संपादकीय : तृणमूल काँग्रेसचा देशद्रोह !

बांग्लादेशी संशयित नागरिक व सोबत पोलीस (सौजन्य : PTI)

बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांची हकालपट्टी करण्याची मोहीमच चालू झाली आहे. या निमित्ताने अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. बांगलादेश सीमेवरून भारतात घुसखोरी करणार्‍यांना बंगालमधील तत्कालीन सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षच साहाय्य करत असल्याचे आता उघड झाले आहे. ही माहिती स्वतः बांगलादेशी घुसखोरांनीच दिल्याने ती खोटी असल्याची ओरड करण्याची सोय तृणमूल काँग्रेस आणि पुरोगामी या दोघांनाही नाही. एवढेच नव्हे, तर बांगलादेशाच्या कुश्तिया जिल्ह्यातील एका सुताराने दिलेली माहिती अधिक धक्कादायक आहे. त्याने सांगितले, ‘दलाल किंवा मध्यस्थाला ७-८ सहस्र रुपये देऊन रात्रीच्या वेळी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते आणि गस्तीमध्ये वेळ मिळताच लोकांना सीमा पार करू दिली जाते.’ सीमेवर सैनिक तैनात असूनही एका दलालाला २० सहस्र रुपये देऊन सीमा ओलांडल्याचा दावा आणखी एका स्थलांतरिताने केला. काही घुसखोरांनी ‘दलाल’ किंवा मध्यस्थ यांनी अंधाराचा अपलाभ घेऊन सीमा ओलांडण्यास साहाय्य केल्याचे सांगितले.

हे दलाल किंवा मध्यस्थ नेमके कोण आहेत ? हे जनतेसमोर आले पाहिजे. खरेतर या सर्व गोष्टी तशा नवीन नव्हत्या. वेळोवेळी हे आरोप झाले आहेत; परंतु तत्कालीन ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या काळात कुंपणच शेत खात असल्याची परिस्थिती असल्याने घुसखोर सुखनैव घुसखोरी करू शकत होते. आता भाजप सरकार या घुसखोरांना पिटाळून लावतांना दिसत असले, तरी या गुन्ह्याचे उत्तरदायित्व निश्चित होतांना मात्र दिसत नाही. गुन्हा उघड झाल्यानंतरही गुन्हेगारांची नावे समोर का आणली जात नाहीत ? हा प्रश्नच आहे. गुन्हेगाराला मोकळीक मिळता कामा नये, मग तो कुणीही असो आणि कितीही मोठा असो. ‘कायद्यासमोर सर्व समान आहेत’, असा उपदेश करणारेही या गुन्ह्यामागील गुन्हेगाराला शिक्षा करण्याची मागणी करतांना दिसत नाहीत. असाच प्रकार १९९० च्या दशकात काश्मिरी हिंदूंच्या संदर्भात पहायला मिळाला. त्या वेळी मुसलमानांनी काश्मीरमधून हिंदूंना हुसकावून लावण्यासाठी सहस्रो हिंदूंच्या हत्या केल्या, शेकडो हिंदु महिलांवर बलात्कार केले, मंदिरे पाडली, साडेचार लाख हिंदूंना काश्मीरमधून विस्थापित केले; पण तरीही आजपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा तर सोडाच; पण गुन्हेगार कोण ? हेही जाणूनबुजून शोधण्यात आले नाही. १०० कोटी हिंदूंच्या देशात हिंदूंचा वंशविच्छेद दडपण्यात आला. तसा प्रकार या घुसखोरीच्या गुन्ह्याच्या संदर्भात होता कामा नये. यातील गुन्हेगारांवर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आणि घुसखोरांना साहाय्य करणार्‍या पक्षावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच ती खरी देशभक्ती ठरेल !