अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

१७.६.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘देवतांचे भक्तांच्या संदर्भातील कार्य’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.    

(भाग ५)

भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1051756.html

श्रीविष्णू मत्स्यावतार

८ इ. महाप्रलयाच्या वेळी भक्तांचे रक्षण करून नवीन युगाची निर्मिती करणे : महाप्रलयासारख्या मोठ्या घटनांमध्ये सामान्य देवतेला भक्तांचे रक्षण करणे कठीण जाते. त्यामुळे अशा घोर आपत्काळात भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार धारण करत असतो.

८ इ १. कृतयुगात श्रीविष्णूने मत्स्यावतार घेऊन सप्तर्षी, मनु आणि शतरूपा यांचे रक्षण करणे अन् नंतर नवीन सृष्टीची निर्मिती करून सत्ययुगाचा प्रारंभ करणे : कृतयुगात अधर्म बळावल्यामुळे संपूर्ण सृष्टीचा विनाश करून नवीन सृष्टीची निर्मिती करण्याचा निश्चय ब्रह्मदेव, विष्णु आणि शिव यांनी घेतला. त्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी श्रीविष्णूने मत्स्यावतार, म्हणजे विशाल माशाचे रूप धारण केले आणि सप्तर्षी, मनु अन् मनुपत्नी शतरूपा यांना एका नावेत बसण्यास सांगून त्यांचे महाप्रलयातून रक्षण केले. त्यानंतर प्रलय ओसरल्यावर निर्माण झालेल्या भूखंडावर सप्तर्षी, मनु आणि शतरूपा नावेतून बाहेर आले. मत्स्यावताराने त्यांना नवीन सृष्टीची निर्मिती करण्याचा आदेश दिला. त्यामुळे कृतयुग संपून सत्ययुगाचा प्रारंभ झाला. (साभार : https://www.hindudharmakatha.com/matsya-avatar-ki-katha/)

सुश्री (कु.) मधुरा भोसले

८ ई. भक्त आणि पृथ्वी यांचे दुःख हरण करणे : ऋषिमुनी हे जनतेचे खरेखुरे आधार असतात; म्हणूनच पृथ्वीवर एखादे संकट आले, तर त्याच्या निवारणार्थ जनता ऋषिमुनींना शरण जाते. ऋषिमुनी हे भगवंताचे भक्त असल्यामुळे त्यांचे, मनुष्याचे आणि पृथ्वीचे दुःख हरण करण्यासाठी श्रीविष्णु अन् अन्य देवता अवतार धारण करतात, तसेच दुष्टांचा नाश आणि साधू-संतांचे (ऋषिमुनींचे) रक्षण करून धर्माची विस्कटलेली घडी नीट बसवतात अन् आपल्या स्वरूपात विलीन होतात.

८ ई १. श्रीविष्णूने भक्त आणि पृथ्वी यांचे दुःख हरण करण्यासाठी सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग अन् कलियुग यांत दहा अवतार घेऊन कार्य केले.

८ ई २. भगवान श्रीकृष्णाने ‘वस्त्रावतार’ धारण करणे : द्वापरयुगात द्युतसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण होत असतांना तिचे लज्जारक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने ‘वस्त्रावतार’ धारण करून तिला वस्त्रे पुरवली. (सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेतील लिखाणाचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)

८ उ. ‘भक्तांना उच्चतम आध्यात्मिक अवस्था अनुभवण्यास मिळावी’, यासाठी भगवंताने अवतार धारण करणे : भक्तांना चिन्मयानंद (चिरंतन टिकणारा आनंद) मिळावा’, यासाठी भगवंत विविध रूपांत पृथ्वीवर अवतरित होतो. त्यामुळे भक्तांना भगवंताच्या अवताराचे दर्शन होऊन त्याचा दुर्लभ सत्संग मिळतो अन् त्याची अपार प्रीती आणि कृपा अनुभण्यास मिळते. त्यामुळे भक्तांचे मन भावविभोर होऊन ते चिन्मयानंदात तल्लीन होतात आणि त्यांना उच्चतम आध्यात्मिक अवस्था अनुभवण्यास मिळते.

८ उ १. प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांच्या बालपणापासून विविध लीला केल्या आणि त्यांच्या अनेक भक्तांना त्यांच्या सत्संगातून चिन्मयानंद देऊन त्यांना भावविभोर केले. (सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेतील लिखाणाचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)  

८ ऊ. भक्तांचे कौतुक करणे आणि त्यांचे कौतुक ऐकणे : ‘संतरूपी भक्तांचे कौतुक करण्यासाठी आणि समाजाने केलेले त्यांचे कौतुक ऐकण्यासाठी भगवंत अवतार धारण करतो.

८ ऊ १. श्री विठ्ठलाने अनेक संतांचे गुणगान करणे आणि त्यांचे गुणगान ऐकणे : श्रीकृष्णाने कलियुगात भक्त पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन ‘श्री विठ्ठल किंवा पांडुरंग’ हा अवतार धारण केला. महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, संत नामदेव इत्यादी संतमंडळी श्री विठ्ठलाचे परम भक्त होती. श्री विठ्ठलही या संतजनांमध्ये मिसळून त्यांच्या भक्तीत रंगून गेला होता. अशा प्रकारे आपल्या भक्तांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांचे कौतुक ऐकण्यासाठी भगवंत अवतार धारण करतो. (सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेतील लिखाणाचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) 

८ ए. भक्तांना लुप्त झालेले ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान देणे : कालौघात अनेक वेळा ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान लुप्त होते. अशा वेळी व्यष्टी स्तरावरील भक्तांना आत्मज्ञान आणि समष्टी स्तरावरील भक्तांना आत्मज्ञानासह ब्रह्मज्ञान देण्यासाठी भगवंत अवतार धारण करतो.

८ ए १. श्री गणेशाने वरेण्य राजाला ‘गणेशगीता’ सांगणे : ‘द्वापरयुगात श्री गणेशाने त्याचा परम भक्त असलेल्या वरेण्य राजाला योगमार्गप्रकाशक, सर्वसिद्धीदायक, अज्ञाननाशक आणि मनुष्य जीवनाचा उद्देश सांगणारी ‘गणेशगीता’ सांगितली. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गणपति’)

८ ए २. श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगणे : ‘भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगून त्याला आत्मज्ञान, वेद आणि उपनिषदे यांचे ज्ञान अन् ब्रह्मज्ञान देऊन कृतार्थ केले.

९. मनुष्याच्या संदर्भातील कार्य

९ अ. मनुष्यातील पशुत्व नष्ट करून त्याच्यातील देवत्व जागृत करणे : कलियुगाच्या प्रभावामुळे मनुष्याची वृत्ती बहिर्मुख होऊन तो पशूवत् वागत आहे. ८४ लक्ष योनींतील जिवांपैकी केवळ मनुष्य योनीतच साधना होऊन मोक्षप्राप्ती करता येते. ‘मनुष्यजन्माचा उद्देश भोगविलास करणे नसून साधना करून मुक्ती आणि मोक्ष यांची प्राप्ती करणे आहे’, याची जाणीव मनुष्याला करून देण्यासाठी भगवंत विविध अवतार धारण करतो. काही वेळा तो पुरुष, तर काही वेळा तो स्त्री रूपाने येऊन गुरुस्वरूप बनून मनुष्याला मार्गदर्शन करतो. त्यामुळे मनुष्याचे पाशवीपण नष्ट होऊन त्याच्यामध्ये सुप्तावस्थेत असणारे देवत्व जागृत होते.

भगवान श्रीकृष्ण आणि बलराम

९ अ १. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम : मनुष्यातील पाशवीपणा नष्ट करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने पांडवांच्या माध्यमातून पशूपेक्षा हीन दर्जा प्राप्त केलेल्या कौरवांचा कुरुक्षेत्रावरील महाभारताच्या युद्धात नाश केला. त्याचप्रमाणे पशूवत् झालेल्या यादव कुळाचाही भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी स्वतःच्या हातांनी नाश केला.

९ आ. निवृत्तीमार्गियांचा होणारा छळ थांबवून त्यांचे रक्षण करणे : माणसाला मनुष्य म्हणून जगण्याची कला, म्हणजे मनाने मनुष्य होण्याची कला धर्म शिकवतो. विवेकानंदांनी ‘मनाने मनुष्य होणे’, अशी आपल्या शिक्षणाची व्याख्या केली. ‘आपण देहाने मनुष्य झालो असलो, तरी मनाने अजून मनुष्य झालेलो नाही’, या जाणिवेनेच आपले पूर्वज १२ वर्षे गुरुगृही रहात असत. मनाने मनुष्य झालेले निवृत्तीमार्ग स्वीकारत असत आणि त्याविषयी अपुरे राहिलेले प्रवृत्तीमार्ग स्वीकारत असत. हे प्रवृत्तीमार्गीय आपला उणेपणा निवृत्तीमार्गियांच्या सेवेने घालवत. धर्माची घडी विस्कटली की, प्रवृत्तीमार्गीय आणि निवृत्तीमार्गीय यांच्यातील दुवा निखळतो. तेव्हा ईश्वराने प्रवृत्तीमार्गियांवर  निवृत्तीमार्गियांच्या योगक्षेमाचे उत्तरदायित्व सोपवलेले असते. ते दायित्व जर प्रवृत्तीमार्गीय डावलत राहिले, तर साधूंच्या तपक्रियेत बाधा येते. कलीच्या कुप्रभावामुळे प्रवृत्तीमार्गीय दुष्ट होऊन निवृत्तीमार्गियांचा छळ करू लागतात. निवृत्तीमार्गीय हे भगवंताचे भक्त असल्यामुळे ईश्वर त्यांच्या रक्षणासाठी अवतार घेतो. ‘दुष्टांचा संहार करणे’, हे त्या अवताराचे कार्य असते.

९ आ १. भगवान परशुरामाने उन्मत्त झालेल्या कार्तवीर्य सहस्रार्जुनासारख्या असंख्य क्षत्रियांचा नाश करून ऋषिमुनीरूपी निवृत्तीमार्गियांवरील अत्याचार दूर करून त्याचे रक्षण केले.

(साभार : https://www.vedaboys.com/who-was-kartavirya-arjuna-why-he-was-killed-by-parashurama/)                                             

(क्रमशः)

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखन करण्याचा दिनांक अन् वेळ : ३१.१.२०२५, दुपारी ३ ते ३.३०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.