महाराष्ट्रातील तालिबानी आतंकवाद्याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

सौदी अरेबियातून कट्टरतावादी होऊन परतलेल्या आतंकवाद्याने बनवली होती जिहादी टोळी

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी हमराज शेख याला ७ वर्षांचा कारावास आणि ६३ सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. हमराज शेख मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी आहे. यंत्रणेने ऑक्टोबर २०२३ मध्ये त्याचा सहकारी महंमद आरिफ याच्याविरुद्धही आरोपपत्र प्रविष्ट केले होते. सध्या त्याच्यावर खटला चालू आहे.

१. हमराज शेख वर्ष २०१९ ते २०२२ या काळात सौदी अरेबियात वास्तव्यास असतांना तालिबान आणि ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ यांच्या संपर्कात आला होता आणि तिथेच तो कट्टरतावादी बनला होता. त्याने अन्य एक आतंकवादी महंमद आरिफसमवेत मिळून एक ‘जिहादी टोळी’ बनवली. यामध्ये भारतातील मुसलमान तरुणांचा बुद्धीभेद करून त्यांना कट्टरतावादी बनवले जात असे. सामाजिक माध्यमांचा वापर करून त्यांनी ऑनलाईन जिहादी भरती जाळे निर्माण केले होते.

२. या आतंकवाद्यांनी मुसलमान तरुणांची भरती करणे, त्यांना आतंकवादी प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानला पाठवणे, कट्टरतावादी कारवायांसाठी निधी गोळा करणे आणि भारताच्या विरोधात जिहाद पुकारण्याची योजना आखली होती. या दोघांनी अफगाणिस्तानात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानमध्ये सहभागी होण्याच्या योजनेसह एक आतंकवादी टोळीही स्थापन केली होती.

संपादकीय भूमिका

प्रत्येक आतंकवाद्याला फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा करणे आवश्यक आहे अन्यथा असे आतंकवादी शिक्षा भोगून सुटल्यानंतर पुन्हा घातपाती कारवायाच करणार, यात शंका नाही !