‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने २२ आणि २३.३.२०२६ या दिवशी समाजातील प्रतिष्ठित कलाकारांचे ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’, हे २ दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. अशा प्रकारचे चर्चासत्र महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील संगीत (गायन, वादन अन् नृत्य) क्षेत्रातील १३ मान्यवर गुरुजन अन् कलाकार यांची उपस्थिती लाभली. त्यांनी ‘संगीत आणि अध्यात्म’, या विषयावर अमूल्य सूत्रे मांडली.
‘या चर्चासत्राच्या वेळी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे, मान्यवर कलाकारांनी काढलेले गौरवोद्गार आणि चर्चासत्राशी संबंधित विविध सेवा करतांना साधकांना आलेल्या अनुभूती’ गुरुचरणी अर्पण करत आहोत.
(भाग १)

१. ‘प्रतिष्ठित कलाकारांची पुष्कळ व्यस्तता असूनही त्यांना चर्चासत्राला सहजतेने येता येणे’, हे ईश्वरी नियोजन असल्याचे जाणवणे
‘या चर्चासत्राला आमंत्रित केलेले मान्यवर गुरुजन आणि कलाकार हे त्यांच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित कलाकार असून त्यांची व्यस्तताही पुष्कळ असते. या सर्वांची एकत्रित वेळ जुळवून आणणे कठीण असते; परंतु या कलाकारांना चर्चासत्राला येण्याविषयी विचारल्यावर प्रत्येकाने सहजतेने सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘हे केवळ देवाचे नियोजन होते’, असे आम्हाला जाणवले.
२. ‘गुरुदेवांचा संकल्प, संतांची उपस्थिती आणि साधकांचा संघभाव’, यांमुळे वातावरणात आनंद जाणवणे
चर्चासत्र चालू होण्याच्या एक दिवस आधीपासूनच वातावरणात पुष्कळ आनंद जाणवत होता. आदल्या दिवशी काही कलाकारांचे आश्रमात आगमन झाले होते. चर्चासत्राला पुणे येथील पू. पं. केशव गिंडे (ज्येष्ठ बासरीवादक, वय ८३ वर्षे) यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली होती. संगीत विभागातील सर्व साधक संघभावाने विविध सेवा करत होते. सेवा करतांना साधक आनंद अनुभवत होते. त्यांच्यासह आश्रमातील अन्य साधकांनाही कलाकार आणि सेवेतील साधक यांच्याकडे पाहून अन् वातावरणात आनंदाची पुष्कळ स्पंदने जाणवत होती. ‘गुरुदेवांचा संकल्प, पू. गिंडेकाकांची उपस्थिती आणि साधकांचा संघभाव’, यांमुळे वातावरणात आनंद जाणवत होता. संगीत ही आकाशतत्त्वाची साधना असल्याने वातावरणही हलके जाणवत होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अनुभवलेले द्रष्टेपण !

‘काही वर्षांपूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्याशी बोलतांना म्हणाले होते, ‘‘पुढे संगीत क्षेत्रातील आपले कार्य इतके वाढेल की, अनेक गुरुजन आणि कलाकार आपल्याकडे येतील. आपल्याला त्यांचे एक अधिवेशनच घ्यावे लागेल !’’ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या या वाक्याची प्रचीती आम्ही या चर्चासत्राच्या निमित्ताने घेतली. यातून ‘या चर्चासत्रामागे केवळ गुरुदेवांचाच संकल्प आहे आणि त्यांच्याच कृपेने हे चर्चासत्र पार पडले’, हे लक्षात आले. यातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे द्रष्टेपण लक्षात आले. त्यांच्या कृपेच्या अन् संकल्पाच्या बळावरच ‘अलौकिक संगीत चर्चासत्र’ पार पडले.’
– सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.५.२०२६)
३. चर्चासत्राला आलेल्या कलाकारांची आश्रमातील साधकांशी लगेच जवळीक होणे
चर्चासत्राला आलेले काही कलाकार संगीत विभागातील साधकांना प्रथमच भेटत होते, तरीही ‘जणू त्यांची आधीपासून ओळख आहे’, असे जाणवत होते. यांतील १ – २ कलाकारांनी ‘साधकांकडे पाहून पुष्कळ आनंद जाणवतो आणि ते आपले जाणवतात’, असे मत व्यक्त केले. यांतील एक कलाकार यापूर्वीही आश्रमात आले होते. तेव्हा ते थोडे अबोल होते. या वेळी मात्र ते स्वतःहून सर्वांशी सहजतेने बोलू लागले. यातून आम्ही ‘आश्रमातील चैतन्य आणि साधकांमधील प्रीती यांमुळे बाहेरील व्यक्तीही लगेच आपलीशी होते’, याची अनुभूती घेतली.
४. कलाकारांची सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवर असणारी श्रद्धा आणि भाव !
४ अ. कलाकारांनी गुरुदेवांच्या व्यापक कार्यात सहभागी होण्यासाठी चर्चासत्राला उपस्थित रहाणे : या चर्चासत्रासाठी आलेल्या कलाकारांची सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवर श्रद्धा असल्याने गुरुदेवांच्या व्यापक कार्यामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने ते उत्स्फूर्तपणे आले होते. या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या कलाकारांचा यातून तन, मन आणि धन यांचा त्याग होऊन त्यांची साधना झाली.
४ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश ऐकल्यावर कलाकारांनी अनुभवलेली भावस्थिती ! : प्रकृती अस्वास्थ्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले चर्चासत्राला उपस्थित राहू शकले नव्हते; परंतु त्यांनी सर्व कलाकारांसाठी कलेतून पुढची साधना होण्याच्या दृष्टीने संदेश पाठवला होता. तो संदेश महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांनी सर्वांना वाचून दाखवला. यामध्ये ‘आपत्काळानंतर येणार्या रामराज्यातील सात्त्विक कलाकार घडवण्याचे कार्य तुम्हाला (आलेल्या कलाकारांना) करायचे आहे. त्यासाठी प्रयत्न करा !’, असा संदेश गुरुदेवांनी सगळ्यांना दिला. त्या वेळी सर्व कलाकारांनी तेथे गुरुदेवांची निर्गुणातून उपस्थिती अनुभवली. या वेळी कथ्थक नृत्यांगना श्रीमती सोनिया परचुरे यांची भावजागृती झाली. गुरुदेवांच्या संदेशामुळे सर्वांमध्ये चैतन्यमय ऊर्जा निर्माण झाली. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी खर्या अर्थाने ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’, या चर्चासत्राच्या माध्यमातून सर्व कलाकारांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी सूक्ष्मातून भरभरून आशीर्वाद दिले’, असे जाणवले.
५. कलाकारांना भावलेली साधकांची अंतर्बाह्य सहजता !
सगळ्या कलाकारांनी बाहेरच्या जगात दिखाऊपणाने वागणे पाहिले आहे; परंतु आपल्या आश्रमातील साधकांमधील अंतर्बाह्य सहजता त्यांच्या अंतर्मनाला स्पर्शून गेली. काही कलाकारांनी हे व्यक्तही केले.
६. कलाकारांचा लाभलेला प्रतिसाद !
अ. ‘आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना येथे (आश्रमात) आणून त्यांचे शिबिर घ्यावे’, याविषयी सगळ्या कलाकारांचे एकमत झाले.
आ. ‘आश्रमातील वातावरण आणि येथील साधकांचे वागणे’, हे सगळेच आदर्श आहे. ते या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बघता येईल’, असेही ते म्हणाले.
इ. ‘पुढील पिढीला येथे आणून प्रत्यक्ष दाखवून आणि अनुभवून शिकवले, तर ते त्यांना अधिक चांगले समजेल’, यावर सगळ्यांची सकारात्मक चर्चा झाली.
७. उपस्थित मान्यवर कलाकारांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाचे कार्य आणि साधक यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !
७ अ. सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे, संवादिनीवादक, मुंबई : ‘संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानामध्ये ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी…’, अशी ओळ आहे, त्याचप्रमाणे चर्चासत्रातील सर्व विषय, उद्देश पाहून आणि आपण सर्व जण येथे जमलेले पाहून हे चर्चासत्र, म्हणजे जणू आपली ‘सूरनिष्ठांची, म्हणजे ईश्वरनिष्ठांचीच मांदियाळी आहे’, असे मला जाणवत आहे.’
७ आ. पं. निषाद बाक्रे, शास्त्रीय गायक, ठाणे : ‘ज्या वेळी आपण समाजात बोलतो (विषय प्रस्तुत करतो, चर्चा करतो इत्यादी), त्या वेळी एक प्रतिमा ठेवून बोलत असतो; परंतु या चर्चासत्रामध्ये सगळ्या कलाकारांनी त्यांची मते प्रतिमा न बाळगता मोकळेपणाने मांडली’, हे केवळ या स्थानाचे महत्त्व आहे आणि हेच या चर्चासत्राचे यश आहे.’
७ इ. श्रीमती सोनिया परचुरे, नृत्यालंकार, मुंबई : ‘आश्रमातील प्रत्येक साधकाच्या चेहर्यावर जो आनंद आहे, तो खरा आहे, आतून आलेला आहे. हल्ली बाहेर कोणाच्या चेहर्यावर असे हास्य पहायला मिळत नाही. त्यांचे हास्य कृत्रिम वाटते. कितीतरी वर्षांनी मी खरे हास्य पाहिले. येथील नृत्य करणार्या साधिकांमध्ये जी निरागसता आणि साधेपणा जाणवला, तो शहरातील मुली हरवून बसल्या आहेत.’
८. चर्चासत्रानंतर प्रतिष्ठित कलाकारांनी सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ विकत घेणे
चर्चासत्रामध्ये ‘केवळ कलाकार नव्हे, तर ‘एक साधक-कलाकार’ व्हायचे आहे’, या ध्येयाला धरून सूत्रे मांडली जात होती. ‘कलेतून स्वतःची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी कलाकाराने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया का अन् कशी राबवावी ? तिचे लाभ काय आहेत ?’, याविषयीच्या सनातनच्या स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयीच्या ग्रंथमालिकेतील ग्रंथ कथ्थक नृत्यांगना सोनिया परचुरे अन् कथ्थक नृत्यगुरु सौ. ज्योती शिधये यांनी स्वतःहून विकत घेतले.’
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1046680.html
(क्रमशः)
– संकलक : सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.५.२०२६)
अध्यात्मशास्त्रासंदर्भात कांहीही संशोधन न करणारे हे कसले बुद्धीप्रामाण्यावादी ?
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !