ठाणे जिल्ह्यातील दुर्गाडी गड ‘दुसरी भोजशाळा’ !

  • गडावरील ‘ईदगाह’चा निर्णय न्यायप्रविष्ट, तरीही रस्ता अडवून नमाजपठण !

  • नमाजपठणाच्या वेळी हिंदूंना गडावरील दुर्गादेवीच्या मंदिरात प्रवेशबंदी

मुंबई, २७ मे (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे असलेल्या दुर्गाडी गडावरील कथित ‘ईदगाह’चा निर्णय न्यायप्रविष्ट आहे. असे असूनही दुर्गाडी गडाच्या बाहेर सहस्रावधी मुसलमान मागील अनेक वर्षांपासून येथील रस्ता अडवून नमाजपठण करत आहेत. संतापजनक गोष्ट म्हणजे नमाजपठणाच्या वेळेत दुर्गाडी गडावरील दुर्गादेवीच्या मंदिरात हिंदूंना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. भोजशाळेतही शुक्रवारच्या नमाजपठणाच्या वेळी हिंदूंना सरस्वतीमातेची पूजा करण्यावर आतापर्यंत बंदी घालण्यात आली होती. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने भोजशाळा हिंदूंचीच असल्याचा निर्णय दिल्यानंतर हिंदू तेथे आता प्रतिदिन पूजा-अर्चना करू शकतात.

ईदगाह नसल्याचे पुरावे असे !

संतापजनक गोष्ट अशी की, दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीचे मंदिरही मशीद असल्याचा दावा मुसलमानांनी केला होता; मात्र गडावरील ही वास्तू मंदिरच असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यासह या कथित ‘ईदगाह’चा विषयही सध्या कल्याण जिल्हा न्यायालयात प्रविष्ट आहे. दुर्गाडी गडावरील ही भिंत ‘ईदगाह’ असल्याच्या वल्गना मुसलमान करत आहेत. ‘ईदगाह’च्या दोन्ही बाजूंना मिनार असतात. तसे मिनार या भिंतीला नाहीत. ‘ईदगाह’च्या मध्ये मुसलमान धर्मगुरूंना भाषण करण्यासाठी जागा असते, तशी जागाही या भिंतींच्या मध्ये नाही. असे असूनही वर्षानुवर्षे मुसलमानांच्या झुंडशाहीपुढे नमून प्रशासनाकडून रस्त्यावरील नमाजपठणाला संरक्षण दिले जात आहे.

पोलिसांनी हिंदूंना मंदिरात जाण्यापासून रोखू नये ! – शिवसेना

दुर्गाडी गडावर श्री दुर्गादेवीचे मंदिर आहे. नमाजपठणाच्या वेळी पोलीस मंदिरात जाण्यापासून हिंदूंना रोखतात. मंदिरात जाणे हा आमचा धार्मिक अधिकार आहे. पोलिसांनी त्यापासून आम्हाला रोखू नये. उलट रस्ता अडवून अवैधपणे नमाजपठण करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली.