प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे

प.पू. गजानन महाराज

१. वडिलांची प.पू. गजानन महाराज यांच्यावर अतूट श्रद्धा असणे, त्यांनी प.पू. गजानन महाराज यांच्या पोथीतील एक अध्याय प्रतिदिन वाचण्यास सांगणे आणि आम्ही तसे करणे 

श्री. विनय शास्त्री

‘माझ्या वडिलांची (कै. दिनकर गणेश शास्त्री यांची) शेगावचे प.पू. गजानन महाराज यांच्यावर अतूट श्रद्धा होती; म्हणून आमची (मी आणि माझा भाऊ कै. सुभाष दिनकर शास्त्री यांची) मुंज (व्रतबंध संस्कार) शेगाव येथील प.पू. गजानन महाराज यांच्या मठात झाली. माझ्या वडिलांच्या सांगण्यानुसार आम्ही दोघे भाऊ प्रतिदिन स्नान झाल्यानंतर प.पू. गजानन महाराज यांच्या पोथीतील एक अध्याय वाचत होतो.

२. एक दिवस पहाटे अकस्मात् जाग आल्यावर प्रत्यक्ष प.पू. गजानन महाराज समोर उभे असलेले दिसणे आणि त्यांनी गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगून ‘सर्व ठीक होईल’, असे सांगणे अन् ते अंतर्धान पावणे 

अनुमाने डिसेंबर १९९८ मध्ये माझ्या सांसारिक अडचणीत वाढ झाली होती. त्या कालावधीत मी एकदा आमच्या नागपूर येथील घरी एका खोलीत झोपलो होतो. तेव्हा मला पहाटे ४ वाजता अकस्मात् जाग आली आणि मी उठून बसलो. मी डोळे उघडून समोर पाहिले, तर ‘प्रत्यक्ष प.पू. गजानन महाराज माझ्या समोर उभे होते.’ मी त्यांना नमस्कार केला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘तुला बर्‍याच अडचणी आहेत. तू श्री गुरुचरित्राचे पारायण कर. सर्व ठीक होईल.’ त्यानंतर ते अंतर्धान पावले.

३. त्या वर्षी गुरुचरित्राचे पारायण करणे आणि नंतरच्या वर्षात दत्तजयंतीच्या दिवशी गुरुचरित्राचे सर्व पथ्य पाळून पारायण पूर्ण करणे अन् नंतर सर्व संकटे दूर होणे 

मी त्याच दिवशी सकाळी ९.३० वाजता ‘श्री गुरुचरित्राची’ पोथी विकत आणली. तो दिवस ‘दत्तजयंती’चा होता. मी लगेचच पारायण चालू केले आणि एका आठवड्यात पूर्ण केले. पोथीतील शेवटचा अध्याय वाचत असतांना मला पारायण करतांना पाळावयाची पथ्ये समजली. दुसर्‍या वर्षी दत्तजयंतीच्या दिवशी मी गुरुचरित्राचे पारायण करण्यास आरंभ केला आणि सर्व पथ्ये पाळून ते पारायण पूर्ण केले. त्यानंतर माझी सर्व संकटे दूर झाली.

४. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे

‘आपले गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतात आणि वेळ प्रसंगी योग्य मार्गदर्शन करून आपल्या भक्ताला सर्व संकटातून बाहेर काढतात’, हे माझ्या लक्षात आले. धन्य तो गुरुमहिमा ! आणि धन्य ती गुरूंची अगाध कृपा !’

– श्री. विनय शास्त्री (वय ७९ वर्षे), फोंडा, गोवा. (१२.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक