भारतात एकात्मिक प्रमुखाची (थिएटर कमांडची) आवश्यकता !

‘वर्ष २०२२ पर्यंत ‘थिएटर कमांड’ रचना अस्तित्वात येईल आणि ‘त्या अंतर्गत पाच कमांड असू शकतील’, असे जनरल रावत यांनी अलीकडेच घोषित केले होते. भारतीय सैन्यदलांचे ‘पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ म्हणून जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती झाल्यानंतर ‘थिएटर कमांड’च्या रचनेला वेग आला. त्यात ‘जम्मू-काश्मीरची एक कमांड आणि नौदलाच्या अखत्यारीतील पश्‍चिम अन् पूर्व कमांड एकत्र करून संपूर्ण सागरी आव्हानासाठी एकच अशी द्विकल्पीय किंवा पेनिन्सुलार कमांड उभारली जाईल’, असेही त्यांनी सूचित केले. थिएटर कमांडवर सध्या विचारमंथन चालू आहे. ते प्रत्यक्ष कार्यान्वित होणे ३ वर्षांत शक्य दिसत नाही; पण थिएटर कमांडच्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे, हे नक्की ! यासंदर्भातील काही सूत्रांचा ऊहापोह या लेखाच्या माध्यमातून केला आहे.

१. लढाईसाठी एकात्मिक प्रमुख आवश्यक !

निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन

भारतीय सैन्याच्या म्हणजे भूदलाच्या ७ कमांड, हवाई दलाच्या ६ आणि नौदलाच्या ४ कमांड अशा एकूण १७ कमांडमध्ये संरक्षण दलाच्या तिन्ही दलांचा पसारा विभागलेला आहे. प्रत्यक्षात एखाद्या क्षेत्रामध्ये लढाईची वेळ येते, तेव्हा मात्र सैन्य, हवाई दल आणि नौदल यांपैकी दोन किंवा तिन्ही दलांचा एकमेकांत समन्वय राखून एकत्रित कारवाई करण्याची आवश्यकता भासते. केवळ युद्धच नव्हे, तर पूर, त्सुनामी, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी शोध अन् बचावकार्य, तसेच साहाय्य पुरवतांना ते कधी कधी नौदलाच्या युद्धनौकांवरून पाठवावे लागते, तर कधी हवाई दलाच्या युद्ध सामग्रीवाहक विमानांमधून लष्करी साहित्य, सैनिक उतरवले जातात. या सर्व आवश्यकता पहाता तिन्ही दलांमध्ये समन्वय राखणारा एकात्मिक प्रमुख (थिएटर कमांड) असणे ही काळाची आवश्यकता आहे.

२. वर्ष १९७१ च्या लढाईनंतर ‘थिएटर कमांड’ची संकल्पना अस्तित्वात

थिएटर कमांडची आवश्यकता सर्वांत प्रथम वर्ष १९७१ च्या लढाईनंतर भारताचे सेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी व्यक्त केली होती; कारण वर्ष १९७१ च्या लढाईनंतर त्यांच्या लक्षात आले की, जर सर्व एकत्रित असते, तर लढाई अजून चांगल्या पद्धतीने लढता आली असती. युद्धाचे डावपेच सदैव पालटत असल्यानेच युद्ध किंवा यासदृश कारवाया आता विशिष्ट सैन्यदलापुरत्या मर्यादित रहाणार नाहीत. युद्धातील अशा पालटत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच भारतात ‘थिएटर कमांड’ आवश्यक आहे. वर्ष १९७१ मध्ये भूदल आणि हवाई दल यांनी एकत्रित कारवाई केली, तिचे मुख्य कारण होते, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे उत्तुंग आणि भव्य व्यक्तीमत्त्व ! आता तंत्रज्ञान वेगाने पालटत आहे. उपग्रह आणि अवकाश यांचाही वापर संरक्षणासाठी होऊ लागला आहे. युद्धाच्या आवाहनानुसार भारतीय संरक्षण दलातील तिन्ही दलांचे मनुष्यबळ, त्यांची युद्धसामग्री, शस्त्र, दारूगोळा, रसदपुरवठा यांचे एकत्रीकरण झाले पाहिजे अन् सर्व प्रकारच्या लढाया एकत्रित लढल्या पाहिजेत.

३. सध्या कार्यरत असलेले १७ कमांड आणि त्यांचे दायित्व

सध्या संरक्षण दलाच्या तिन्ही शाखांमध्ये मिळून १७ कमांड कार्यरत आहेत. लष्कराचे ७, हवाई दलाचे ७ आणि नौदलाचे ३ अशा प्रकारे त्यांची विभागणी केली आहे. या कमांड सर्वसाधारणपणे भौगोलिक सीमांनुसार आहेत. त्याअंतर्गत प्रत्येक सैन्यदलामध्ये फौजफाटा आणि सामग्री यांची विभागणी केलेली असते. सैन्याच्या उत्तर कमांडकडे काश्मीरमधील कारवायांचे, तर पूर्व कमांडकडे ईशान्येतील कारवाया आणि चीनच्या सीमा यांचे दायित्व असते. नौदलाच्या पश्‍चिम कमांडकडे ईशान्येतील कारवाया आणि चीनच्या सीमा यांचे दायित्व आहे. तसेच अरबी समुद्र आणि पाकिस्तानचे आव्हान अन् आखातातून येणार्‍या व्यापारउदिमाच्या संरक्षणाचे अन् तेलफळाटांचे दायित्व आहे. भारतीय हवाई दलाच्या दक्षिण आणि वायव्य कमांडकडे मुंबई, तसेच पाकिस्तानलगतच्या वाळवंटापर्यंतच्या सीमांचे दायित्व आहे. प्रत्यक्षात तिन्ही दलांमध्ये समन्वय राखून कारवाई करणे महत्त्वाचे असते. कधी सर्जिकल स्ट्राईक करतांना, तुकड्या उतरवतांना किंवा शस्त्रे-दारूगोळा पोचवतांना सैन्याला हेलिकॉप्टर वा विमाने यांची आवश्यकता भासते. कधी अँफिबिअस युद्ध करतांना एखाद्या बेटावर नौकेतून सैनिकी तुकड्या आणि रणगाडे नेणेही आवश्यक ठरते.

४. ‘थिएटर कमांड’मुळे साधनस्रोतांच्या वापरातील व्ययाची पुनरावृत्ती टळेल !

‘थिएटर कमांड’ची संकल्पना प्रथम वर्ष १९५९ मध्ये ब्रिटन, १९८६ मध्ये अमेरिका, फ्रान्स, चीन आणि जपान यांनी स्वीकारली. भारत मात्र काहीच करत नव्हता. या पुनर्रचनेचा सर्वांत मोठा लाभ साधनस्रोतांच्या वापरातील व्ययाची पुनरावृत्ती टळू शकेल. यात क्षेपणास्त्रे आणि हेलिकॉप्टर रिपेअर डेपो या सुविधाही येऊ शकतात. कमांडच्या स्थापनेमागे जो हेतू प्राधान्यक्रमावर असेल, त्या हेतूनुसार तिन्ही दलापैकी कुणाकडे नेतृत्व द्यायचे, ते निश्‍चित होईल. पहिल्या कमांडची स्थापना केल्यावर मिळालेल्या अनुभवानुसार काही दुरुस्त्या कराव्या लागतील.

५. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’चे दायित्व 

सर्व कमांडचे नेतृत्व करणारे कमांडर देहलीतील मुख्यालयात असलेल्या ‘चीफ ऑफ डिफेन्स’ यांना उत्तरदायी असतील. या सर्वांच्या, तसेच तिन्ही दलांच्या वतीने ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे संरक्षणमंत्री आणि पंतप्रधान यांच्या संपर्कात राहून योग्य ती व्यूहरचना, रणनीती आखू शकतील. त्यामुळे यापूर्वीच्या युद्धांमध्ये तिन्ही दलांकडून वेगवेगळ्या सूचना सरकारकडे जाण्याचा निर्माण झालेला धोकाही टळू शकेल. तसेच गुप्तवार्तांचे संकलन, मनुष्यबळ व्यवस्थापनही अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. अत्याधुनिक पद्धतीच्या युद्धामध्ये वापरल्या जाणार्‍या आधुनिक यंत्रणा आणि लष्करी संसाधनेही मर्यादित असतात. त्यांचा आवश्यकतेनुसार योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वापर करणे शक्य होईल.

६. स्वतंत्रपणे सिद्ध करावी लागणार असलेली तत्त्वप्रणाली

कोणत्याही युद्धात १७ कमांड एकत्र लढाई लढू शकत नाहीत; मात्र नवी प्रणाली कार्यान्वित करण्यापूर्वी त्याची पुनर्रचना करावी लागेल. काही कमांड तिन्ही शाखांचे असतील, तर काही कमांड २ सैन्यदलांपुरत्याही असतील. सभोवतीची आव्हाने, पारंपरिक प्रतिस्पर्ध्याची सैनिकी शक्ती, तंत्रज्ञानातील पालट, घुसखोरी या सर्व गोष्टींच्या निकषांवर सैन्यदलाच्या आवश्यकता काय आहेत ?, खरेदी काय करायची आहे ?, प्रशिक्षण कसे द्यायचे ?, आपली भूमिका काय ठेवायची ?, याची तत्त्वप्रणाली प्रत्येक सैन्यदलाला सध्या स्वतंत्रपणे सिद्ध करावी लागेल. प्रत्येक ‘थिएटर कमांड’चे डॉक्ट्रीन संयुक्तपणे सिद्ध करावी लागतील. सध्या प्रत्येक सैन्यदलाचा आर्थिक आराखडा आणि अर्थसंकल्पही वेगवेगळा असतो. आता तोही कमांडच्या आवश्यकतेेनुसार एकत्र लागेल.

७. ‘थिएटर कमांड’कडील वाटचाल सैन्यदलामधील समन्वयाच्या दृष्टीने आवश्यक !

संयुक्त कमांडमध्ये तिन्ही दलांना लागणार्‍या आधारभूत सुविधा एका छत्राखाली येतील. रसदपुरवठा आणि नियोजन (लॉजिस्टिक्स), रुग्णालये-वैद्यकसेवा, अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, प्रशिक्षण या सेवांचा वापर एकाच छत्रातून झाला, तर निधी वाचेल. ‘थिएटर कमांड’ उभारतांना आवाहनानुसार फौजफाटा आणि साधनसामुग्री देता येईल. आपल्याकडे यापूर्वीच पाकिस्तान आणि चीन यांच्या सीमांवर ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप’चा प्रयोग भारतीय सैन्यांतर्गत करण्यात आला होता. पाक सीमेवर पश्‍चिम कमांड अंतर्गत ९ कोअर आणि पूर्व कमांड अंतर्गत चीन सीमेवर १७ कोअर या आयबीजींच्या तुकड्या उभारून त्यांना पायदळ अन् इतर सामग्री एका छताखाली देण्याची योजना राबवण्यात आली आहे. ‘थिएटर कमांड’कडे वाटचाल ही सैन्यदलामधील समन्वयाच्या दृष्टीने आवश्यक आहे.

८. भारताने अन्य देशांचे अंधानुकरण न करता स्वतंत्र प्रारूप सिद्ध करत ‘थिएटर कमांड’चा निर्णय अमलात आणावा !

अनेक युद्धसराव मोहिमांमध्ये तिन्ही दले एकत्र भाग घेतात. त्याची वारंवारता यापुढे वाढवावी लागेल. कमांड-कंट्रोल, आदेश-समन्वय या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. भविष्यातील युद्ध कोणतेही एक सशस्त्र दल स्वबळावर लढवू शकणार नाही. त्यासाठी तिन्ही सशस्त्र दलांच्या एकत्रीकरणाची आवश्यकता आहे. त्याचसाठी तिन्ही दलांच्या एकत्रित मुख्यालयांची (थिएटर कमांड) शिफारस केली गेली आहे. त्या दिशेने भारताने नुकतेच पहिले पाऊल टाकले आहे. यापुढे मात्र भारताने इतर देशांचे अंधानुकरण न करता स्वतंत्र प्रारूप सिद्ध करत ‘थिएटर कमांड’चा निर्णय कार्यवाहीत आणणे आवश्यक आहे. त्यासाठी भारताच्या भौगोलिक आणि सामारिक आवश्यकता लक्षात घ्याव्या लागतील. स्वतंत्र धोरण ठरवावे लागेल. भारतासाठी ‘थिएटर कमांड’ निश्‍चित करतांना ते भारताच्या आवश्यकतेनुसार केले पाहिजे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे