न ह्यतो धर्मचरणं किंचिदस्ति महत्तरम् ।
यथा पितरि शुश्रूषा तस्य वा वचनक्रिया ॥
– वाल्मीकि रामायण, अयोध्याकांड, सर्ग १९, श्लोक २२
अर्थ : पित्याची शुश्रूषा करणे अथवा त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे, यापेक्षा कोणतेही धर्माचरण श्रेष्ठ नाही.
वनवासाला निघतांना पितृसेवा आणि पित्राज्ञा यांविषयी श्रीरामाचे उद्गार वरील श्लोकात व्यक्त झाले आहेत. भक्त पुंडलिकाची गोष्ट, तर या संदर्भात सर्वप्रसिद्धच आहे.
नम्रता आणि नमस्कार यांचे संस्कार बालपणीच होणे आवश्यक !
पूर्वी सायंकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावून प्रार्थना म्हणून झाली की, घरातील लहान मुले सर्व वडिलधार्या मंडळींना खाली वाकून नमस्कार करत असत. प्रतिदिन वाकून नमस्कार करण्याचे संस्कार अगदी बालवयापासूनच आग्रहपूर्वक करावे लागतात. असे संस्कारसंपन्न बालमन पुढील आयुष्यात थोरांसमोर कधी उर्मटपणा करणार नाही, याची निश्चिती बाळगावी.
बालपणी नम्रतेचे संस्कार लक्षपूर्वक झाले नाहीत आणि मूल तरुण होऊन त्याचे मन एकदा का निबर झाले की, बुद्धीला नम्रता पटली, तरी ताठ मन खाली वाकून नमस्कार करायला सहसा सिद्ध होत नाही. येथे अहंकार आड येत असतो; म्हणून नम्रतेचे आणि नमस्काराचे संस्कार बालपणीच करावयाचे असतात, हे विसरू नये.
माता आणि पिता यांनी केलेल्या ऋणाचे चिंतन आवश्यक !
इहलोकात माणसाला जन्म मिळतो तो आई-वडिलांमुळे. सर्व विश्व पहाण्यासाठी डोळे, फिरण्यासाठी पाय, सत्कार्यासाठी हात, शुभ संदेश ऐकण्यासाठी दोन कान, मंगल बोलण्यासाठी जीभ, उत्तम खाण्यासाठी दात आणि तोंड, तसेच उच्च विचार करण्यासाठी मन इतकी प्रचंड साधनसामग्री केवळ आई-वडिलांमुळेच कुणालाही मिळत असते. त्यामुळे प्रत्येकाचे दैवत त्याच्या घरीच असते. आपल्या घरातली किंवा आसपासची लहान मुले आणि त्यांचे संगोपन त्यांचे माता-पिता किती विविध प्रकारे करत असतात, इकडे एकदा नीट लक्ष देऊन पहावे, म्हणजे लक्षात येईल की, कुणालाही उभ्या आयुष्यात आपल्या माता-पित्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होताच येणार नाही.
घरच्या वृद्ध मातृपितृरूप दैवतांकडे पूर्ण दुर्लक्ष किंवा मनात अढी वा तिरस्कार असतांना केलेली देवभक्ती, तीर्थयात्रा, दानधर्म, पूजापाठ, जपजाप्य आणि समाजकार्य या सर्वांचे मोल म्हणजे एक प्रचंड आकाराचे शून्य; पण यांपैकी काहीही न करता केवळ दिवस-रात्र आपल्या आईची किंवा वडिलांची पूर्ण श्रद्धेने, सद्भावनेने सेवा केली, एक व्रताचरण म्हणून शुश्रूषा केली किंवा त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानली, तर अन्य कोणतेही वेगळे पुण्यकर्म किंवा वेगळे धर्माचरण करण्याची तशी आवश्यकताच नाही.
प्रभु श्रीरामांनी वडिलांची आज्ञा मानून वनवासाला जाणे, ही एकमेवाद्वितीय घटना !
प्रभु श्रीरामांनी महर्षि विश्वामित्रांकडून विद्याग्रहण केली, त्राटिका राक्षसी, खर, दूषण इत्यादी राक्षसांचा दंडकारण्यात वध केला, जनकराजाच्या मिथिला नगरीत शिवधनुष्याचा भंग करून जानकीची पत्नी म्हणून प्राप्ती केली, सुग्रीवाशी मैत्री, कुंभकर्ण आणि रावणाचा वध करून लंकेच्या सिंहासनावर बिभिषणाची स्थापना अन् शेवटी भरतभेटीनंतर अयोध्येच्या सिंहासनावर सम्राट म्हणून राज्याभिषेक करून घेतला. यातील प्रत्येक घटना श्रीरामांचा पराक्रम, पुरुषार्थ, साहस, धैर्य इत्यादी बरेच सद्गुण दाखवतात; पण या सर्व घटनांमध्ये शिरोभागी जाऊन राहिलेली एकमेवाद्वितीय घटना म्हणजे त्यांनी आपले पिताश्री राजा दशरथांची आज्ञा प्रमाण मानून सिंहासनाचा त्याग करून
१४ वर्षे वनवासाला जाण्याचा निर्णय घेणे ही होय. समजा श्रीरामांनी दशरथाची आज्ञा धुडकावून लावली असती तर ? तर त्यांना राज्याभिषेक झाला असता किंवा त्यांचा वनवास चुकला असता ! पण त्यांनी केलेला इतर पुरुषार्थ कितीही मोठ्या योग्यतेचा असता, तरीही पित्राज्ञा भंग करण्याने त्यांना कधीही प्रतिष्ठा आणि देवत्व प्राप्त झाले नसते, हे निश्चित.
भक्त पुंडलिकाकडे तरी अशी कोणती गौरवाची गोष्ट होती ? विद्वान, ज्ञानमूर्ती, प्रसिद्ध पंडित, प्रतिभावंत, ग्रंथकार, संगीतकार किंवा फार मोठा श्रीमंत वा थोर तपस्वी यांपैकी कोणत्या गुणवत्तेसाठी पुंडलिक प्रसिद्ध होता ? त्याच्याकडे होते मातृ-पितृ सेवेचे शस्त्र ! त्यामुळे तो साधा माणूस ऐतिहासिक झाला.
देवाला साष्टांग नमस्कार घालणारा अहंकारामुळे माता-पित्यांना साधा नमस्कारही करत नाही !
मूर्तीची पूजाअर्चा करणे तुलनेने फार सोपे असते; पण जिवंत माणसाला सेवेने वश करणे तसे फार फार कठीण असते. याच अर्थाने ‘सेवाधर्मः परमगहनो योगीनाम् अपि अगम्यः ।’ (नीतिशतक, श्लोक ४२) म्हणजे ‘सेवाधर्म आचरणे पुष्कळ कठीण आणि योग्यांनाही अगम्य आहे.’ असे भर्तुहरिने म्हटले आहे. मंदिरातील मूर्तीला साष्टांग नमस्कार घालणारा माणूस घरातल्या मातृ-पितृरूपातील दैवताला वाकून नव्हे, तर साधा नमस्कार करायला प्रवृत्त होत नाही, हाही नित्याचा अनुभव आहे; कारण दगडाच्या मूर्तीसमोर वाकतांना अहंकार दुखावण्याचा प्रश्न नसतो; पण जिवंत व्यक्तीसमोर वाकतांना अहंकाराचे टोक मोडते. त्याचा मानसिक त्रास होतो; म्हणून माणूस बालपणापासून नम्र नसेल, तर केवळ घरी आई-वडील आहेत, यासाठी तो त्यांची सेवा करणार नाही किंवा त्यांच्यासमोर वाकणारही नाही.
आई-वडिलांचे मनापासूनचे आशीर्वाद हे त्यांच्या अपत्यांना मिळालेलेच असतात. ती सहजक्रिया प्रेमातून आणि रक्ताच्या नात्यातून घडत असते. कोणतेही आई-वडील सहसा आपल्या मुलांचे अनिष्ट कधी चिंतित नाहीत; पण हा झाला मातृ-पितृधर्म; मात्र जोपर्यंत पुत्रधर्माने, सेवाशुश्रूषेच्या मार्गाने मुलांनी आपल्या माता-पित्यांना मनोभावे प्रसन्न करून घेतलेले नसते, तोपर्यंत त्यांचा आशीर्वाद हा एकांगी असतो. त्याला फारसा अर्थ नसतो. त्या आशीर्वादाने मुलांचे अकल्याण होणार नाही, हे खरं असलं, तरी त्या आशीर्वादाने मुलांना फारसे यशही मिळणार नाही हेही निश्चितच असते, हे विसरू नये.
अहंकार न्यून झाल्याविना आज्ञापालन होणे अशक्य !
कुणाची आज्ञापालन करावयाची ही वाटते तितकी साधी गोष्ट नाही. पित्याची आज्ञा प्रमाण मानावयाची, ती एक व्रत म्हणून किंवा श्रेष्ठ धर्माचरण म्हणून, ही भूमिका मुळात पुत्राची असली पाहिजे. कुणाची आज्ञा आचरणात आणावयाची म्हणजे मनाला आज्ञा ऐकण्याची सवय आणि संस्कार असावे लागतात. दुसर्याला आज्ञा करण्यात माणूस जेवढा रस घेतो, त्यामानाने आज्ञाधारक होणे सोपे नसते. कुणाची आज्ञा पाळावयाची म्हणजे प्रथम त्या आज्ञेला महत्त्व द्यावे लागते. त्यामुळे स्वतःचा अहंकार आणि महत्त्व दूर ठेवणे भाग पडते. तसेच मिळालेली आज्ञा प्रिय असेलच असे नाही. ती कदाचित् अप्रियही असण्याची शक्यता असते. आज्ञा कोणतीही का असेना, पुढच्या भविष्याचा कसलाही विचार न करता ती आज्ञा ऐकता क्षणीच कृतीत आणण्यासाठी, एक पवित्र कर्तव्य म्हणून तत्पर असणे, ही घटनाच अत्यंत दुर्मिळ आणि फार भाग्याची अन् ऐतिहासिक ठरू शकते.
प्रिय सोडून अप्रिय ज्याला स्वीकारता येत नाही, त्याला आज्ञापालन कदापि जमणार नाही. अहंकाराचे वारे अंगातून पूर्णांशाने गेल्याविना कुणालाही आज्ञापालन कधीही शक्य होणार नाही. स्वतःचे मोठेपण, स्वतःचे विद्याधन आणि स्वतःची सामाजिक प्रतिष्ठा हे सर्व महत्त्व पूर्णपणे विसरल्यावाचून कुणालाही आज्ञापालन कधी जमणार नाही. आज्ञापालन हीच ईशसेवा, आज्ञापालन हेच प्रधान कर्तव्य आणि पित्राज्ञापालन हेच श्रेष्ठ धर्माचरण, असे सर्वांगाने स्वीकारल्याखेरीज कुणालाही आज्ञापालन पूर्णार्थाने करताच येणार नाही, याची नोंद असावी.
पितृसेवा आणि आज्ञापालन यांच्या व्रताचरणाचे रहस्य अन् सामर्थ्य !
प्रभु श्रीरामांनी आज्ञापालन करतांना, भगवान श्रीकृष्णांनी सांदीपनी ऋषींची आश्रमात सेवा करतांना, भक्त पुंडलिकाने आई-वडिलांची सेवा करतांना किंवा तरुण नरेंद्राने (स्वामी विवेकानंद यांनी) रामकृष्ण परमहंसांची सेवा करतांना भवितव्याचा कधीही विचार केलेला नव्हता, याचे भान असू द्यावे.
पित्याची सेवा किंवा आज्ञापालन करणे म्हणजे सर्वश्रेष्ठ व्रताचरण करणे होय. श्रीरामांनी एका आज्ञापालनापायी स्वतःच्या न्याय्य अधिकाराचे (हक्क) राजसिंहासन नाकारले हे खरे; पण त्यामुळेच ते मानवतेच्या हृदयसिंहासनावर सदासाठी आरूढ होऊन गेले. त्यांनी सिंहासनाचा त्याग केला. त्यामुळे ‘श्रीरामांचा सिंहासनत्याग’ हा विश्वाचा अलंकार ठरला. एका पितृआज्ञापालनाने श्रीराम विश्ववंद्य ठरले. विश्वाचे प्रेरणास्रोत ठरले आणि महामहीम झाले.
पितृसेवा आणि आज्ञापालनाच्या व्रताचरणाचे रहस्य अन् सामर्थ्य लक्षात आले की, वृद्धाश्रमाचे प्रस्थ आणि कौतुक करण्याचे स्तोम गौण ठरेल. वृद्धाश्रम हा सामाजिक कलंक असून ती सुविद्य अशा विज्ञानयुगातल्या माणसांची शोकांतिका आहे, हे लक्षात आले, तर स्वतःचे घर हेच ‘देवमंदिर’ होईल.
मातृदेवो भव । पितृदेवो भव ।
– दाजी पणशीकर (संदर्भ : सामना, ६.६.२०१०)