सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने विविध देवतांच्या साहाय्याने निर्विघ्नपणे पार पडलेला श्री राजमातंगी महायज्ञ !

श्री सिद्धिविनायक (मुंबई)

१. श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने त्याच्या मंदिराच्या परिसरात निवासाची व्यवस्था होणे

‘सिद्धिविनायकाच्या कृपेने प्रभादेवी (मुंबई) येथील सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात यज्ञ निश्चित झाला. त्या आधी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ मुंबईला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘सर्वांची साधना होईल, सर्वांना एकत्र रहात येईल’, या दृष्टीने साधकांची निवासव्यवस्था करा.’’ त्या दृष्टीने विचारचक्र चालू होते. तेव्हा सिद्धिविनायकाच्या कृपेने त्याच्या मंदिराच्या एक-दीड कि.मी.च्या परिसरात ५ ठिकाणी ८ ते १० संत आणि २५० साधक यांच्या निवासाची व्यवस्था झाली. त्या वेळी ‘सिद्धिविनायकानेच निवासाची व्यवस्था करून दिली’, असे मला जाणवले.

२. सिद्धिविनायकाने दिलेल्या ‘मी सर्व अडथळे दूर करीन’, या आश्वासनाची अनुभवलेली फलश्रुती !

पू. (सौ.) संगीता जाधव

निवासस्थानी ये-जा करतांना आम्हाला श्री सिद्धिविनायक मंदिराच्या कळसाचे दर्शन व्हायचे. तेव्हा माझ्याकडून ‘यज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा’, यासाठी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना व्हायची. प्रतिदिन रात्री झोपतांना ‘श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने हे यज्ञकार्य पार पडत आहे’, याबद्दल माझ्याकडून श्री सिद्धिविनायकाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होत होती. ज्या वेळी मी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले, त्या वेळी सिद्धिविनायकाच्या मुखावर स्मितहास्य होते आणि जणू ‘मी सर्व अडथळे दूर करीन’, असे तो आश्वस्त करत आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर ‘यज्ञासाठी मैदान उपलब्ध होणे, तसेच यज्ञाला येणार्‍या भाविकांची नोंदणी’ इत्यादींमध्ये येत असलेल्या अडचणी सुटत गेल्या. ही जणू सिद्धिविनायकाच्या कृपेची फलश्रुती होती.

३. ‘यज्ञाची सर्व सिद्धता स्वतः सिद्धिविनायक करत आहे’, असे जाणवणे

मुंबईत यज्ञ होणार’, याचा सर्वाधिक आनंद आणि उत्साह सिद्धिविनायकाला वाटत आहे. स्थुलातून जरी साधक यज्ञाची सिद्धता करत असले, तरी हे कार्य श्री सिद्धिविनायक स्वतः करत आहे’, असे मला जाणवले. ‘यज्ञ निर्विघ्न पार पडेल’, याविषयी एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे सिद्धिविनायक आश्वस्त करून आधार देत असल्याचे मला जाणवत होते. याचे स्मरण झाले, तरी श्री सिद्धिविनायकाच्या प्रती कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत होत होता.

४. ‘सिद्धिविनायकाच्या रूपात स्वतः गुरुदेव यज्ञस्थळी आहेत’, असे जाणवणे

यज्ञकार्यात येत असलेली एखादी अडचण साधकांनी मला सांगितल्यावर मी ती अडचण सूक्ष्मातून सिद्धिविनायकाला सांगायचे. त्या वेळी ती अडचण सुटत होती किंवा त्यावर उपाययोजना मिळत होती. श्री सिद्धिविनायकाची ही कृपा शब्दांत मांडण्याला मर्यादा येत आहेत. ‘गुरु श्री सिद्धिविनायकाचे दुसरे रूप आहेत’, असे मला वाटत होते. गुरुदेवांमध्येच मला श्री सिद्धिविनायकाचे दर्शन होत होते. ‘श्री सिद्धिविनायक आणि गुरुदेव एकच आहेत. श्री सिद्धिविनायकाच्या रूपात गुरुदेवच यज्ञस्थळी आहेत’, असे मला वाटायचे.

श्री मुंबादेवी

५. श्री मुंबादेवीला प्रार्थना केल्यावर ‘मीच सर्वांना घेऊन यज्ञाला येणार आहे’, असे तिने सूक्ष्मातून सांगणे आणि तिचे बोलणे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याप्रमाणे वाटणे

आम्ही मुंबईची ग्रामदेवी श्री मुंबादेवी हिच्या दर्शनासाठी गेलो असतांना माझ्याकडून देवीला पुढील प्रार्थना झाली, ‘हे देवी, मुंबईमध्ये श्री राजमातंगी यज्ञ होणार असून श्री राजमातंगीदेवी हे तुझेच रूप आहे. यज्ञाच्या माध्यमातून यज्ञस्थळी तुझे आगमन होणार आहे. या यज्ञाच्या निमित्ताने सर्व साधकांना सेवा करायची आहे. त्यामधील सर्व अडथळे दूर होऊ दे.’ प्रार्थना झाल्यावर देवी सूक्ष्मातून सहजपणे म्हणाली, ‘मीच सर्वांना घेऊन यज्ञाला येणार आहे.’ ज्याप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सहजतेने बोलतात, त्याचप्रमाणे देवीचे बोलणे होते. त्या वेळी मला देवीचे मुखमंडल श्री श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रमाणे दिसले. तेव्हा ‘गुरुदेवांच्या कृपेनेच सर्व देवता यज्ञासाठी साहाय्य करत आहेत’, असे मला जाणवले. प्रत्यक्षातही मुंबईसारख्या ठिकाणी ७ सहस्रांहून अधिक भाविक या यज्ञाला उपस्थित राहिले.

६. ‘यज्ञामुळे होणारे लाभ श्री राजमातंगीदेवी साधकांच्या माध्यमातून जिज्ञासू अन् हिंदुत्वनिष्ठ यांना सांगत आहे’, असे जाणवणे

यज्ञाचे निमंत्रण देण्यासाठी जिज्ञासू, वाचक, हिंदुत्वनिष्ठ इत्यादींच्या घरी साधक जात होते आणि त्यांचे कुटुंबीय अन् शेजारी यांना एकत्र करून यज्ञाचे निमंत्रण देत होते. त्या वेळी ‘साधकांच्या माध्यमातून श्री राजमातंगीदेवी स्वतःच यज्ञाचे निमंत्रण देत आहे’, असे मला जाणवले. ‘राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण, राज्यकर्त्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करणे, साधकांचे रक्षण’, यांविषयीचे देवीचे कार्य साधक सांगत होते. प्रवचनासाठी सिद्ध करण्यात आलेल्या विषयामध्ये नसलेली सूत्रेही साधकांच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे सांगितली जात होती. त्या वेळी ‘साधकांच्या मुखातून देवीच बोलत आहे’, असे मला जाणवले. साधक पुढील सूत्रे सांगत होते, ‘श्री राजमातंगीदेवी वाणी आणि ज्ञान यांची देवी आहे. ती आदिशक्तीची प्रधानमंत्री, म्हणजे सल्लागार आहे. ती सकारात्मकता निर्माण करते. त्यामुळे ती ज्ञानाच्या माध्यमातून भारतात सकारात्मकता निर्माण करणार आहे. परिणामी राज्यकर्ते योग्य निर्णय घेऊ शकतील. युद्धप्रसंगी सैनिकांना योग्य निर्णय घेता येईल. सैनिकांमध्ये निर्भयता येईल. हे सर्व या यज्ञाच्या माध्यमातून देवी प्रदान करणार आहे.’

७. यज्ञातील वेगवेगळ्या टप्प्यात यज्ञस्थळी वेगवेगळे रंग दिसणे आणि त्याचे पुरोहितांनी सांगितलेले शास्त्र !

ज्या वेळी यज्ञ चालू झाला, त्या वेळी मला यज्ञस्थळी पिवळा रंग दिसत होता. तो यज्ञस्थळापासून दूरवर अमर्याद पसरत होता. त्यानंतर पिवळ्या रंगाचे रूपांतर केशरी रंगामध्ये झाले आणि काही वेळाने केशरी रंगाचे रूपांतर निळ्या रंगात झाले. निळ्या रंगाचा झोत यज्ञस्थळावरून सर्वत्र पसरत होता. त्या वेळी मला शांत वाटत होते. या अनुभूतीचे शास्त्र सांगतांना पुरोहित श्री. श्रेयस पिसोळकर म्हणाले, ‘‘पिवळा आणि केशरी रंग हे अग्नितत्त्वाचे रंग आहेत. त्यामुळे यज्ञात अग्नीचे आवाहन झाल्यावर ते रंग तुम्हाला दिसले. निळा हा श्री राजमातंगीदेवीचा रंग आहे. श्री राजमातंगीदेवीच्या मूलमंत्रांचे हवन चालू झाले. त्या वेळी तिचे तत्त्व असलेला निळा रंग सर्वत्र दिसू लागला.’’

८. सद्गुरु नीलेश सिंगबाळ, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या माध्यमातून देवता दृश्य स्वरूपात अवतीर्ण झाल्याचे जाणवणे

सद्गुरु नीलेश सिंगबाळ, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, हे मुख्य यजमान म्हणून यज्ञस्थळी उपस्थित होते. त्या सर्वांचा चेहरा देवतांप्रमाणे तेजस्वी दिसत होता. ‘आकाशातून जणू देवताच पृथ्वीवर आल्या आहेत’, असे मला दिसत होते. ‘असे कशामुळे दिसत आहे ?’, हे कळण्यासाठी मी प्रार्थना करून एकाग्रतेने पाहिले, तेव्हा त्या सर्वांच्या चेहर्‍यांतून प्रकाश प्रक्षेपित होऊ लागला. ‘त्यांच्या माध्यमातून देवतांचे तत्त्व दृश्य स्वरूपात प्रत्यक्षात कसे कार्यरत होते ?’, हे मला पहायला मिळाले.’

– (पू.) सौ. संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५६ वर्षे), धर्मप्रचारक (महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड हे जिल्हे आणि गुजरात राज्य), सनातन संस्था.

(२२.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक