
मुंबई – सातारा जिल्ह्यातील तासगाव येथे बांधण्यात आलेल्या साकवाचे काम योग्य पद्धतीने आणि गावकर्यांच्या संमतीनेच झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी विधान परिषदेमध्ये दिली. सदस्य शशिकांत शिंदे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मंत्री बोलत होते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘हा साकव वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या साकवासाठीची जागा निश्चित करतांना संबंधित गावाचे संरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, समाजकल्याण अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष पहाणी करून स्थान निश्चित केले होते. या निश्चित केलेल्या ठिकाणीच पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे, तसेच याआधीही हा प्रश्न पावसाळी अधिवेशनात उपस्थित झाला होता, त्या वेळी तत्कालीन मंत्र्यांनी दुसर्या एका साकवाच्या कामाची ग्वाही दिली होती आणि तोही आता पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. चाचणीद्वारे हे स्पष्ट झाले आहे की, या प्रकरणात बांधकाम विभागाची कोणतीही चूक नाही. असे असले, तरी सदस्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून हा विषय ग्रामविकास विभाग आणि समाजकल्याण विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जाईल.’’