असे आंदोलन ग्रामस्थांना का करावे लागते ? प्रशासन निष्क्रीय झाले आहे का ?
सावंतवाडी – मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली येथे पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात इन्सुली गावच्या ग्रामस्थांनी कुडवटेम्ब येथे खड्ड्यात बसून आंदोलन केले. अनुमाने २ घंटे केलेल्या या आंदोलनामुळे येथे वाहतुकीची कोंडी झाली. त्यानंतर महामार्ग विभागाचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी ‘८ दिवसांत खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करतो’, असे आश्वासन दिले. त्यानंतर इन्सुली ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. (आंदोलन केल्यांनतर ८ दिवसांत खड्डे बुजवण्याचे आश्वासन देणार्या अधिकार्यांनी खड्डे आधीच का बुजवले नाहीत ? कि आंदोलन केल्याखेरीज जनतेच्या समस्यांची नोंद न घेण्याची सवयच आता प्रशासकीय अधिकार्यांना झाली आहे ? अशांवर शासनाने कारवाई का करू नये ? – संपादक)
इन्सुली घाटापासून जुन्या ‘आर्.टी.ओ.’ तपासणी नाक्यापर्यंत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर दिवसागणिक १-२ अपघात होत असतात. या रस्त्यावरून दुचाकी चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. गेले अनेक मास या ठिकाणी खड्डे पडलेले असूनही संबंधित अधिकार्यांनी याची नोंद घेतली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. स्वागत नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी सरपंच तात्या वेंगुर्लेकर, नंदू पालव, नाना पेडणेकर, माजी उपसरपंच सत्यवान केरकर, ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी आदी अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते. वाहतूक कोंडी झाल्यानंतर बांदा पोलीस उपनिरीक्षक ढोबळे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी पोचला. (खड्ड्यांमुळे वाहनांना नियमित अपघात होत असतांना पोलीस एवढे दिवस काय करत होते ? रस्ता वाहतुकीसाठी चांगला असावा, हे त्यांचे दायित्व नाही का ? – संपादक) त्यांनी ग्रामस्थांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावरून बाजूला काढण्याचा प्रयत्न केल्यावर महामार्गाचे अधिकारी येईपर्यंत रस्त्यावरून बाजूला न होण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिले. महामार्ग अधिकारी अनिल आवटी यांनी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतले असले, तरी ८ दिवसांत रस्ता सुरळीत न झाल्यास महामार्ग बंद करण्याची चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे. (यावरून प्रशासनाची विश्वासार्हता किती आहे, हेच दिसून येते ! – संपादक)