चर्चासत्राच्या वेळी संगीत विभागातील साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प्रथमच आयोजित केलेले आणि गुरुकृपेने यशस्वी झालेले ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’, हे २ दिवसांचे चर्चासत्र !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने २२ आणि २३.३.२०२६ या दिवशी समाजातील प्रतिष्ठित कलाकारांचे ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’, हे २ दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. अशा प्रकारचे चर्चासत्र महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील संगीत (गायन, वादन अन् नृत्य) क्षेत्रातील १३ मान्यवर गुरुजन अन् कलाकार यांची उपस्थिती लाभली. त्यांनी ‘संगीत आणि अध्यात्म’, या विषयावर अमूल्य सूत्रे मांडली. 

‘या चर्चासत्राच्या वेळी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे, मान्यवर कलाकारांनी काढलेले गौरवोद्गार आपण २ जून या दिवशी पाहिले. आज चर्चासत्राशी संबंधित विविध सेवा करतांना साधकांना आलेल्या अनुभूती’ येथे दिल्या आहेत.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1046401.html

चर्चासत्राला उपस्थित सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे,  पू. पं. केशव गिंडे,  सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि गायन, वादन अन नृत्य क्षेत्रातील मान्यवर, गुरुजन आणि कलाकार

९. कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. 

सुश्री तेजल पात्रीकर

९ अ . ‘गुरुदेवांनी चर्चासत्राच्या सेवेसाठी शक्ती प्रदान केली आणि त्यांनीच सेवा करून घेतली’, याची अनुभूती येणे : ‘चर्चासत्रासाठी आलेले सगळे जण हे समाजातील प्रतिष्ठित आणि तज्ञ कलाकार होते, तसेच ते वयानेही मोठे होते. ‘त्यांच्या समोर गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) कलेतून साधनेची दिशा देणारी शिकवण मांडणे आणि या अनुषंगाने त्यांच्यासह चर्चा करणे’, याविषयी आरंभी माझ्या मनावर ताण होता; परंतु प्रत्यक्ष चर्चासत्र चालू झाल्यावर मला स्वतःमध्ये एक वेगळी ऊर्जा कार्यरत झाल्याचे जाणवत होते. विषय मांडतांना आणि बोलतांना सगळे सहजतेने होत होते. बुद्धीने विचार करावा लागत नव्हता. या सेवेसाठी गुरुदेवांनी एक वेगळीच ऊर्जा दिल्याचे मी अनुभवत होते. एखादा फुगलेला फुगा असतो आणि त्याला टाचणी लावल्यावर तो एकदम लहान होऊन जातो, त्याप्रमाणे ‘चर्चासत्राच्या सेवेच्या वेळी मी ईश्वरी शक्तीने भारित झाले होते आणि चर्चासत्रानंतर एकदम त्या शक्तीचा ओघ ओसरला’, असे मला जाणवले. ‘गुरुदेवांनीच या कार्यासाठी मला शक्ती प्रदान केली होती आणि त्यांनीच हे सगळे माझ्याकडून करून घेतले’, हे या वेळी मी प्रकर्षाने अनुभवले.’

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

१०. कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. 

कु. शर्वरी कानस्कर

१० अ. भक्तीसत्संगातील ‘विचारणे’ आणि ‘ऐकणे’, या सूत्रांवर प्रयत्न केल्याने सेवेत झालेला लाभ ! : ‘मला चर्चासत्रामध्ये भोजनव्यवस्थेच्या अंतर्गत सेवा होती. पूर्वी माझ्याकडून ‘उत्तरदायी साधिकेला विचारून कृती होत नव्हत्या; परंतु या वेळी भक्तीसत्संगात सांगितलेल्या ‘विचारणे’ आणि ‘ऐकणे’, या सूत्रांवर प्रयत्न केल्यामुळे मला प्रत्येक कृती उत्तरदायी साधिकेला विचारून करता आली आणि त्याप्रमाणे ऐकणे अन् स्वीकारणे आपोआप झाले.

१० आ . चर्चासत्राच्या स्थळी गेल्यावर आलेल्या अनुभूती 

१. ज्या कक्षात चर्चासत्र चालू होते, त्या कक्षात गेल्यावर ‘गुरुतत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत आहे’, असे मला जाणवत होते.

२. त्या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाच्या भोवती मला पांढरा प्रकाश दिसत होता.

३. ‘गुरुतत्त्वाने उपस्थित मान्यवर कलाकारांना एकत्र जोडले असून त्यामुळेच चर्चासत्र होऊ शकत आहे’, असे मला जाणवत होते.’

११. कु. अंजली कानस्कर, दुर्ग, छत्तीसगड.

कु. अंजली कानस्कर

११ अ. वाहन समितीच्या अंतर्गत सेवा करतांना श्री. परशुराम पाटील यांच्याकडून ‘सेवा अधिक भावपूर्ण आणि परिपूर्ण कशी करावी ?’, याविषयीची सूत्रे शिकायला मिळणे : ‘या चर्चासत्रामध्ये मला वाहन समितीच्या अंतर्गत सेवा करण्याची संधी मिळणार आहे’, हे समजल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आणि कृतज्ञता वाटून माझ्याकडून गुरुचरणी प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेवा, ‘माझ्याकडून ही सेवा ‘अतिथी देवो भव ।’, या भावाने होऊ द्या. मला सेवेतील चैतन्य ग्रहण करता येऊ द्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

या सेवेमध्ये ‘कलाकारांचे आगमन आणि प्रस्थान यांच्या तपशिलानुसार वाहनांशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांशी समन्वय करणे, कलाकार आश्रमात आल्यानंतर त्यांचे स्वागत करणे, तसेच परत जातांना त्यांना विमानतळ किंवा रेल्वे स्थानक यांवर सोडणार्‍या साधकांशी जोडून देणे’, अशी या सेवेची व्याप्ती होती. हा समन्वय करतांना मला वाहनांशी संबंधित सेवा करणारे साधक श्री. परशुराम पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे) यांच्याकडून ‘सेवा अधिक भावपूर्ण आणि परिपूर्ण कशी करावी ?’, याविषयीची सूत्रे शिकायला मिळाली.

११ आ. सेवेमुळे चर्चासत्र पहाता न येणे आणि प्रार्थना केल्यावर मनात कोणतीही प्रतिक्रिया न येता सेवेत उत्साह जाणवणे : चर्चासत्रासाठी सकाळपासून दुपारपर्यंत कलाकार आणि पाहुणे आश्रमात येत होते. माझ्याकडे पाहुण्यांना कार्यक्रमस्थळी नेण्याची सेवा असल्यामुळे मला प्रत्यक्षात चालू असलेले सत्र पहाता आणि ऐकता येणार नव्हते. याविषयी मनात प्रतिक्रिया येऊ नये’, यासाठी मी पुढील प्रार्थना करत होते, ‘हे श्रीमन्नारायणा, जरी मला प्रत्यक्षात चर्चासत्र ऐकता येत नसेल, तरी संपूर्ण सेवेत आपण माझ्यावर जी कृपा करत आहात, ती मला अनुभवता येऊ द्या. मला प्रत्येक क्षणी सेवेतील आनंद अनुभवता येऊ द्या. मला प्रत्येक क्षणी स्वीकारण्याच्या आणि शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊ द्या. ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’, या भावाने आपल्या श्री चरणी सेवा अर्पण होण्यासाठी माझ्याकडून आपणच प्रयत्न करून घ्या.’ या प्रार्थनेमुळे देवाच्या कृपेने माझ्या मनात ‘मला चर्चासत्रातील सूत्रे ऐकायला मिळणार नाहीत’, असा विचार आला नाही. मला सेवेत पुष्कळ उत्साह जाणवत होता.

११ इ . सेवेत जेव्हा अडचणी आल्या, तेव्हा त्यांवर उपाययोजना सहज मिळत होत्या.

११ ई. साधकांमध्ये संघभाव जाणवणे : एखाद्या साधकाला त्याच्या सेवेत अडचण आल्यास इतर साधक केवळ त्यांना दिलेल्या सेवेपुरते मर्यादित न रहाता तत्परतेने साहाय्यासाठी पुढे येत होते. त्यामुळे एकूण सर्वच साधकांमध्ये संघभाव जाणवत होता.’

१२. सौ. भक्ती कुलकर्णी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. 

सौ. भक्ती कुलकर्णी

१२ अ. साधकांच्या कौशल्यानुसार सेवांचे नियोजन आपोआप होणे : ‘चर्चासत्राच्या विविध सेवा संगीत विभागातील साधकांना वाटून दिल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक साधकाच्या कौशल्यानुसार सेवांचे नियोजन आपोआप झाले होते, तसेच प्रत्येक साधकाने ‘समोर येईल, ती सेवा माझी आहे’, या भावाने प्रत्येक सेवा झोकून देऊन करण्याचा प्रयत्न केला.

१२ आ. आध्यात्मिक त्रास असूनही सेवेतील आनंद घेता येणे : मला आध्यात्मिक त्रास असल्याने अशा आयोजनाच्या वेळी सेवा करता येत नाही; परंतु या वेळी चर्चासत्राच्या पूर्ण कालावधीमध्ये मला त्रास झाला नाही आणि मी आनंदाने सेवा करू शकले. ‘आपल्या विभागातील सहसाधकांकडून विविध सेवा शिकणे आणि त्या करणे’, यातून मला पुष्कळ आनंद मिळत होता.’

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या संकल्पाने आध्यात्मिक स्तरावर पार पडलेले हे चर्चासत्र अद्भुत आणि अविस्मरणीय होते. ‘चर्चासत्रासाठी आलेल्या प्रत्येक कलाकाराने या चर्चासत्रातून गुरुदेवांची कलेविषयीची ‘Known to Unknown (ज्ञात ते अज्ञात) (टीप)’, या प्रवासाची दिशा घेतली’, असे लक्षात आले.

टीप – बाह्यांगाने सर्वांना ठाऊक असलेल्या कलांच्याही पुढे जाऊन कलांच्या माध्यमातून दैवी अनुभूती घेणे आणि त्यातून साधना करून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने जाणे

संगीत विभागातील सर्व साधकांनी ‘संघभावे गुरुसेवा’, हा भाव ठेवून सेवा केल्यामुळे सर्व साधकांना गुरुतत्त्व अनुभवता येत होते. ‘या चर्चासत्राच्या निमित्ताने गुरुदेवांनी आमच्यासहित कलाकारांचीही साधना करून घेतली’, याबद्दल आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(समाप्त)

संकलक : सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक,  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.५.२०२६)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक