अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

१६.६.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘देवतांचे अवतारांच्या संदर्भातील कार्य, तसेच अवतारांचे असुरांच्या नाशाच्या संदर्भातील कार्य’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.                            

(भाग ४)

लेखाचा मागील भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1051480.html

‘वीरभद्र’ शिवाचा उग्र अवतार

७. असुरांच्या नाशाच्या संदर्भातील कार्य

सुश्री (कु.) मधुरा भोसले

७ अ. देवतांनी असुरांना दिलेल्या वरदानाची मर्यादा राखून त्यांचा नाश करण्यासाठी भगवंताला नवीन अवतार धारण करावा लागणे : बर्‍याच वेळा अनेक असुर कठोर तपश्चर्या करून ‘ब्रह्मदेव, शिव, सूर्यदेव, देवी’ इत्यादी देवतांकडून अजेय होण्याचे आशीर्वादरूपी वरदान प्राप्त करून घेतात.

७ अ १. ब्रह्मदेवाने तारकासुराला दिलेल्या वरदानाची मर्यादा राखून तारकासुराचा नाश करण्यासाठी शिवपुत्र कार्तिकेयाचा जन्म होणे : ‘सतीमातेचे दहन झाल्यावर आता शिव पुन्हा विवाह करणार नाही. त्यामुळे शिवपुत्राची निर्मिती होणार नाही’, असे गृहित धरून तारकासुराने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केले, ‘माझा वध एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह यांच्याकडून होऊ नये; परंतु शिवपुत्राकडून होऊ दे.’ त्यानंतर सतीने हिमवान आणि मैना या दांपत्याच्या पोटी पार्वतीच्या रूपात जन्म घेऊन शिवाची कठोर आराधना केली अन् त्याला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर शिव-पार्वती विवाह झाला आणि शिव अन् पार्वती यांच्या एकत्रित तत्त्वातून, म्हणजे अयोनीज संबंधातून ‘कार्तिकेया’चा जन्म झाला. त्याला जन्मापासून ६ शिरे होती. त्यानंतर शिवाने ही सर्व शिरे एकत्र केली. त्यामुळे कार्तिकेय ना एक होता, ना समूह होता. हे कार्तिकेयाचे वैशिष्ट्य असल्यामुळे त्याने तारकासुराशी युद्ध केले आणि ब्रह्मदेवाच्या वचनाचे पालन करून तारकासुराचा वध केला.’ (साभार : https://isha.sadhguru.org/hi/wisdom/article/kartikeya)

७ अ २. श्री गणेशाने ‘महोत्कट’ अवताराच्या रूपात मनुष्य देह धारण करून देवांतक आणि नरांतक या असुरांचा नाश करणे : ‘सत्ययुगात देवांतक आणि नरांतक या दैत्यांनी सूर्यदेवाची उग्र उपासना करून त्याच्याकडून कोणत्याही देवतेकडून मृत्यू न येण्याचे वरदान प्राप्त केले. ते दैत्य अजेय झाल्याने उन्मत्त झाले आणि त्यांनी पृथ्वी, पाताळ अन् स्वर्ग या तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला. तेव्हा मनुष्य आणि देवता यांच्या रक्षणासाठी कश्यपऋषि अन् अदिती यांच्या पोटी श्री गणेशाने ‘महोत्कट’ अवताराच्या रूपात मनुष्य देह धारण केला. त्यानंतर महोत्कटाने देवांतक आणि नरांतक यांच्याशी युद्ध करून त्यांचा नाश केला.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’)

७ आ. असुरांचे बळ क्षीण करणे : ‘काही वेळा असुर अधर्माचरण करून पुष्कळ बळ प्राप्त करण्यासह धार्मिक कर्म करूनही पुण्यबळ प्राप्त करतात. अशा वेळी असुरांचे बळ क्षीण करण्यासाठी भगवंत विविध अवतार धारण करतो.

७ आ १. श्रीविष्णूने वामनावतार घेऊन अहंकारी बळीराजाचे बळ क्षीण करणे आणि त्याला पाताळात नेणे : ‘बळीचे पुण्यबळ क्षीण करण्यासाठी श्रीविष्णूने पाचवा वामनावतार घेतला. बळीराजा १ सहस्र अश्वमेध यज्ञ करून इंद्रपद प्राप्त करणार होता. बळीराजा हा श्रीविष्णूचा भक्त होता; परंतु त्याला त्याच्या पुण्यबळाचा अहंकार झाला होता आणि त्याचे बळ देवतांना घातक ठरणार होते. भक्त बळीराजाचा उद्धार करून देवतांचे रक्षण करण्यासाठी वामन बळीराजाच्या यज्ञस्थळी पोचला आणि त्याने ३ पावले मावतील, इतक्या भूमीचे दान बळीराजाकडून मागून घेतले. बळीने हे दान दिल्यावर वामनावताराने विराट रूप धारण करून पहिल्या पावलात पाताळ आणि पृथ्वी अन् दुसर्‍या पावलात अंतरिक्ष आणि स्वर्गलोक व्यापले. तेव्हा ‘मी तिसरे पाऊल कुठे ठेवू ?’, असे वामनाने बळीराजाला विचारले. त्यावर बळीराजा वामनापुढे नतमस्तक झाला. वामनाने त्याच्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवून त्याला ‘अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल’, या सप्तपाताळांपैकी ‘सुतल’ या पाताळलोकाचे राज्य बळीराजाला दिले. त्यामुळे बळीराजाचा अहंकार नष्ट झाला आणि तो सुतललोकात समाधानी राहून विष्णुभक्ती करू लागला.’ (साभार : https://bhaktisatsang.com/vaman-avatar-katha/)

प्रभु श्रीराम

८. भक्तांच्या संदर्भातील कार्य 

८ अ. स्वतःच्या आचरणातून भक्तांसमोर धर्माचरणाचा आदर्श प्रस्थापित करणे : ‘प्राणीमात्रांमध्ये केवळ मनुष्यच धर्माचरण आणि साधना करून मोक्षप्राप्ती करू शकतो. पृथ्वीवरील मनुष्यांपुढे धर्माचरण आणि तपरूपी साधना यांचा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी भगवंत विविध अवतार धारण करतो.

८ अ १. प्रभु श्रीरामाने स्वतःच्या जीवनातून आदर्श निर्माण करणे : श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी सातवा अवतार, म्हणजे प्रभु श्रीराम ! श्रीरामाने आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श शिष्य, आदर्श राजा, आदर्श शत्रू इत्यादी आदर्श स्वतःच्या आचरणातून निर्माण केले. त्यामुळे मनुष्याला ‘धर्माचरण आणि साधना करून आदर्श जीवन कसे जगायचे ?’, याचे उदाहरण पहाण्यास मिळाले.’ (संदर्भ : सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेतील लिखाणाचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)

८ आ. अहंकाराचा नाश करणे : ‘काही वेळा काही असुर, तर काही देवता यांना अहंकाराची बाधा होऊन ते उन्मत्त होतात. अशा वेळी त्यांचा अहंकार नष्ट करून त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतो.

८ आ १. शिवाने यक्षराजाचा अवतार धारण करून इंद्रादी देवतांचे गर्वहरण करणे : ‘समुद्रमंथनानंतर अमृत प्राशन केल्यावर इंद्रादी देवतांना अमर झाल्याचा गर्व झाला आणि ते ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांपेक्षाही स्वतःला श्रेष्ठ समजू लागले. तेव्हा त्यांचे गर्वहरण करण्यासाठी शिवाने ‘यक्षराजा’चा अवतार धारण केला. त्याने त्याच्या डाव्या हाताच्या तळव्यावर गवताची काडी घेऊन इंद्रादी देवतांना ती नष्ट करण्यास सांगितले. तेव्हा वरुण, अग्नि, सूर्य, पवन आणि इंद्र या देवतांनी त्यांची संपूर्ण शक्ती पणाला लावूनही ते ती गवताची काडी हलवूही शकले नाहीत. त्या वेळी देवतांचे गर्वहरण झाले आणि ते यक्षराजाला शरण आले. तेव्हा शिवाने यक्षराजाचे रूप सोडून मूळ रूपात त्यांना दर्शन दिले. अशा प्रकारे शिवाने यक्षराजाचा अवतार धारण करून देवतांचे गर्वहरण केले.’ (साभार : दूरचित्रवाणीवरील ‘देवोंके देव महादेव’ या मालिकेतून आणि संदर्भ : सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेतील लिखाणाचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)

८ आ २. शिवाच्या ‘वीरभद्र’ या अवताराने दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद करून त्याचा अहंकार नष्ट करणे : ‘विष्णुभक्त दक्ष प्रजापतीला त्याची शक्ती आणि अधिकार यांचा प्रचंड अहंकार झाला होता. त्यामुळे त्याने त्याचा जावई आणि मुलगी, म्हणजे शिव अन् सती यांना निमंत्रित न करता एका महायज्ञाचा आरंभ केला. शिवाला मान प्राप्त करून देण्यासाठी सती यज्ञस्थळी पोचल्यावर दक्षाने, म्हणजे सतीच्या पित्याने शिवासहित सतीचाही अपमान केला. ‘शिवनिंदा ऐकणेसुद्धा पाप आहे’, या भावनेसे ग्रसित होऊन सतीने यज्ञस्थळीच योगबळाने आत्मदहन केले. शिवगणांनी जेव्हा ही वार्ता शिवापर्यंत पोचवली, तेव्हा शिवाने क्रोधित होऊन शिव-सती विरोधक दक्षाचा अहंकार नष्ट करण्याचा निश्चय केला आणि त्याची एक जटा उपटून भूमीवर टाकली. त्यातून ‘वीरभद्र’ या शिवाच्या उग्र अवताराची निर्मिती झाली. वीरभद्राने शिवाच्या गणांना समवेत घेऊन दक्षाच्या यज्ञस्थळी आक्रमण केले आणि दक्षाचा शिरच्छेद केला. शिरच्छेद झाल्याने दक्षाचा अहंकार नष्ट झाला; परंतु त्याचा अंत झाला नाही. त्यानंतर दक्ष शिवाला शरण गेला. तेव्हा शिवाने ब्रह्मदेव आणि श्रीविष्णु यांच्या प्रार्थनेवरून दक्षाला ‘अज’, म्हणजे बोकड याचे शिर लावले.’

(साभार : https://hi.wikipedia.org/wiki /वीरभद्र)  

८ आ ३. शिवाने प्रथम सूर्यदेव आणि नंतर गणेश यांचा त्रिशुळाने शिरच्छेद करून त्यांचे गर्वहरण करणे अन् नंतर त्यांना पुनर्जीवित करणे : ‘एकदा सूर्यदेवाला त्याच्या शक्तीचा अभिमान झाला होता. तेव्हा शिवाने सूर्यदेवाचे मस्तक छाटून त्याचा अहंकार नष्ट केला आणि त्यानंतर त्याला पुनर्जीवित केले; परंतु या घटनेने सूर्यदेवाचे पिता कश्यपऋषि शिवावर क्रोधित झाले आणि त्यांनी शिवाला ‘तुझ्याही पुत्राचा अहंकार वाढल्याने तुला त्याचा शिरच्छेद करावा लागेल आणि तुला पुत्रवियोगाचे दुःख सहन करावे लागेल’, असा शाप दिला. त्यामुळे जेव्हा पार्वतीने गणपतीची निर्मिती केली, तेव्हा गणपतीला प्राप्त असलेल्या अमोघ शक्तीचा गर्व होऊन त्याने केवळ इंद्रादी देवतांचाच नव्हे, तर ब्रह्मदेव आणि श्रीविष्णु यांचाही पराभव केला. तेव्हा गणपतीचा अहंकार नष्ट करण्यासाठी शिवाने गणपतीशी युद्ध करून त्रिशुळाच्या प्रहाराने त्याचा शिरच्छेद केला. त्यानंतर पार्वतीने विलाप करून उग्र रूप धारण केल्यावर तिला शांत करण्यासाठी श्रीविष्णूने स्वर्गलोकातील शापित झालेल्या आणि पृथ्वीवर सामान्य हत्तीच्या रूपात वावरणार्‍या स्वर्गातील ऐरावतरूपी हत्तीचे शिर छेदले अन् ते गणपतीला लावून त्याला जिवंत केले. नंतर ऐरावताला त्याचे मूळ रूप प्राप्त होऊन तो स्वर्गलोकी परत गेला.’ (साभार : दूरचित्रवाणीवरील ‘देवोंके देव महादेव’ या मालिकेतून आणि संदर्भ : सुश्री मधुरा यांना या धारिकेतील लिखाणाचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज

८ आ ४. संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांनी विसोबा खेचरांचा अहंकार नष्ट करून त्यांना गुरुपदी विराजमान करणे : ‘संत हे ईश्वराचे अंशावतार असल्याने त्यांनी ईश्वराच्या काही भक्तांचा अहंकार नष्ट करून त्यांना आत्मज्ञान प्राप्त करून दिले.

विसोबा खेचर हे संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांना सतत विरोध करत असत. ‘मांडे (महाराष्ट्रातील एक गोड पदार्थ) भाजून भावंडांना खाऊ घालावेत’, यासाठी संत मुक्ताबाई तवा मागण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. तेव्हा विसोबा खेचर यांनी तिला अपमानित करून पाठवून दिले. संत मुक्ताईचे दुःख दूर करून तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी योगाग्नि जागृत केला. त्यामुळे त्यांची पाठ तव्याप्रमाणे तापून लालबुंद झाली. तेव्हा संत मुक्ताईने त्यांच्या पाठीवर मांडे भाजले. हा चमत्कार विसोबा खेचर यांनी लपून पाहिला. तेव्हा त्यांना संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांचा आध्यात्मिक अधिकार लक्षात आला अन् ते संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ यांना शरण आले. त्यानंतर त्यांना संत सोपानदेवांनी शिष्य म्हणून स्वीकारले. विसोबा खेचर यांनी ज्ञानेश्वरीचे वाचन केले. त्यामुळे त्यांचा भ्रम आणि अहंकार नष्ट होऊन ते संत विसोबा खेचर झाले. त्यानंतर ते औंढा नागनाथ (टीप) येथे शिवाची उपासना करू लागले. नंतर काही वर्षांनी श्री विठ्ठलाच्या आज्ञेने संत नामदेव त्यांना शरण आले. तेव्हा विसोबा खेचर यांनी त्यांचा अहंकार नष्ट करून त्यांना आत्मज्ञान दिले. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांनी विसोबा खेचरांचा अहंकार नष्ट करून त्यांना गुरुपदी विराजमान केले.’ (साभार : https://en.wikipedia.org/wiki/Visoba_Khechara)

टीप – औंढा नागनाथ हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

८ आ ५. संत मुक्ताबाई यांनी योगी चांगदेवांचा अहंकार नष्ट करून त्यांना आत्मज्ञान देणे : ‘योगी चांगदेव यांना त्यांची योगसाधना आणि सिद्धी यांचा गर्व झाला होता. त्यांनी संत ज्ञानेश्वरांना पत्र लिहायला घेतले. त्या वेळी ‘पत्र लिहायला कसा आरंभ करावा ?’, हे त्यांच्या लक्षात येईना. तेव्हा त्यांनी कोरा कागदच संत ज्ञानेश्वरांना पाठवला. तो पाहून संत मुक्ताबाई म्हणाली, ‘‘चांगदेव कागदाप्रमाणेच कोरा राहिला. त्याला कसलेही ज्ञान नाही.’’ याचा बोध होण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ‘चांगदेव पासष्टी’ हे पासष्ट श्लोकांचे पत्र चांगदेवांकडे पाठवले. तेव्हा चांगदेवांना त्या पत्राचाही अर्थ उमजला नाही आणि त्यांचा क्रोध अन् अहंकार उफाळून आला. तेव्हा ते संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे भावंडे यांना न्यून लेखण्यासाठी स्वतःच्या सिद्धीचे प्रदर्शन करत हातात नागाचा चाबूक घेऊन वाघावर आरूढ झाले अन् ढोल, ताशे घेऊन वाजत-गाजत संत ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी निघाले. ही वार्ता संत ज्ञानेश्वरांपर्यंत पोचल्यावर संत मुक्ताबाई म्हणाली, ‘‘चांगदेवाचे गर्वहरण होणे आवश्यक आहे.’’ त्यामुळे चारही भावंडे एका पडक्या भिंतीवर बसले. त्यांनी भिंत आकाशातून नेली आणि ते वाटेत चांगदेवांना येऊन भेटले. हा चमत्कार पाहून चांगदेवांचा अहंकार नष्ट झाला आणि ते संत ज्ञानेश्वर अन् संत मुक्ताबाई यांना शरण आले. तेव्हा संत मुक्ताबाईने योगी चांगदेव यांना शिष्य म्हणून स्वीकारून त्यांना आत्मज्ञान दिले.’ (साभार : https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids/669_dnyaneshwar-changdev story.html)                                                

(क्रमशः)

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखन करण्याचा दिनांक अन् वेळ : ३१.१.२०२५ दुपारी २.३० ते ३)

 

 

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.