सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !

ग्रंथलिखाण करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रश्न – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘मी अध्यात्माचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला, तेव्हा संतांकडून ज्ञान मिळू लागले. त्यांच्या आधारे मी ग्रंथलिखाण चालू केले. मी साधना करू लागल्यानंतर मला ध्यानातून उत्तरे मिळू लागली. त्यांच्या पुढील टप्प्यात सूक्ष्मातून ज्ञान मिळू लागले. अशा विविध मार्गांनी ज्ञान मिळत गेले. पुढे त्यांच्या आधारे ग्रंथ प्रकाशित करता आले. कालांतराने सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या काही साधकांनाही अशा प्रकारे सूक्ष्मातून ज्ञान मिळू लागले आणि मग माझे लिखाण न्यून झाले.

१. यामध्ये ‘मला ज्ञान मिळते’ अथवा ‘मी ग्रंथलिखाण करतो’, याचा अहंकार होऊ नये, म्हणून देवाने असे केले का ?

२. सनातनच्या सहसाधकांना ज्ञान मिळण्याच्या प्रक्रियेसंदर्भात माहिती हवी.

(२७.४.२०२६)

उत्तर – सुश्री मधुरा भोसले :

१. प.पू. डॉ. आठवले हे उत्तम शिष्य आणि उत्तम गुरु असून त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेमुळे त्यांच्याकडून कलियुगासाठी अत्यंत उपयुक्त असणार्‍या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती झालेली असणे

‘प.पू. डॉ. आठवले हे उत्तम शिष्य आहेत आणि त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज हे मोक्षगुरु होते. त्यामुळे शिष्यावस्थेतील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये अध्यात्म जाणून घेण्याची पुष्कळ जिज्ञासा, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि श्री गुरूंप्रतीचा अनन्यभाव होता. त्यामुळे त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज हे त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी शिष्यावस्थेतील प.पू. डॉ. आठवले यांना ‘ज्ञान, भक्ती आणि वैराग्य’ दिले. त्यामुळे प.पू. डॉ. आठवले यांना मुक्ती मिळालेली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी श्री गुरुकृपेमुळे ‘ज्ञानयोगाचे ज्ञान, भक्तीयोगाची भक्ती आणि कर्मयोगाचे वैराग्य’ अशा तिन्ही साधनामार्गांना एकत्रित साध्य करणार्‍या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मितीही केली आहे. त्यामुळे कलियुगाच्या अंतापर्यंतच्या लाखो पिढ्यांना मोक्षप्राप्ती करण्याचा ‘गुरुकृपायोग’रूपी सोपानच प्राप्त झाला आहे.

२. प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांचे शिष्य प.पू. डॉ. आठवले यांना ‘ज्ञान, भक्ती आणि वैराग्य’ दिल्याने झालेले परिणाम

सुश्री (कु.) मधुरा भोसले

२ अ. ज्ञान : ज्ञान मिळाल्यामुळे प.पू. डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्रावर आधारित असणारे अनेक ग्रंथ संकलित केले.

२ आ. भक्ती : प.पू. डॉ. आठवले यांना भक्तीचे वरदान मिळाल्यामुळे आणि त्यांच्या निष्काम भक्तीमुळे ‘शिव, प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, हनुमान, श्री दत्त, श्री गणेश, श्री दुर्गादेवी आणि श्री लक्ष्मीदेवी’ या अष्टदेवतांचे कृपाशीर्वाद सनातन संस्थेला लाभले. त्यामुळे साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांचा ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही स्तरांवर उद्धार होत आहे.

२ इ. वैराग्य : प.पू. डॉ. आठवले यांना वैराग्याचे वरदान मिळाल्यामुळे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्याने साधकांमध्ये वैराग्य जागृत होत आहे. साधकांकडून सकाम साधना न होता व्यष्टी स्तरावर मोक्षप्राप्तीसाठी आणि समष्टी स्तरावर हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी निष्काम साधना होत आहे.


प.पू. डॉ. आठवले यांच्यावरील संतकृपेमुळे त्यांच्याकडून ‘अध्यात्मशास्त्र’ या चक्रमुद्रांकित बीज ग्रंथाची निर्मिती होणे


प.पू. डॉ. आठवले हे उत्तम शिष्य होते. त्यांच्यामध्ये ‘जिज्ञासा, तीव्र मुमुक्षुत्व, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ, श्री गुरूंवर दृढ श्रद्धा आणि त्यांच्या प्रतीचा निस्सीम भाव, तसेच आज्ञापालन करणे’ अशी उत्तम शिष्याची अनेक लक्षणे होती. त्यामुळे त्यांना अनेक संतांकडून ज्ञान मिळू लागले. त्याच्या आधारे त्यांनी अध्यात्माशी निगडित असणार्‍या ग्रंथांचे लिखाण चालू केले. ‘अध्यात्मशास्त्र’ हा चक्रमुद्रांकित ग्रंथ, म्हणजे अध्यात्माचा बीज ग्रंथ होता.

– सुश्री मधुरा भोसले

३. प.पू. डॉ. आठवले यांनी अध्यात्मातील ‘मूलाधार’ (साधनेचा पाया रचणार्‍या) ग्रंथांची निर्मिती करणे

प.पू. डॉ. आठवले यांनी विविध संतरूपी मार्गदर्शक गुरु आणि मोक्षगुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्यामुळे त्यांना प्रथम ध्यानातून उत्तरे मिळू लागली. त्यानंतर त्याच्या पुढील टप्प्यात त्यांना सूक्ष्मातून ज्ञान मिळू लागले. अशा विविध मार्गांनी त्यांना ज्ञान मिळत गेले. पुढे त्याच्या आधारे ग्रंथ प्रकाशित करता आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन, अध्यात्म, शिष्य, गुरु, गुरुकृपायोग, नामसंकीर्तनयोग, सोळा संस्कार, ‘सण, उत्सव आणि व्रते’, असे अनेक ग्रंथ, तसेच विविध देवतांच्या संदर्भात अनेक ग्रंथ संकलित केले आहेत. हे अध्यात्माचे मूलाधार (साधनेचा पाया रचणारे) ग्रंथ आहेत. या ग्रंथांच्या अभ्यासामुळे जिज्ञासूला साधनेची योग्य दिशा मिळून तो प्रथम चांगला साधक आणि नंतर आदर्श शिष्य बनतो. हे ग्रंथ कलियुगाच्या अंतापर्यंत अखिल मानवजातीला मार्गदर्शक असणार आहेत.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शब्दांची पातळी ओलांडून शब्दातीत अवस्था गाठणे, म्हणजे त्यांचे सानंद समाधी अवस्थेकडून

निर्बीज समाधी अवस्थेकडे प्रयाण होणे, तेव्हा शब्दांच्या पातळीवर सूक्ष्म ज्ञान मिळण्याची प्रक्रिया सनातनच्या काही साधकांच्या माध्यमातून कार्यरत होणे आणि त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ग्रंथलिखाण न्यून होणे त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा साधनेचा प्रवास सगुणाकडून निर्गुणाकडे होऊ लागला. त्यामुळे त्यांनी शब्दांची पातळी ओलांडून शब्दातीत अवस्था, म्हणजे सानंद समाधी अवस्थेकडून निर्बीज समाधी अवस्थेकडे प्रयाण केले आहे. अशा वेळी व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी श्रीविष्णूची ज्ञानशक्ती सनातनच्या साधकांच्या माध्यमातून कार्यरत झाली. त्यामुळे कालांतराने सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या काही साधकांनाही अशा प्रकारे सूक्ष्मातून ज्ञान मिळू लागले आणि नंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ग्रंथ लिखाण न्यून झाले. यामागील कार्यकारणभाव पुढीलप्रमाणे आहे.

सूक्ष्मातील ज्ञान मिळण्याची प्रक्रिया


श्री गुरुकृपेने जेव्हा साधकाचे मन विश्वमनाशी जोडले जाते, तेव्हा त्याच्या मनात अध्यात्मातील विविध सूत्रांविषयी सूक्ष्म-विचार येऊ लागतात. जेव्हा साधक या सूक्ष्म विचारांचे लिखाण करू लागतो, तेव्हा श्री गुरुकृपेने साधकाचे मन विश्वबुद्धीशी जोडले जाते. त्यामुळे त्याला त्याच्या मनात येणार्‍या विचारांचे आध्यात्मिक विश्लेषण, आध्यात्मिक कार्यकारणभाव आणि एकूण अध्यात्मशास्त्र उमजते अन् तो त्या संदर्भात लिखाण करतो. अशा प्रकारे श्री गुरुकृपेने या घोर कलियुगातही साधकांना अध्यात्मशास्त्राशी संबंधित असणारे सूक्ष्म ज्ञान मिळते आणि त्यांचे गुर्वाज्ञापालन होऊन त्यांची ज्ञानयोगानुसार साधना होते. त्यामुळे सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान जेव्हा ‘सनातन प्रभात’ नियतकालिके किंवा सनातनचे ग्रंथ’ यांत प्रसिद्ध होते, तेव्हा समाजातील अनेक जिवांना काळानुसार योग्य प्रकारे धर्माचरण आणि साधना करण्याची प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे ते जीव पृथ्वीवर स्थापन होणार्‍या रामराज्याच्या कार्याशी सूक्ष्म स्तरावर जोडले जाऊन ईश्वरी कृपा संपादन करतात. – सुश्री मधुरा भोसले

४ अ. ‘मला ज्ञान मिळते’ अथवा ‘मी ग्रंथलिखाण करतो’, याचा अहंकार होऊ नये, म्हणून देवाने असे केले का ?

उत्तर – नाही. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अहंशून्य अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांच्यात लेशमात्रही अहं नाही.

४ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मावरील शेकडो ग्रंथ संकलित करणे : श्री अनंतानंद साईश यांनी प.पू. बाबांना (प.पू. भक्तराज महाराज यांना) ‘तू किताबों के ऊपर किताबें लिखेगा ।’, म्हणजे ‘तू पुष्कळ ग्रंथ लिहिशील’, हा आशीर्वाद दिला होता. त्यानंतर प.पू. बाबांनी शिष्य डॉ. आठवले यांना हा आशीर्वाद दिला. त्यानंतर मोक्षगुरु बनलेले प.पू. डॉ. आठवले यांनी हा आशीर्वाद अव्यक्त संकल्पाच्या माध्यमातून सनातनच्या काही साधकांना दिला. त्यामुळे सनातनच्या काही साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळत आहे. एप्रिल २०२६ पर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेले आणि सूक्ष्मातील ज्ञानातून सिद्ध झालेले अध्यात्मशास्त्र, आयुर्वेद, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती इत्यादी विविध विषयांवर १३ भाषांतील ३७० ग्रंथ प्रकाशित झाले आहेत, तसेच आणखी ५ सहस्र ग्रंथांचे लिखाण संगणकात उपलब्ध आहे.

५. श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता

‘अशा प्रकारे श्री गुरुकृपेमुळे ज्ञानाप्राप्तीचा क्रम हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापासून चालू होऊन तो सनातनच्या सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांपर्यंत पोचला आहे’, त्याबद्दल या ज्ञानगुरु आणि मोक्षगुरु यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून हे लेखपुष्प कृतज्ञताभावाने त्यांना समर्पित करते.’

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ती साधिका), (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ९.५.२०२५, वेळ : दुपारी १२ ते १२.३०, कालावधी : अर्धा घंटा आणि ज्ञानाचे संकलन करण्याचा कालावधी : २ घंटे)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.