सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !

गुरुकृपा हि केवलं । शिष्यपरममङ्गलम् ।

अर्थ : शिष्याचे परममंगल, म्हणजे मोक्षप्राप्ती, ही त्याला केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.

‘कृपा’ हा शब्द ‘कृप्’ या धातूपासून सिद्ध होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला ‘गुरुकृपायोग’, असे म्हणतात.

गुरुकृपायोगाचा उगम

‘गुरुकृपायोगात ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग एकत्रित आहेत. माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांच्या कृपेने, गुरुकृपेने हा योग सुचला; म्हणून मी त्याचे नाव ‘गुरुकृपायोग’, असे ठेवले. आज अचानक लक्षात आले की, मला गुरुकृपेने हा योग सुचला नसून गुरूंनीच तो निर्मिला आहे. १९९३ मध्ये प.पू. बाबांनी मला सांगितले, ‘‘डॉक्टर, तुम्ही आम्हाला तन-मन-धन दिले. आम्ही तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले.’’ ‘ज्ञान, भक्ती आणि वैराग्य’ यांचा अर्थ आहे, ‘ज्ञानयोग, भक्तीयोग आणि वैराग्य, म्हणजे कर्मफळाची अपेक्षा न करता कर्म करण्यास शिकवणारा कर्मयोग’, म्हणजेच तेव्हा बाबांनी मला ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग दिले, म्हणजेच गुरुकृपायोग शिकवला.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (६.५.२०१२)

गुरुकृपायोगाचे महत्त्व

निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालवता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ? ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’)

‘वर्ष १९९२ मध्ये इंदूर येथील आश्रमात असतांना प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) म्हणाले, ‘‘सर्व योगांत भक्तीयोग श्रेष्ठ !’’ त्यावर मी धारिष्ट्य करून म्हटले, ‘‘नाही बाबा, गुरुकृपायोग सर्वश्रेष्ठ आहे !

’’ त्यावर बाबा अतिशय आनंदून म्हणाले, ‘‘अगदी बरोबर बोललात !’’ तेव्हापासून मी ‘गुरुकृपायोग’ हा शब्द वापरू लागलो. पुढे त्याचे सिद्धांत आणि प्रत्यक्ष साधना, हे भाग विकसित झाले.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले


हिंदु संस्कृतीच्या महानतेतील एक रत्नजडित कोंदण म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ !

‘वसिष्ठऋषि-श्रीराम’, ‘सांदीपनिऋषि-श्रीकृष्ण’, ‘आर्य चाणक्य-चंद्रगुप्त’ ही आदर्श गुरु-शिष्यांची उदाहरणे आहेत. गुरु आणि शिष्य हे दोन दिव्यांप्रमाणे असतात. तेलवात नसलेला दिवा १०० वेळा जरी प्रकाशमान दिव्याजवळ गेला, तरी तो प्रकाशत नाही. शिष्याच्या दिव्यातील ही तेलवात म्हणजे त्याची निष्ठा, श्रद्धा अन् भक्ती.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’)


गुरुकृपा कार्य कशी करते ?

‘संकल्प’ आणि ‘अस्तित्व’ या दोन प्रकारांनी गुरुकृपा कार्य करते.

१. संकल्प (सूक्ष्मतम)

‘एखादी गोष्ट घडो’ एवढाच विचार एखाद्या उन्नतांच्या मनात आला, तर ती गोष्ट घडते. याशिवाय त्यांना दुसरे काही एक करावे लागत नाही. ८० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या उन्नतांच्या संदर्भात ते शक्य होते. ‘शिष्याची आध्यात्मिक उन्नती होवो’, असा संकल्प गुरूंच्या मनात आला की, मगच शिष्याची खरी उन्नती होते. यालाच ‘गुरुकृपा’ म्हणतात.

२. अस्तित्व (सूक्ष्मातीसूक्ष्म)

या अंतिम टप्प्यात मनात संकल्पही करावा लागत नाही. गुरूंच्या नुसत्या अस्तित्वाने, सान्निध्याने किंवा सत्संगाने शिष्याची साधना आणि उन्नती आपोआप होते.

हे मजचिस्तव जाहले । परि म्यां नाहीं केलें ।
ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ।।

– श्री भावार्थदीपिका (श्री ज्ञानेश्वरी) ४:८१

अर्थ आणि भावार्थ : हे माझ्यामुळे झाले; पण मी केले नाही. हे ज्याने ओळखले, तो जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटला. यातील ‘मजचिस्तव जाहले’ (माझ्यामुळे झाले), म्हणजे माझ्या अस्तित्वामुळे झाले, यातील ‘मी’पण हे परमेश्वराचे आहे; तर ‘म्यां नाही केलें’ (मी केले नाही), म्हणजे कर्तेपण माझ्याकडे नाही. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे सूर्य उगवतो, तेव्हा सर्व जण उठतात, फुले उमलतात वगैरे. हे केवळ सूर्याच्या अस्तित्वाने होते. सूर्य कोणाला सांगत नाही की ‘उठा’ किंवा फुलांना सांगत नाही की ‘उमला’. ९० टक्क्यांहून अधिक पातळीच्या गुरूंचे कार्य या पद्धतीचे असते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’)

गुरुकृपेचे तुलनात्मक महत्त्व !

पुढील कोष्टकात शिष्याच्या कोणत्या कृतीने किती प्रमाणात गुरुकृपा होऊ शकते, हे दिले आहे

टीप – परिणामकारक प्रसार करणार्‍यात शिष्याचे सर्व गुण असावे लागतात. नुसत्या राजकीय किंवा सामाजिक प्रचारकासारखे काम करून चालत नाही.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’)

गुरुकृपेचे सर्वांगीण महत्त्व !


‘समजा, मला तुम्ही गुरु मानले; मग तुम्ही जरी मला सोडले, तरी मी तुम्हाला कधीच टाकून देणार नाही. हे आश्वासन सर्वांपुरते आहे. वाघाच्या जबड्यात सापडलेले श्वापद ज्याप्रमाणे सोडले जात नाही, त्याचप्रमाणे ज्याच्यावर गुरूने कृपा केली, तो मोक्षाला जाईपर्यंत गुरु त्याला केव्हाही सोडून देत नाहीत. शिष्य जर नरकात जात असेल, तर भगवान (म्हणजे मी रमण) तुमच्या पाठोपाठ जाऊन तुम्हाला परत घेऊन येतील. गुरु आतही आहे आणि बाहेरही आहे. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतो. तुम्हाला आत्म्याकडे, म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात सिद्धता करत असतो. मी मौनानेच उपदेश देतो. तुम्ही मला अनन्य व्हा, म्हणजे मी तुमच्या मनावर मनोनाशापर्यंत नियंत्रण ठेवीन. तुम्ही स्वस्थ रहा. भगवान (रमण) योग्य काय असेल ते करतील. मला पूर्ण शरण येणे, हे तुम्ही करा आणि दुसरे सर्व मजवर सोपवा. – श्री रमण महर्षी

(‘शिष्यासाठी गुरु नरकातही जातील’, हे शिष्याला मानसिक आधार वाटावा, या दृष्टीने महर्षींनी सांगितले आहे. गुरु शिष्याकडून नरकात जाण्याएवढी चूक होऊ देत नाहीत; मात्र त्याने तशी केली, तर त्याच्या चुकीचे प्रायश्चित्त त्याला भोगू देतात.)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’)

गुरुप्राप्ती आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ?

तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते. तरुण वयात एखाद्या मुलीचे आपल्यावर प्रेम बसावे म्हणून एखादा तरुण जसा रात्रंदिवस तिचाच ध्यास धरून ‘मी काय केले की, ती खुश होईल’, या दृष्टीने प्रयत्न करतो, तसेच एखाद्या गुरूंनी आपल्याला ‘माझे’ म्हणावे, त्यांची कृपा व्हावी, यासाठी रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास धरून ‘मी काय केले की ते प्रसन्न होतील’, या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असते. कलियुगात आधीच्या तीन युगांइतकी गुरुप्राप्ती आणि गुरुकृपा होणे कठीण नाही. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र म्हणजे गुरुकृपेविना गुरुप्राप्ती होत नाही. भविष्यकाळात आपला शिष्य कोण होणार ? हे गुरूंना आधीच ज्ञात असते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’)