अमेरिकेत कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याचा परिणाम !
कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याने भारतातही लुटालूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सरकारने आतापासूनच यावर ठोस उपाययोजना काढली पाहिजे !
लॉस एंजेलिस (अमेरिका) – जगातील अनेक देशांसह अमेरिकेतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर येथे गेल्या २ आठवड्यांत बंदुकांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीतून लूटालूट आणि सामाजिक उठाव होतील, या भीतीने अनेक नागरिक बंदुका आणि दारुगोळा यांचा साठा करून ठेवत आहेत.
१. आरोग्यसंकट किंवा आर्थिक संकट निर्माण झाले, तर सामाजिक व्यवस्था धोक्यात येईल, या भयापोटी अनेकांनी शस्त्रांची खरेदी करून ठेवल्याचे निरीक्षण अमेरिकेतील काही शस्त्रविक्रेत्यांनी नोंदवले. ‘कुणी तरी घरात शिरून लुटालूट करील, तसेच पैसे, अन्न, टॉयलेट पेपर चोरून नेईल, अशा भयातून ही कृती होत आहे’, असेही निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले.
२. ओक्लाहोमा प्रांतातील टलसा येथील ‘डाँग्ज गन्स अमो अँड रिलोडिंग’ या शस्त्रांंच्या दुकानाचे मालक डेव्हिड स्टोन यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘बंदुकीच्या विक्रीत तब्बल ८०० टक्के वाढ झाली असून आमच्याकडील साठा संपत आला आहे. शस्त्रखरेदी करणार्यांमध्ये प्रामुख्याने नवीन ग्राहकांचा समावेश असून मिळेल ते शस्त्र खरेदी करून ठेवण्याकडे येथील नागरिकांचा कल दिसून आहे. कोरोना विषाणूच्या दहशतीचा हा परिणाम आहे. यामागचे नेमके कारण मला समजत नाही; परंतु ही कृती अतार्किक आहे.’
३. ‘डेल्टा टीम टॅक्टिकल’ या आस्थापनाचे ‘मार्केटिंग’ संचालक डॉर्डन मॅककॉर्मिक यांनी सांगितले की, ‘आमच्या आस्थापनात सातत्याने शस्त्रांच्या उत्पादनाचे काम चालू आहे.
पाण्याच्या शेवटच्या बाटलीवरून २ महिलांमध्ये झालेल्या भांडणामुळे लोकांकडून शस्त्रखरेदी !
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या वॉशिंग्टन प्रांतातील ‘लिनवुड गन’ या दुकानाचे मालक टिफनी टिसडेल म्हणाले, ‘‘दुकाने उघडण्याच्या आधीपासूनच लोक खरेदीसाठी दुकानाबाहेर रांगा लावत आहेत. पूर्वी दिवसाला अधिकाधिक २० ते २५ शस्त्रांची विक्री होत असे. आता हा आकडा १५० हून अधिक झाला आहे. ग्राहकांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी लागत आहे. या ग्राहकांमध्ये सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुषांचा समावेश आहे. ‘एका दुकानात पाण्याच्या शेवटच्या बाटलीवरून २ महिलांमध्ये भांडण झाल्याचे पाहिल्यानंतर मी बंदूक खरेदीचा निर्णय घेतला’, असे एका ग्राहकाने मला सांगितले.’’