श्रीकृष्णनीती आणि लढाऊ वृत्ती यांच्या माध्यमातून हिंदु धर्माचे रक्षण !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. राजौरी (जम्मू-काश्मीर) येथील सहस्रो हिंदूंच्या नरसंहाराविषयी हिंदू अनभिज्ञ

‘वर्ष १९४७ मध्ये भारतात महाराजा हरि सिंह यांनी विलीन होण्याविषयीच्या ‘करारनाम्या’वर स्वाक्षरी केली. त्याच्या २-३ दिवसांपूर्वी दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानी घुसखोरांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरीवर ताबा मिळवला आणि २० सहस्रांहून अधिक हिंदूंचा संहार केला. त्यासंदर्भात तेथे ५ मजल्यांचे ‘बलीदान भवन’ उभारण्यात आले आहे. तेथे नरसंहाराची विविध कृष्ण-धवल छायाचित्रे लावलेली आहेत. त्यात मानवी कवट्यांचा ढिग असलेले एक छायाचित्र आहे. दिवाळीच्या दिवशी घरातील बहुतांश पुरुषवर्ग बाजारहाट करायला बाहेर गेला असतांनाच पाकिस्तानी घुसखोरांनी आक्रमण केले. त्यांच्यापासून शीलरक्षण करण्यासाठी अनेक महिलांनी धारदार शस्त्रांनी आत्महत्या केली. ज्यांच्याकडे काहीच धारदार शस्त्रे नव्हती, त्यांनी काचेच्या बाटल्या फोडून आणि त्यांच्या काचा खाऊन मृत्यू स्वीकारला. हिंदु महिलांनी शीलरक्षणासाठी वेदनादायी मृत्यू कवटाळला; पण त्या जिवंतपणी धर्मांधांच्या हाती लागल्या नाहीत. हा रक्तरंजित इतिहास भारतात रहाणार्‍यांनाही ठाऊक नाही, हे दुर्दैवी आहे.

श्री. गिरिधर मामिडी यांचा परिचय

श्री. गिरिधर मामिडी

भाग्यनगर, तेलंगाणा येथील श्री. गिरिधर मामिडी हे ‘प्रज्ञा भारती तेलंगाणा’चे उपाध्यक्ष आहेत. ते ‘गूगल इंडिया’चे पहिले ‘वित्त आणि लेखा’ प्रमुख आहेत. अनेक दूरचित्रवाहिन्यांच्या चर्चासत्रांमध्ये वक्ता म्हणून ते सहभागी होतात. भारतीय सैन्याच्या विजयासाठी आणि ‘अखंड भारता’च्या पुनर्स्थापनेसाठी त्यांनी पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांच्या सीमावर्ती ठिकाणी अनेक रुद्राभिषेक केले.

२. अधर्माला अधर्मानेच प्रत्युत्तर देणार्‍या भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे हिंदूंना विस्मरण

वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटिशांनी कायदा करून हिंदूंकडील शस्त्रे काढून घेतली आणि त्यांना निःशस्त्र केले. त्यांनी तोच कायदा मुसलमानांना मात्र लागू केला नाही. त्यामुळे फाळणीच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले, तेव्हा निःशस्त्र हिंदू स्वतःचे रक्षण करू शकले नाहीत. आंध्रप्रदेशच्या भाग्यनगर येथे वर्ष १९८० ते १९९० त्या काळात प्रतिवर्षी गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी थोडातरी हिंसाचार निश्चितपणे होत होता. तेथील मुसलमान निष्पाप हिंदूंना ठार मारत होते. जेव्हा हिंदूंनी आत्मरक्षणासाठी प्रतिकार करणे चालू केले, तेव्हा त्याचा फटका धर्मांधांनाही बसला. त्यानंतर हिंदूंवरील आक्रमणाचे प्रकार थांबले. त्यांचा कित्ता सर्वत्रच्या हिंदूंनी गिरवल्यास आश्चर्य ते काय ? अन्यथा राजौरीसारख्या घटना सगळीकडे परत परत होतील.

दुशासनाने द्रौपदीचा पदर ओढल्यामुळे नंतर झालेल्या महाभारताच्या युद्धात कौरवांच्या संपूर्ण १८ अक्षौहिणी सैन्याला भगवान श्रीकृष्णाने संकल्पाद्वारे आधीच मारले. त्यात भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य, दुर्याेधन अशा सर्वांना ठार मारले. यातून आपण हिंदू कितीही धर्मानुसार वागलो, तरी शत्रू हा कोणताही धर्म मानत नाही. त्यामुळे आपणही अधर्माशी अधर्मानेच युद्ध केले पाहिजे, हे शिकायला मिळते. हा इतिहास विसरल्यामुळे हिंदूंची स्थिती महाभारताच्या युद्धात गोंधळलेल्या अर्जुनासारखी आणि महंमद घोरीकडून ठार झालेल्या पृथ्वीराज चौहानसारखी झाली आहे. हिंदु स्त्रियांवर प्रतिदिन एवढे अत्याचार होत असतांना हिंदु समाजाकडून विशेष प्रतिकार होतांना दिसत नाही; कारण ही शिकवण आपण पूर्णत: विसरून गेलो आहोत. त्याकडे आपल्याला परत वळण्याची पाळी आली आहे. जोपर्यंत आपण लढाऊ वृत्ती बाणवणार नाही, तोपर्यंत आपल्याला मुक्ती मिळणार नाही. त्यासाठी आपल्या मुलांना सैन्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

३. हिंदूंना शस्त्रसज्ज करणारी दक्षिण भारतातील ‘वीरभद्रपल्यम्’ प्रथा

तेलंगाणामध्ये ‘आराछिलो’, म्हणजे ‘लिंगाधार’ समाज आहे. ते शिवलिंग धारण करून त्याची पूजा करतात. ते स्वतःला ‘शिव’ समजतात. गृहप्रवेश, विवाह यांसारखे  कोणतेही मंगल प्रसंगी त्यांच्याकडे ‘वीरभद्रपल्यम्’ नावाची एक प्रथा प्रचलित आहे. त्यामध्ये संपूर्ण दिवसभर शस्त्रपूजा केली जाते. वीरभद्राने दक्ष प्रजापतीच्या यज्ञात जसे केले होते, तसे ते पुन्हा शस्त्र हातात घेऊन शहरातील सर्व रस्त्यातून नाचवत नेतात. (देवी सतीच्या आत्मदहनाने क्रोधित भगवान शिवाने त्याच्या जटांमधून वीरभद्र निर्माण केला. वीरभद्राने प्रजापती दक्षाचा यज्ञ नष्ट केला आणि शेवटी अहंकाराचे मूर्तीमंत रूप असलेल्या प्रजापती दक्षाचे शीर धडापासून वेगळे केले.)

वर्ष ११५० ते १३२३ या काळात दक्षिण भारतात (मुख्यत्वे तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश) ‘काकतीय’ हा अत्यंत शक्तीशाली आणि समृद्ध सूर्यवंशी क्षत्रिय राजवंश होता. त्यांनी ‘ओरुगल्लू’ (सध्याचे वारंगल) येथून राज्य केले होते. कालांतराने वर्ष १३२३ मध्ये या साम्राज्याचे पतन होऊन तेथे मुसलमानांची सत्ता आली. तेव्हा या लोकांनी ही प्रथा आरंभ केली. जेव्हा मुसलमान शासक येऊन त्यांना विचारत, तेव्हा ते ‘हे आमच्या भगवंताचे अस्त्र आहे, आम्ही त्याची पूजा करत आहोत. जे वीरभद्राने केले, त्याचेच अनुकरण आम्ही करत आहोत’, असे ते सांगायचे. नंतर ते स्वतःच्या शरिरावर एक सुई टोचतात. त्या वेळी रक्त आले, तर त्यातून समाजाला संदेश देतात की, आम्ही तुम्हाला घाबरत नाही. ८०० वर्षांपासून ही प्रथा चालत आली आहे. त्यामुळे आपल्याला हिंदु धर्म टिकवून ठेवायचा असेल, तर हिंदु समाजात पुन्हा लढाऊ वृत्ती जागृत करण्याची आवश्यकता आहे.

४. इसिसच्या आतंकवाद्यांना धडा शिकवणार्‍या कुर्दिश महिला योद्ध्या

इसिसचे आतंकवादी मरणाला घाबरत नाहीत; कारण त्यांना ‘धर्मासाठी मेला, तर स्वर्गात ७२ अप्सरा (७२ हुर्रे) भोगायला मिळतील’, असे सांगण्यात आले आहे. तेच इसिसचे आतंकवादी कुर्दिश महिला योद्ध्यांना घाबरतात; कारण त्यांना वाटते की, त्यांचा मृत्यू महिलांच्या हातून झाला, तर अल्ला त्यांना स्वर्ग देणार नाही. इसिसच्या आतंकवाद्यांचा सामना करण्यासाठी कुर्दिश महिला योद्ध्यांचे सैन्य सिद्ध करण्यात आले आहे. त्यांना पाहून इसिसचे आतंकवादी पलायन करतात.

५. हिंदु धर्मशास्त्रावर आधारित नव्याने राज्यघटना लिहिणे आवश्यक !

भारताच्या राज्यघटनेचा पाया वर्ष १९४६ मध्ये बनवला होता. देश सोडून जातांना इंग्रजांनी आधीच सिद्ध केलेली राज्यघटना मसुदा समितीच्या हाती थोपवली होती. त्यानंतर त्यात विशेष पालट करण्यात आले नाहीत. त्यामुळे सध्याच्या राज्यघटनेला भारतीय  राज्यघटना म्हणता येणार नाही. या घटनेने सध्या हिंदूंना अधिकार नाहीत, तर केवळ कर्तव्ये दिली आहेत. सध्याची मुले त्यांच्या आई-वडिलांचे ऐकत नाहीत, त्यांना जे करायचे, तेच करतात. या सर्व गोष्टी ‘अँग्लो-ख्रिस्ती प्रोटेस्टंट’ विचारसरणीवर आधारलेल्या राज्यघटनेनुसार आहेत. भारतीय राज्यघटना ही दुसर्‍या संस्कृतीच्या विचारसरणीनुसार बनवली गेली आहे. त्यामुळे हिंदु धर्मशास्त्रावर आधारित नवीन राज्यघटनेची मागणी करणे आवश्यक आहे.’

– श्री. गिरिधर मामिडी, तेलंगाणा अखिल भारतीय सदस्य, प्रज्ञा प्रवाह.