केरळम्मधील ‘इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीग’ या पक्षाची पहिली महिला आमदार फातिमा तहिलिया यांनी पेरांब्रा येथे एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी पारंपरिक तेलाचा दिवा (निलविलक्कू) लावला. त्यावरून तेथे मोठा गदारोळ माजला आहे. तिचा पक्ष आणि अन्य कट्टर इस्लामी यांनी तिच्यावर टीका करत काहींनी तिला धर्मातून बाहेर काढण्याच्या गोष्टी केल्या आहेत, तसेच ‘समस्त केरळ जमीय्यतुल उलेमा’ या सुन्नी विद्वान संस्थेने तीव्र आक्षेप घेतला आहे. केरळम्मध्ये असा वाद पूर्वीही झालेला आहे. माजी शिक्षणमंत्री अब्दू रब्ब यांनी सरकारी कार्यक्रमात दिवा लावण्यास नकार दिला होता. तेव्हा प्रसिद्ध अभिनेते माम्मुटी यांनी जाहीरपणे म्हटले होते, ‘दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे. त्यामुळे मुसलमानांनी अशा गोष्टींचा बाऊ करू नये.’

१. दीपप्रज्वलन विरोधकांची ‘धर्म प्रथम’ भूमिका
प्रारंभी दीपप्रज्वलन करून मग कार्यक्रमाचा प्रारंभ करणे, ही भारतीय संस्कृती आहे. या प्रथेत मुसलमानांनी सहभागी होण्याला सलाफी, वहाबी इत्यादी या प्रथेला कडक विरोध करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘जर दिवा लावण्याने भाग्य उजळते किंवा संकट टळते, अशी श्रद्धा असेल, तर ते इस्लामच्या विरोधात आहे. इस्लाममध्ये इतर धर्मांच्या धार्मिक प्रथांची हुबेहूब नक्कल करण्यास सक्त मनाई आहे.’ ‘इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीग’ या पक्षाला पाठिंबा देणार्या मौलवींचे आणि धार्मिक नेत्यांचे स्पष्ट मत आहे की, राजकीय पदापेक्षा धार्मिक व्यक्तीची धार्मिक ओळख अन् नियम महत्त्वाचे आहेत. जर पक्षाच्या नेत्यांनी उघडपणे फतव्यांचे उल्लंघन केले, तर पक्षाची पारंपरिक मुस्लिम मतपेढी अप्रसन्न होऊ शकते, असेही त्यांचे म्हणणे आहे.
२. ‘दीपप्रज्वलन करावे’, असे म्हणणार्या मुसलमानांची भूमिका

‘इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीग’ या पक्षातील काही आधुनिक विचारसरणीच्या नेत्यांचे मत आहे, ‘लोकशाहीत सर्वधर्मीय जनतेचे प्रतिनिधित्व करतांना सामाजिक सलोखा राखणे महत्त्वाचे आहे. दिवा लावणे, हे केवळ ज्ञानाचे आणि एका सांस्कृतिक सोहळ्याचे प्रतीक आहे, त्यात कोणतीही धार्मिक पूजा नसते. या तरुणांचे नेतृत्व एकेकाळी आमदार फातिमा यांनी केले होते.’ या मंडळींखेरीज फातिमा तहिलिया यांच्या पाठीशी एम्.एन्. कारस्सेरी यांच्यासारखे मुसलमान समाजातीलच सुधारणावादी विचारवंत आणि केरळमधील धर्मनिरपेक्ष राजकीय अन् सामाजिक नेते उभे राहिले आहेत. येथे नोंद घेण्यासारखे, म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. झाकीर हुसेन, फक्रुद्दीन अली अहमद हे तीनही राष्ट्रपती अशा प्रकारचे दीपप्रज्वलन करत असत. डॉ. कलाम हे कुराण आणि उपनिषदे या दोन्हींचे अभ्यासक होते. त्यांच्या मते ‘दिव्याची ज्योत ही केवळ ‘ज्ञान, वैज्ञानिक प्रगती आणि अज्ञानाचा नाश’ यांचे प्रतीक होती.’ ‘भारताची संस्कृती ही ‘गंगा-जमुनी तहजीब’ (मिश्र संस्कृती) आहे’, यावर डॉ. झाकीर हुसेन यांचा विश्वास होता. ‘देशाच्या विविधतेचा आदर केल्याने स्वतःचा धर्म धोक्यात येत नाही’, असे ते मानत. डॉ. फक्रुद्दीन अली अहमद यांनी या कृतीला धार्मिक विधी न मानता राज्याचे प्रमुख म्हणून असलेले एक नागरी कर्तव्य मानले.
३. लोकप्रतिनिधी महिला वैचारिक स्वातंत्र्यासाठी पात्र नाही का ?
एकूण असे दिसते की, ‘समस्त’, सारख्या मंडळींसाठी ‘इस्लाम प्रथम’ आहे. ते त्या महिलेला वैचारिक स्वातंत्र्यही द्यायला सिद्ध नाहीत. यातून हेही स्पष्ट होते की, आता ज्या मुसलमानांना स्वत:चा सांस्कृतिक परिचय, म्हणजेच स्वत:ची धार्मिक ओळख हे समीकरण नको आहे, त्यांनीच त्यांचे व्यक्तीगत स्वातंत्र्य राखायला हवे. जर दीप्रज्वलनापासून दूर रहाणारे मुसलमान ते स्वत:चे व्यक्तीगत स्वातंत्र्य राखण्याच्या नावाखाली धार्मिक ओळखीला प्राधान्य देत असतील, तर ते स्वातंत्र्य वापरून तरुण सुधारणावादी मुसलमानांनी स्वतःचे म्हणणे ठासून का मांडू नये ?
४. राष्ट्रीय एकतेत संस्कृतीचे महत्त्व
राष्ट्र म्हणजे केवळ भूमी नव्हे. राष्ट्र म्हणजे केवळ त्यात रहाणारी माणसे नव्हेत. प्रत्येक राष्ट्र स्वत:चा एक स्वतंत्र परिचय असणारे सजीव व्यक्तीमत्त्व असते. राष्ट्राची संस्कृती हा या व्यक्तीमत्वाचा आत्मा आहे. तो आत्मा, म्हणजेच संस्कृती स्वीकारली, तर राष्ट्रीय एकता कशी राखायची, ही समस्या कधीच मोठी बनत नाही. इंडोनेशिया जगातील सर्वांत मोठे इस्लामी राष्ट्र आहे. तेथील नेत्यांनी देश स्वतंत्र झाला, तेव्हा ‘शरीयतनुसार राजवट लागू करावी’, ही इस्लामवाद्यांची मागणी फेटाळून सर्व समावेशक पंचशील तत्त्वे घटनेसाठी स्वीकारली. त्यांनी सांस्कृतिक बंधुभाव आणि राष्ट्रकल्याण यांना असल्या धार्मिकतेपेक्षा श्रेष्ठ स्थान दिले. हा देश (इंडोनेशिया) इस्लामबहुल असला, तरी तेथे अन्य धर्माचेही लोक रहातात, हे लक्षात घेऊन त्यांनी असे केले. ते तेथील मुसलमानांनी स्वीकारले. भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही भूमी पौवार्त्य धर्म-पंथांची जन्मभूमी असल्याने येथे त्या धर्म-पंथांना अनुकूल संस्कृती असणार, यात शंका नाही, तरी येथे अन्य धर्मियांना राज्यघटनेनेही चांगले संरक्षण दिले आहे. भारतात ३ मुसलमान राष्ट्रपती होतात, यातून ते लक्षात यावे.
आज आपल्या सदस्यांना सार्वजनिक समारंभातही धर्मपालन करून वेगळेपण जपण्यासाठी आग्रह धरणारे त्यांचे बल आणखी वाढले की, इतरांवर त्यांचे हे दृष्टीकोन लादणार, हे स्पष्ट आहे. ‘इस्लामिक रिपब्लिक’ अशी ओळख सांगणार्या पाकिस्तानमध्ये लाहोरमधील रस्त्यांना इत्यादी पूर्वी असलेली हिंदु नावे देऊ करून त्या शहराची मूळ संस्कृती जपण्याचा प्रयत्न तेथील सरकारने अलीकडेच केला. तेथील कट्टर इस्लामींनी त्यालाही विरोध केला. त्यांच्या पुढे प्रशासनाला माघार घ्यावी लागली. त्यामुळे आज मूळ भारतीय संस्कृतीला विरोध करणारे अधिक बलवान बनले, तर ते भारताचे व्यक्तीमत्त्व त्या धर्मांचे प्राबल्य असलेल्या अन्य राष्ट्रांप्रमाणे करणार. खरा प्रश्न ‘भारतात धर्म हा राष्ट्राचा आत्मा नसावा; कारण येथे अनेक धर्म-पंथांची मंडळी रहातात’, असे सांगणार्यांसाठी आहे. तो हा की, मग भारत देशाचा आत्मा भारतीय संस्कृती असावी कि सनातन धर्म ? त्यांचा भारत हे हिंदु राष्ट्र घोषित करण्याला विरोध असतो. भारत बहुपंथीय-बहुधर्मीय असल्याने या राष्ट्राचा आत्मा हिंदु धर्म असू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे नक्कीच असेल, तर मग त्या जागी संस्कृतीच तेथे असावी लागते. तसे असेल, तर ती संस्कृती कोणती ? या मातीतीलच कि बाहेरच्या वाळवंटी प्रदेशातील ?
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.६.२०२६)
हिदु धर्माचा झेंडा !
‘ख्रिस्ती धर्मच एकमेव श्रेष्ठ’ असल्याचे सांगणार्या पाद्र्याची याचिका प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाकडून असंमत !
‘कॉकरोच’ना ‘डायनासॉर’ म्हणून रंगवले, तरी देशात क्रांती होणे अशक्य !
आदिवासी कि वनवासी ?
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !