‘अध्यात्म’ हा विषय सूक्ष्मातील जाणण्याशी आणि सूक्ष्म जगताशी संबंधित आहे. त्यामुळे साधना करणार्या साधकाला थोडेफार तरी सूक्ष्मातील जाणता येणे आवश्यक असते. सूक्ष्मातील कळत असेल, तर चांगला साधक उन्नती जलद करू शकतो. सूक्ष्मातील जाणणे हे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी जाणण्याच्या पलीकडचे आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पूर्वीपासूनच साधकांकडून छोटे छोटे सूक्ष्मातील प्रयोग करून घेतले. त्यामुळे साधकांना ‘सूक्ष्मातील कसे जाणायचे ?’, हे शिकायला मिळले, तसेच त्यांची सूक्ष्म-पंचज्ञानेंद्रिये सूक्ष्मातील जाणायला सक्षम झाली.
१. सूक्ष्मातील जाणता येण्याचे महत्त्व
ईश्वर हा सूक्ष्मातीसूक्ष्म आहे. त्याची अनुभूती घ्यायची असेल, तर सूक्ष्मातील लक्षात येणे आवश्यक आहे. तसेच सूक्ष्म जगतही पुष्कळ मोठे आहे. त्यामुळे ‘आपण दैवी तत्त्वाची अनुभूती घेतली कि कुणी आसुरी शक्तीने फसवले आहे’, हे कळणे आवश्यक असते. त्यासाठी सूक्ष्मातील समजणे महत्त्वाचे आहे.

सनातन संस्थेचे अनेक साधक सूक्ष्मातील अध्यात्म शिकले, हे या लेखावरून मला लक्षात आले. त्यामुळे पुढील काळात जुने आणि नवीन साधक साधनेत कसे पुढे जातील, याची मला काळजी वाटत नाही. याबद्दल सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा मी आभारी आहे !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (८.७.२०२६)
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दैनंदिन जीवनातून साधकांना सात्त्विकतेकडे नेणे
साधक-साधिका आश्रमात येतांना परिधान करत असलेले पोशाख, साधिका करत असलेली केशरचना, साधिकांनी घातलेले दागिने इत्यादी साधकांच्या दैनंदिन जीवनातून साधकांना कोणती गोष्ट सात्त्विक आहे ? आणि कोणती असात्त्विक ?, हे सांगितले. त्यामुळे साधकांवर सात्त्विकतेचा संस्कार झाला आणि त्यांना कोणते रंग, कोणत्या नक्षी, कोणती केशरचना सात्त्विक आहे, हे कळू लागले. अशा प्रकारची शिकवण शाळेत, महाविद्यालयात किंवा बहुतांश घरांत दिलीच जात नाही. गुरुदेवांनी दिलेल्या या शिकवणीचा उपयोग साधकांनी ते प्रतिदिन करत असलेल्या सेवेतही केला.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सेवेतील स्पंदने ओळखायला शिकवून त्यांच्यामध्ये साधकत्व घडवणे

एखाद्या साधकाने भावपूर्ण सेवा केली असल्यास सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लगेच ओळखायचे, उदा. एखाद्या साधकाने नामजप करत आणि भावपूर्ण स्वयंपाक बनवला असल्यास ताटात वाढलेल्या पदार्थांतून गुरुदेव स्पंदने ओळखायचे किंवा एखाद्या साधकाने तळमळीने आणि भावपूर्ण लेख लिहिला असल्यास त्या लिखाणातून गुरुदेवांना ती स्पंदने लगेच समजायची. त्यामुळे ते वाढलेले ताट किंवा साधकाचे लिखाण गुरुदेव सर्वांना पहायला ठेवायचे. यामुळे सर्वच साधकांना त्या स्पंदनांची अनुभूती घेता यायची. यातून गुरुदेवांनी ‘नामजप करत, भावपूर्ण, तळमळीने, सेवाभावाने आणि परिपूर्ण सेवा करणे म्हणजे काय अन् त्याचे महत्त्व’ हे सर्व साधकांवर बिंबवले. कलेशी संबंधित सेवा करणार्या साधकांनाही गुरुदेवांच्या शिकवणीचा लाभ व्हायचा. सात्त्विक कलाकृतीचा अंतर्भाव करणे, सेवाभावाने सेवा करणे, शरण जाऊन सेवा करणे इत्यादी घटकांमुळे त्यांची सेवा परिपूर्ण होऊन ती गुरुचरणी पोचायची. एखाद्या सेवेत पुष्कळ चुका असल्यास त्या सेवेतून कशी स्पंदने निर्माण होतात, हेही गुरुदेवांनी साधकांना शिकवले. अशा प्रकारे गुरुदेव सूक्ष्मातील स्पंदने ओळखायला शिकवून साधकांमध्ये साधकत्वच घडवत होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांनी विविध प्रयोगांतून सूक्ष्मातील शिकवणे

अ. प्रथम गुरुदेवांनी सात्त्विक आणि असात्त्विक चित्र किंवा वस्तू साधकांसमोर धरून ‘यांतील सात्त्विक चित्र किंवा वस्तू कोणती ?’, हे ओळखायला शिकवले. त्यातून साधकांना ‘सात्त्विक आणि असात्त्विक वस्तूची स्पंदने कशी असतात ?’, हे समजले.
आ. त्यानंतर पुढच्या टप्प्याला त्यांनी एका लिफाफ्यात सात्त्विक वस्तू आणि दुसर्या लिफाफ्यात असात्त्विक वस्तू ठेवून ‘यांतील कोणत्या लिफाफ्याकडे पाहून चांगले वाटते, हे साधकांना ओळखायला शिकवले.
इ. त्यानंतर त्यांनी चांगली आणि त्रासदायक स्पंदने ओळखायला शिकवले.
ई. त्यानंतर त्यांनी ‘२ चांगल्या वस्तूंपैकी अधिक चांगली वस्तू कोणती ?’, हेही ओळखायला शिकवले.
उ. ‘दोन साधकांपैकी अधिक चांगले कुणाकडे पाहून वाटते आणि का ?’, असेही प्रयोग त्यांनी घेतले. त्यामुळे साधकांना शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या स्पंदनांची ओळख झाली. तसेच साधकांना ‘एखाद्यात अहं अधिक असल्यास त्या व्यक्तीकडे पाहून कशी स्पंदने जाणवतात’, हेही कळू लागले.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ
४. गुरुदेवांमुळे साधकांमध्ये सूक्ष्म परीक्षण करण्याची कुवत निर्माण झाल्यामुळे हिंदूंना हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात आणून देणे शक्य होणे
गुरुदेवांनी सूक्ष्मातील अभ्यास करून घेतल्यामुळे काही साधकांमध्ये एखाद्या प्रसंगाचे सूक्ष्म परीक्षण करण्याची कुवत निर्माण झाली. ‘एखादा प्रसंग घडतांना सूक्ष्मातून काय प्रक्रिया घडत आहे ?’, याचे परीक्षण साधक करू शकतात. एखादा प्रसंग घडल्यावरही साधक तसे परीक्षण करू शकतात. यामध्ये काही साधकांना सूक्ष्मातील दिसते, काही साधकांना सूक्ष्मातील विचार ग्रहण होतात, तर काही साधक सूक्ष्मातील प्रक्रिया चित्ररूपाने चित्रित करतात. त्यांच्या या कुवतीचा लाभ सनातन संस्था ग्रंथप्रदर्शन भरवणे, नामजप दिंडी आयोजित करणे, सभा घेणे, अधिवेशन भरवणे, असे जे जाहीर कार्यक्रम करू लागली, त्यांमध्ये होऊ लागला. अशा कार्यक्रमाच्या वेळी ‘सूक्ष्मातून समाजावर काय परिणाम होत आहे ? आसुरी शक्ती या कार्यक्रमांमध्ये अडथळे आणत आहेत का ? देवता या कार्यक्रमांना कशा साहाय्य करत आहेत ?’ इत्यादी नाविन्यपूर्ण माहिती कळू लागली. ही नाविन्यपूर्ण माहिती लोकांसाठी ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित करण्यात आली. हिंदु धर्मामध्ये १६ संस्कार सांगितले आहेत, अनेक धार्मिक विधी सांगितले आहेत, आचारधर्म आहे, यज्ञयाग आहेत, तसेच सण-उत्सवही आहेत. ही आपली हिंदु संस्कृती आहे. हिंदूंना या आपल्या हिंदु संस्कृतीमुळे नेमका काय लाभ होतो ?, हे ठाऊक नाही आणि त्यामुळे त्यांची हिंदु संस्कृतीवरील श्रद्धा दूर होत आहे. हिंदु संस्कृतीतील धार्मिक विधी, धर्मपालन, यज्ञयाग यांच्या वेळी साधकांनी सूक्ष्म परीक्षण केल्याने आणि ते गुरुदेवांनी ग्रंथांमध्ये प्रकाशित केल्याने अखिल मानवजातीसाठी बहुमोलाचे कार्य झाले आहे आणि होत आहे. धर्मपालन न केल्यास काय दुष्परिणाम होतात, हेही साधकांनी सूक्ष्म परीक्षणातून दाखवून दिले आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना वाईट शक्तींचे सूक्ष्मातील जग शिकवणे

वर्ष २००२ पासून वाईट शक्ती साधकांवर आक्रमणे करू लागल्या. साधकांना प्रथम याचा काहीच अनुभव नव्हता. याविषयीही अन्यत्र कुठे शिकवले जात नाही. ‘वाईट शक्तींचे आक्रमण म्हणजे काय ? त्यातून कशी स्पंदने प्रक्षेपित होतात ? वाईट शक्ती आक्रमण का करतात ?’ इत्यादी गुरुदेवांनी आरंभी सांगितले. नंतर वाईट शक्तींनी एखादे आक्रमण केल्यास गुरुदेव साधकांना त्याचा अभ्यास करायला लावत. यावरून वाईट शक्ती पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नि), वायू आणि आकाश अशा पंचतत्त्वांच्या उच्च उच्च स्तरांवर कशी आक्रमणे करतात, वाईट शक्तींना त्यामागे काय साध्य करायचे आहे अन् त्या आक्रमणांतील त्रासदायक परिणाम दूर करण्यासाठी कोणते आध्यात्मिक उपाय करायचे, हे सर्व साधकांना समजले. वाईट शक्तींनी आक्रमण केलेल्या सहस्रो वस्तू अखिल मानवजातीला शिकवण्यासाठी सनातन संस्थेने संग्रहित केल्या आहेत.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सूक्ष्मातील दैवी जगाचीही ओळख करून देणे

जशी साधकांची साधना वाढली, तसा साधकांवर गुरुकृपेप्रमाणे दैवी कृपेचाही वर्षाव होऊ लागला. त्यामुळे साधकांजवळ असलेली देवतांची चित्रे, साधकांचे कपडे, साधकांच्या वस्तू यांच्यामध्ये दैवी पालट होऊ लागले. हे पालट पंचतत्त्वांच्या स्तरांवर होऊ लागले. गुरुदेव साधकांना या पालटांचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास करायला लावत आणि सूक्ष्मातील स्पंदने ओळखायला शिकवत. गुरुदेवांचे केस, नखे, कपडे, देह इत्यादींमध्येही झालेले दैवी पालट गुरुदेव साधकांना दाखवत आणि त्यांचाही अभ्यास करायला लावत. यावरून साधकांना ‘चांगली साधना केल्यास देव अशा पालटांच्या माध्यमातून कशी कृपाशीर्वादाची अनुभूती देतो’, हे शिकायला मिळाले आणि त्यांचा साधनेसाठी उत्साह वाढला. यातून अनेक साधकांची आध्यात्मिक उन्नती झाली. सनातन संस्थेने गुरुदेव, संत, साधक इत्यादींच्या दैवी पालट झालेल्या वस्तू अखिल मानवजातीला अभ्यास करण्यासाठी संग्रही ठेवल्या आहेत.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ
५. गुरुकृपेमुळे काही साधकांना सूक्ष्मातील अमूल्य ज्ञान मिळत असणे आणि त्यामुळे मानवजातीची जिज्ञासा शमणार असून त्यांतील काही जण तरी साधना अन् धर्माचरण करू लागणार असणे
गुरुदेवांच्या कृपेने काही साधकांना सूक्ष्मातील ज्ञान मिळू लागले. हे ज्ञान त्यांना गेली २३ वर्षे मिळत आहे. हे ज्ञान कुठल्याही ग्रंथांत उपलब्ध नाही. हिंदु धर्म, अध्यात्म, साधना, आध्यात्मिक उन्नती, ईश्वर, मृत्यू, मृत्यूत्तर प्रवास, श्राद्धकर्म इत्यादी अनेक विषयांवर साधकांना ज्ञान मिळत आहे. गुरुदेवांना जिज्ञासा असल्याने ते सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विविध प्रश्न विचारतात आणि त्यांच्याकडून आलेल्या उत्तरांतील सत्यता ते स्वतः पडताळतात. या ज्ञानावर आधारित विविध विषयांचे ३७० ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत आणि पुढेही शेकडो होतील इतके ज्ञान संग्रही आहे. हे ज्ञान मिळवतांना भाव, शरणागतभाव आणि अल्प अहं नसेल, तर वाईट शक्ती ज्ञानामध्ये भेसळ करून चुकीचे ज्ञान देऊ शकतात, तसेच ज्ञान मिळवणार्या साधकांनाही आध्यात्मिक त्रास होऊ शकतो, हेही गुरुदेवांनी साधकांच्या लक्षात आणून दिले. गुरुकृपेमुळे मिळणार्या अशा अमूल्य ज्ञानामुळे मानवजातीची जिज्ञासा शमणार आहे आणि त्यांतील काही जणांची तरी अध्यात्म, साधना, हिंदु धर्म यांवर दृढ श्रद्धा बसून ते साधना आणि धर्माचरण करू लागतील. कलियुगामध्ये हे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे.
सूक्ष्मातून आध्यात्मिक त्रास ओळखून तो दूर करण्याची पद्धत शिकवल्याने गुरुदेवांनी साधकांचे कल्याण केलेले असणे

या कलियुगात व्यक्तींची साधना आणि धर्माचरण अल्प होऊ लागल्याने बहुसंख्य व्यक्तींना अल्प-अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास असतात. आध्यात्मिक त्रास सूक्ष्मातील असल्याने सामान्य व्यक्तीच्या लक्षात येत नाही. गुरुदेवांनी साधकांना आध्यात्मिक त्रास होण्याची प्रारब्ध, पूर्वजांचा त्रास, दैवी प्रकोप, करणी इत्यादी कारणे असल्याचे सांगितले. त्यांनी साधकांना ‘एखाद्याला मंद, मध्यम कि तीव्र आध्यात्मिक त्रास आहे’, हे ओळखायला शिकवले. आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी गुरुदेवांनी साधकांना नाविन्यपूर्ण अशा आध्यात्मिक उपायांची ओळख करून दिली. त्रासाच्या लक्षणांनुसार तो त्रास पंचमहाभूतांपैकी कोणत्या तत्त्वाशी संबंधित आहे, हे ओळखायला शिकवून त्याला अनुसरून आध्यात्मिक उपायांच्या पद्धती शिकवल्या, तसेच त्यानुसार देवतांचे नामजपही शोधून काढायला शिकवले. साधकांना हे सूक्ष्मातून ओळखता येऊ लागल्याने ते आध्यात्मिक उपाय करण्यास स्वावलंबी झाले. ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धत’ ही उपायांची नाविन्यपूर्ण पद्धतही गुरुदेवांनी शिकवली. अशा प्रकारे जन्मोजन्मींचे आध्यात्मिक त्रास हे आध्यात्मिक उपाय आणि साधना यांनी दूर होऊ शकतात, ही दृढ श्रद्धा त्यांनी साधकांमध्ये निर्माण केली. सूक्ष्मातून आध्यात्मिक त्रास ओळखून तो दूर करण्याची पद्धत शिकवल्याने गुरुदेवांनी मानवजातीचे कल्याणच केले आहे. – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ
६. गुरुदेवांनी साधकांना व्यक्तीची आध्यात्मिक पातळी सूक्ष्मातून ओळखण्याचे अध्यात्मशास्त्र सांगणे आणि यामुळे साधक सतर्कतेने साधना करू शकणे
साधकांनी सतत काही वर्षे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्याने त्यांची आध्यात्मिक उन्नती होत जाते. आध्यात्मिक उन्नती होतांना सत्त्वगुण वाढू लागतो आणि रज अन् तम गुण अल्प होत जातात. यामुळे साधकांमध्ये सूक्ष्मातून पालट होत जातात. साधकांची आध्यात्मिक प्रगती होत असल्याचे परिमाण कळण्यासाठी गुरुदेवांनी साधकांची आध्यात्मिक पातळी टक्केवारीमध्ये सांगण्याची पद्धत अवलंबली. कलियुगातील सामान्य व्यक्तीची पातळी २० टक्के, साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झालेल्या व्यक्तीची पातळी ६० टक्के, संतपदी विराजमान होणार्या व्यक्तीची पातळी ७० टक्के आणि ईश्वराची आध्यात्मिक पातळी १०० टक्के’, असे ते परिमाण होते. संतांमध्ये गुरु (७० टक्के), सद्गुरु (८० टक्के) आणि परात्पर गुरु (९० टक्के), असे आध्यात्मिक पातळीचे टप्पे आहेत. या प्रत्येक आध्यात्मिक पातळीला व्यक्तीची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये पालटतात. ती शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांमुळे येणार्या सूक्ष्मातील अनुभूतींवरून लक्षात येतात. या अनुभूतींवरून एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी लक्षात येऊ शकते. ‘सूक्ष्मातून एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी कशी ओळखायची ?’, हे गुरुदेवांनी अध्यात्मशास्त्र सांगून साधकांना शिकवले. त्याप्रमाणे साधकांना समाजातील संत लक्षात येऊ लागले. तसेच चांगली आध्यात्मिक पातळी असलेली दैवी बालके आणि जन्मतःच संत असलेली दैवी बालकेही साधकांना ओळखता येऊ लागली. साधना करत असतांना आपण आध्यात्मिक प्रगती करत आहोत कि आपली घसरण होत आहे, हे कळणे आवश्यक असते. ते साधकांना कळल्याने ते साधनेत सतर्क असतात.
अशा प्रकारे सूक्ष्मातील जाणता येण्याचा उपयोग मानवाला जीवनात, तसेच साधनेत प्रत्येक पैलूत करून घेता येतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सूक्ष्माची ओळख करून देऊन साधकांना परिपूर्ण घडवले आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने करून घेतली. असे परिपूर्णतेने घडवणारे गुरुदेव आम्हाला लाभल्याने अम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ, वय ६२ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.७.२०२६)
हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ला त्याच भाषेत तोंड देण्याचा विचार कदापि करू नका !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !