्थलांतर करतांना साधकांना आलेल्या अनुभूती
३ अ. नवीन सेवाकेंद्रात जाण्यापूर्वी शरिराला खाज येणे, औषधोपचार करूनही लाभ न होणे आणि स्थलांतराची सेवा करतांना धुळीत सेवा करूनही नंतर खाज न येणे : ‘नवीन सेवाकेंद्रात जाण्याच्या आधी माझ्या पूर्ण शरिराला खाज येत होती. त्यामुळे मला रात्री झोप लागायची नाही. औषधोपचार आणि नामजपादी उपाय करूनही मला लाभ होत नव्हता. सेवाकेंद्राचे स्थलांतर करण्याच्या वेळी सामानाची बांधणी करतांना मी धुळीत सेवा केली. तेव्हा मला येत असलेली खाज धुळीमुळे वाढण्याऐवजी त्यानंतर माझ्या शरिराला खाज आली नाही.’ – कु. प्रियंका सिंह
३ आ. ‘नवीन सेवाकेंद्रात सामान नेण्याची सेवा करतांना मला ताण किंवा थकवा जाणवला नाही. ‘माझी शारीरिक क्षमता वाढली आहे’, असे मला जाणवले.’ – सौ. केतकी येळेगावकर
३ इ. शारीरिक सेवा करूनही थकवा न जाणवता उत्साह आणि चैतन्य जाणवणे : ‘सामानाची बांधणी करणे आणि ते नवीन सेवाकेंद्रात नेणे’, या शारीरिक सेवा करतांना मी अखंड सेवारत असूनही मला थकवा जाणवत नव्हता. सेवा संपल्यावरही मला उत्साह आणि चैतन्य जाणवत होते. ‘सद्गुरु पिंगळेकाकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष गुरुदेव सर्व साधकांना शक्ती देऊन सर्वांची मने जुळवून सेवा करवून घेत आहेत’, असेही मला जाणवले.’ – सौ. स्वानंदी जाधव
३ ई. प्रारब्धात असलेल्या शारीरिक व्याधी भोगण्यासाठी भगवंत बळ देत असल्याने शारीरिक त्रास असूनही क्षमतेच्या अनेक पटींनी सेवा करणे
३ ई १. मागील १० वर्षांपासून पाठदुखीचा त्रास असूनही स्थलांतराच्या वेळी शारीरिक सेवा करूनही दुखण्यात वाढ न होणे आणि तहान-भूक विसरून सेवा करणे, यावरून ‘देवाला अशक्य असे काहीच नाही’, या सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या वाक्याची प्रचीती येणे : ‘मागील १० वर्षांपासून मला पाठदुखीचा त्रास आहे आणि ३ वर्षांपासून हाडे दुखणे अन् थकवा येणे, असे त्रास होतात. मला पुढे वाकून कृती करता येत नाहीत आणि आधुनिक वैद्यांनी मला ‘वजन उचलू नका’, असे सांगितले आहे. त्यामुळे साहित्य हालवण्याच्या वेळी ‘मी काही सेवा करू शकेन’, अशी शक्यता नव्हती. ‘साधकांनी प्रत्यक्ष सेवेला आरंभ केल्यावर मी त्यांच्या समवेत कधी सेवा करू लागलो ?’, हे मलाही कळले नाही. सेवा करू लागल्यावर माझ्यात आपोआप उत्साह निर्माण झाला. त्या वेळी या शारीरिक सेवा करूनही माझे शारीरिक दुखणे थोडेही वाढले नाही. माझ्या प्रारब्धात जे शारीरिक दुखणे किंवा व्याधी आहेत, ते भोगण्यासाठी भगवंत मला बळ देत आहे. त्यामुळे मी माझ्या क्षमतेच्या अनेक पटींनी अधिक सेवा करू शकलो. सेवा करतांना मला तहान-भूक किंवा वेळ यांचीही जाणीव होत नसे. ‘देवाला अशक्य असे काहीच नाही’, या सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या वाक्याची देवाने मला ४ दिवस अखंड प्रचीती दिली.
३ ई २.‘भगवंताने सद्गुरूंच्या माध्यमातून बळ पुरवून सेवा करवून घेणे : काही दिवसांपूर्वी सद्गुरु पिंगळेकाका साधकांशी बोलतांना सहज म्हणाले, ‘‘तुम्ही सर्व जण सेवा करता आणि मला काही न करता थकवा येतो.’’ देवाने सेवाकेंद्र स्थलांतराच्या वेळी माझ्यासारख्या सक्षम नसलेल्या जिवाकडून सेवा करवून घेतली, त्या वेळी मला सद्गुरु पिंगळेकाकांच्या वरील वाक्याची आठवण झाली. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘भगवंत सद्गुरूंच्या माध्यमातून मला बळ पुरवत आहे आणि सेवा करवून घेत आहे; पण स्वभावदोष आणि अज्ञान यांमुळे मला त्याची जाणीव होत नाही.’
‘अशीच अखंड सेवा या जिवाकडून करवून घ्यावी’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करतो.’
– श्री. श्रीराम लुकतुके
३ उ. ईश्वर शक्ती देत असल्याची जाणीव होऊन शारीरिक सेवा उत्साहाने करणे : ‘सेवाकेेंद्रातील साहित्य हालवायचे असल्याने त्या कालावधीत आम्ही उत्साहाने पुष्कळ शारीरिक सेवा केली. तेव्हा ‘ईश्वर आम्हाला शक्ती देत आहे आणि गुरुदेव सद्गुरु पिंगळेकाकांच्या रूपात येऊन आम्हाला लहान-सहान गोष्टी सांगत आहेत. ‘सामान कसे ठेवायचे ?’, तेे शिकवत आहेत’, असे वाटले.’ – कु. मनीषा माहुर
३ ऊ. ‘प्रत्यक्ष देवता सेवा करण्यासाठी शक्ती देत आहेत’, असे जाणवून आनंद मिळणे : ‘सेवाकेंद्रातील साहित्याचे स्थलांतर करतांना ‘प्रत्यक्ष देवताच सेवा करण्यासाठी शक्ती देत आहेत’, असे मला जाणवले. ‘सेवा कशी होत आहे ?’, हे मला समजत नव्हते. माझ्याकडून आपोआप प्रयत्न होत होते. पहिल्या दिवशी सेवा झाल्यानंतर मला थोडाही थकवा आला नाही. माझ्या मनातील अनावश्यक विचारांचे प्रमाण पुष्कळ न्यून होऊन मला शांत वाटत होते. मला केवळ आनंद मिळत होता. दुसर्या दिवशीही सेवा करतांना मला पुष्कळ चांगले वाटले.’
– कु. देवदत्त व्हनमारे (वय १४ वर्षे)
३ ए. ईश्वरी तत्त्व प्रत्यक्ष कार्यरत होऊन साधकांकडून सेवा करवून घेत असल्याने सेवा गतीने होणे : ‘सेवाकेंद्र स्थलांतर करतांना सामान बांधणी करणे, हिंदु अधिवेशनाची सेवा आणि साधकांचे दिवाळीला घरी जाण्याचे नियोजन इत्यादी एकाच वेळी आले, तरीही साधकसंख्या अल्प असूनही सामान बांधणीची सेवा गतीने झाली. ‘ही सेवा करतांना साधकांची मने आपोआप जुळली आहेत’, असे मला जाणवले. सर्व साधकांनी सेवा संघभावाने आणि आनंदाने केली. ‘ईश्वरी तत्त्व प्रत्यक्ष कार्यरत होऊन साधकांकडून सामान बांधणीची सेवा करवून घेत आहे’, याची मला पुनःपुन्हा जाणीव होत होती.’ – सौ. स्वानंदी जाधव
३ ऐ. वानरसेनेने रामसेतू बांधला, त्याप्रमाणे ‘सामान स्थलांतर करत आहोत’, असे वाटणे आणि सद्गुरु डॉ. पिंगळे यांना पाहून ‘ते श्रीराम आहेत’, असे जाणवून आनंद होणे : ‘जुन्या देहली सेवाकेंद्रातील तिसर्या माळ्यावरील सामान खाली आणायचे होते. त्या वेळी मला रामसेतू बांधतांनाचा प्रसंग आठवला, ‘वानरसेनेने एकेक दगड उचलून दुसर्याला दिला आणि श्रीरामसेतूची निर्मिती झाली.’ त्याचप्रमाणे ‘आम्ही काही साधक साखळी करून तिसर्या मजल्यापासून तळमजल्यापर्यंत सामान खाली आणत आहोत’, असे मला वाटले. रामसेतू बांधतांनाचा हा प्रसंग पुन:पुन्हा आठवून मला आनंद होत होता. आम्ही सामान खाली आणत असतांना तेथे सद्गुरु पिंगळेकाका उपस्थित होते. त्यांना पाहून ‘ते श्रीराम आहेत’, असे मला जाणवले. ‘श्रीराम आणि प.पू. गुरुदेव यांच्या कृपेमुळे मला ही आनंदाची अनुभूती आली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’ – श्री. हरिकृष्ण शर्मा, नोएडा (१०.११.२०१९)
४. गृहप्रवेश करतांना आलेल्या अनुभूती
४ अ. वास्तूमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ‘प.पू. गुरुदेव आपल्या समवेत आहेत’, असा भाव ठेवून सेवाकेंद्राच्या वास्तूदेवतेला प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्यावर सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवून भावजागृती होणे : ‘नवीन सेवाकेंद्रात गृहप्रवेश करतांना साधकांनी भगवान श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमा अन् श्री गुरुपादुका हातांत घेतल्या होत्या. वास्तूमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितले, ‘‘प.पू. गुरुदेव आपल्या समवेत आहेत’, असा भाव ठेवून सेवाकेंद्राच्या वास्तूदेवतेला (वास्तूला) प्रदक्षिणा घालूया.’’ ते ऐकून ‘परात्पर गुरुदेव प्रत्यक्ष येथे उपस्थित आहेत. ते आमच्या साधनेसाठी किती करत आहेत !’, या कृतज्ञतेने माझी भावजागृती झाली.’ – सौ. स्वानंदी जाधव
४ आ. ध्यानमंदिरात देवता आणि गुरुपादुका यांची स्थापना केली. तेव्हा ‘ध्यानमंदिर गर्भगृह आहे आणि संपूर्ण सेवाकेंद्र म्हणजे मंदिर आहे’, असा विचार माझ्या मनात तीव्रतेने येऊन माझा भाव जागृत झाला आणि माझी कृतज्ञता व्यक्त झाली. गुरुदेवांनी आम्हाला या सेवाकेंद्रात रहाण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ – कु. राशि खत्री
४ इ. ‘गृहप्रवेश करतांना साधक मंत्र म्हणत होते. तेव्हा मला ‘रामनाथी आश्रमात यज्ञ चालू असतांना जसे वातावरण असते, त्याप्रमाणे जाणवले. त्या वेळी मला सूक्ष्मातील गुरुदेवांचे अस्तित्वही जाणवले. गुरुदेवांचे पुष्कळ स्मरण होऊन माझी भावजागृती झाली.’ – कु. मनीषा माहुर
४ ई. गृहप्रवेशाच्या वेळी श्रीविष्णूचे अस्तित्व जाणवणे
१. ‘सेवाकेंद्रात प्रवेश करतांना एक साधक परात्पर गुरुदेवांच्या चरणपादुका घेऊन फाटकाबाहेर उभा होता. त्या वेळी वेदमंत्रांचेही पठण चालू होते. तेव्हा ‘तेथे साक्षात् विष्णु उभा आहे’, असे मला दिसले.
२. चरणपादुका घेऊन सेवाकेंद्राला प्रदक्षिणा घालत असतांना ‘साक्षात् श्रीविष्णु आमच्या पुढे चालत आहे आणि आम्ही सर्व साधक त्याच्या पाठीमागे चालत आहोत’, असे मला दिसले.
३. आरतीच्या वेळी ‘साक्षात् श्रीविष्णूची आरती करत आहे’, असे मला दिसले.
– कु. पूनम किंगर, फरीदाबाद
४ उ. परात्पर गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अस्तित्व जाणवण्याच्या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती
१. ‘सद्गुरु पिंगळेकाका गाडीतून सेवाकेंद्रात आले. तेव्हा ‘गुरुदेवांची रथयात्रा आली आहे’, असे मला वाटले.
२. सेवाकेंद्राला प्रदक्षिणा घालतांना ‘प.पू. गुरुदेव पुढे चालत आहेत. त्यांच्या मागे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सर्व संत अन् त्यांच्या मागे आम्ही सर्व साधक चालत आहोत’, असे मला जाणवत होते.
३. दीप प्रज्वलित करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्याप्रमाणे ‘दीपावली साजरी करत आहे’, असे मला वाटले. मला दिव्याच्या ज्योतीमध्ये पुष्कळ प्रमाणात तेज जाणवत होते. ‘सेवाकेंद्र चैतन्याने भरलेले आहे. जणू काही आम्ही ब्रह्मलोकात आहोत’, असे मला वाटले.
– सौ. मंजुला कपूर, देहली
४ ए. आरतीनंतर देह पुष्कळ हलका झाल्याचे जाणवणे : ‘श्रीकृष्णाची आरती झाल्यानंतर मला जाणवले, ‘माझ्या जवळपास अन्य कुणीही नाही. माझा देह पुष्कळ हलका झाला आहे. मला स्वतःचेही अस्तित्व जाणवत नव्हते. त्या वेळी मला देवघरात निळा प्रकाश दिसला. तेथे असणार्या श्रीकृष्णाच्या चित्राकडून चमकदार किरण येतांना दिसले. त्यानंतर थोड्या वेळाने मला स्वत:चे अस्तित्व जाणवू लागले.’- श्रीमती ज्योती राणे, देहली
५. नवीन सेवाकेंद्रात साधकांना आलेल्या अनुभूती
५ अ. देवाशी अनुसंधान वाढणे, सेवा सहजतेने होणे
५ अ १. देवाशी अनुसंधान वाढणे : ‘नवीन सेवाकेंद्रात आल्यापासून माझे देवाशी अनुसंधान वाढले आहे. माझ्याकडून प.पू. भक्तराज महाराज यांची भजने मनापासून ऐकली जातात. माझ्याकडून प्रार्थना आणि नामजप आपोआप होतात अन् मधूनमधून माझी भावजागृती होते. माझ्याकडून नकळतपणे शरीरदेवतेला नमस्कार होतो.
५ अ २. सेवा सहजतेने होणे : माझ्याकडून सेवा सहजतेने होते. ‘मी सेवा करत नसून माझ्याकडून कुणीतरी सेवा करवून घेत आहे’, असा विचार माझ्या मनात सतत येतो.
५ अ ३. ‘मी चालतांना कधी कधी माझे पाय भूमीवर नाहीत’, असे मला वाटते.’
– सौ. केतकी येळेगावकर
५ आ. क्षमता नसतांना गुरुदेवांच्या कृपेमुळे शारीरिक सेवा करता येणे आणि ‘त्या माध्यमातून गुरुदेवांनी प्रारब्ध न्यून केले आहे’, असे जाणवणे : ‘मी घरात थोडी शारीरिक कामे केली, तरी मला थकवा येतो आणि झोपावेसे वाटते; पण त्या दिवशी गुरुदेवांनी माझ्याकडून ज्या प्रमाणात शारीरिक सेवा करवून घेतली, तेवढी करण्याची माझी क्षमता नाही. ‘या सेवेच्या माध्यमातून त्यांनी माझे शारीरिक प्रारब्ध न्यून केले’, असे मला जाणवले.’
५ इ. सेवाकेंद्रातील पायर्या पुसत असतांना पायर्यांनी ‘श्रीकृष्ण आधीपासूनच येथे असल्याने तू येथे आली आहेस’, असे सांगितल्याचे जाणवणे : ‘नवीन सेवाकेंद्रात मला पायर्या पुसण्याची सेवा मिळाल्यावर माझी भावजागृती झाली. त्या पायर्यांना मी म्हटले, ‘येथे आता श्रीकृष्ण येणार आहे.’’ तेव्हा पायर्या मला म्हणाल्या, ‘येथे श्रीकृष्ण आधीपासून आहे; म्हणून तू येथे आली आहेस.’
– सौ. मोहिनी कुलकर्णी, नोएडा
६. शेजारी असलेल्या शिवाच्या मंदिरात प्रार्थना केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे
‘नवीन सेवाकेंद्राच्या शेजारी असलेल्या शिवाच्या मंदिरात प्रार्थना केल्यावर मला तेथे सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले. ते मला म्हणाले, ‘शिव आणि शक्ती यांच्या रूपांत मी येथे आहे.’ मला हे ऐकून आनंद झाला आणि माझी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. प्रणव मणेरीकर (१०.११.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |