
१. अन्य विद्यापिठांपेक्षा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी स्थापन केलेल्या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कार्याचे वेगळेपण
आज आपण समाजात पहातो की, कला आणि विद्या शिकवणारी अनेक विद्यापिठे अस्तित्वात आहेत. तेथे आपल्याला नोकरी मिळण्याच्या दृष्टीने शिक्षण मिळते; परंतु व्यक्तीच्या लौकिक विकासासमवेत त्याचा पारलौकिक विकास करून घेणारे एकमेव विद्यापीठ म्हणजे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ ! याचे संस्थापक आहेत, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! ‘या विद्यापिठातून शिकलेल्यांना वेगळ्या कागदी प्रमाणपत्राची आवश्यकता न रहाता ते संतस्थिती प्राप्त होऊनच बाहेर पडतील’, हेच या विद्यापिठाचे वैशिष्ट्य आहे.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सांगितलेला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा संगीत (गायन, वादन, नृत्य, नाट्य) विषयक कार्याचा उद्देश
अ. समाजाला कलेतून ईश्वरप्राप्ती कशी करावी ? यासाठी मार्गदर्शन करणे
आ. भारतीय कलांमधे असलेली मूळ सात्त्विकता (सकारात्मक ऊर्जा) आधुनिक उपकरणांचा वापर करून संशोधनाद्वारे सिद्ध करून समाजासमोर मांडणे
‘आज समाजात गायन, वादन, नृत्य, नाट्य इत्यादी कला या सादरीकरणाच्या कला (Performing Arts) म्हणून ओळखल्या जातात. साधारणतः समाजात या कलांचा अभ्यास आणि उपयोग कलेची तात्त्विक बाजू अन् प्रात्यक्षिकांचा भाग शिकणे, प्रत्यक्ष व्यासपिठावर कार्यक्रमांमधून किंवा सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांच्या व्यासपिठावर या कलांचे सादरीकरण करणे किंवा काही जण या कलांमध्ये ‘पीएचडी’च्या दृष्टीने अभ्यास करून संशोधन करतात. समाजात अनेक ज्येष्ठ कला उपासक, अभ्यासू कलाकारही याच अनुषंगाने समाजात कार्यरत असलेले आपण पहातो; परंतु ‘या कलांचा स्थूल अभ्यासाबरोबर सूक्ष्म स्तरावर विविध आयामांनी अभ्यास कसा करावा ?’, याची दिशा देणे, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे वैशिष्ट्य आहे.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी गायन, वादन, नृत्य, नाट्य इत्यादी कलांच्या आध्यात्मिक स्तरावरील अभ्यासाची आणि कार्याची दिलेली दिशा
३ अ. गायन, वादन, नृत्य आणि नाट्य कलांमधील विविध घटकांचे आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने संशोधन करण्याविषयी मार्गदर्शन करणे : ईश्वरनिर्मित भारतीय कलांमध्ये मुळातच सात्त्विकता (सकारात्मक ऊर्जा) आहे. त्याचा लाभ कलाकार, दर्शक (श्रोते), वनस्पती, प्राणी इत्यादींना सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी होतो. आजच्या बुद्धीजिवी समाजाला हे समजावून सांगता यावे, यासाठी विविध आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने भारतीय कलांमधील विविध घटकांचे (उदा. विविध शास्त्रीय राग, नृत्यप्रकार, सात्त्विक आणि असात्त्विक अभिनय इत्यादी) ८०० हून अधिक संशोधनात्मक प्रयोग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या माध्यमातून भारतीय कला आणि पाश्चात्त्य कला यांचा तुलनात्मक अभ्यासही करण्यात आला. यातून कलेतून साधनेसाठी भारतीय कलांचे महत्त्व बौद्धिक स्तरावर पुन्हा एकदा समाजाला सांगता आले.

३ आ. स्थूल उपकरणांच्या संशोधनाला सूक्ष्म संशोधनाची जोड देण्यासाठी मार्गदर्शन करणे : वरील प्रकारे स्थूल संशोधनाला सूक्ष्मातील अभ्यासाची जोड देण्याचे मार्गदर्शनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केले. साधनेमुळे सहावे इंद्रिय जागृत झालेले साधक आणि उच्च आध्यात्मिक स्थिती असलेले संत यांच्या मार्गदर्शनानुसार स्थूल संशोधनात्मक प्रयोगांचे सूक्ष्म परीक्षण आणि सूक्ष्म विश्लेषणात्मक अभ्यासही येथे करण्यात येतो, उदा. ‘राग यमन तो राग गाण्याच्या ठरवून दिलेल्या वेळेमध्ये ऐकणे आणि तो राग गाण्याची वेळ नसतांना अन्य वेळी ऐकणे’, याचे आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने संशोधन केले. त्या वेळी राग यमन त्याच्या वेळेत ऐकतांना ऐकणार्यांची अन्य वेळेच्या तुलनेत सकारात्मक ऊर्जा वाढल्याचे आढळून आले. त्या वेळी ‘सूक्ष्मातून असे का घडले असेल ?’, याचा अभ्यासही करण्यात आला.
३ आ १. सूक्ष्म विवेचन : सूक्ष्म स्तरावर प्रत्येक रागाची एक ऊर्जा (रस) आणि देवताही असते. रागाच्या निर्धारित वेळेत त्या रागाची ऊर्जा (रस) अधिक प्रमाणात कार्यरत होते. तसेच त्या रागातील देवतेचे तत्त्वही त्या वेळी अधिक प्रमाणात कार्यरत होते. त्यामुळेच त्या रागाची वेळ शास्त्रात आपल्या ऋषिमुनींनी निर्धारित केलेली आहे. हे या प्रयोगाचे सूक्ष्म कारण झाले.
याप्रमाणे केवळ बौद्धिक स्तरावर संशोधनाचे प्रयोग किंवा अभ्यास न करता स्थुलासमवेत सूक्ष्म अभ्यास जोडल्याने परिपूर्ण आणि आध्यात्मिक संशोधन करण्याची दिशा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिली आहे.
‘संगीत आणि अध्यात्म यांना कसे जोडायचे ?’ ते गुरुदेवांनी शिकवणे

भूतलावरील कोणतेही शास्त्र, कला असतील, तर त्यांचे नियम, तत्त्वे (‘प्रिंसिपल्स’), त्यातील संज्ञा (‘टर्म्स’) वेगवेगळ्या असतात. कोणत्याही दोन शास्त्रांना एकच नियम लावता येणार नाही, उदा. जीवशास्त्र विषय बघितला, तर त्याला कलेतील संज्ञा लागू होणार नाही आणि कलेला रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांचे नियम किंवा संज्ञा लागू होणार नाहीत; परंतु अध्यात्मशास्त्र हे एक परिपूर्ण शास्त्र आहे; कारण कोणत्याही शास्त्राला (कला, विद्या यांना) अध्यात्माचे नियम लावता येतात. जसे कोणतेही शास्त्र वा कला असो त्यांच्या सत्त्व, रज, तम या त्रिगुणांचा अभ्यास करता येतो. त्यांचा पंचतत्त्वे, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश यांच्या आधारावर अभ्यास करता येतो. त्यामुळे प्रत्येक शास्त्र, विद्या, कला यांचा मूळ आधार अध्यात्मशास्त्रच आहे. याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळेच कलेला अध्यात्माच्या आधारावर जोडून त्याचा अभ्यास करणे सोपे होत आहे.
आज समाजात कलेकडे (गायन, वादन, नृत्य, नाट्य इत्यादी) केवळ ‘परफॉर्मिंग आर्ट’ म्हणून पाहिले जाते. व्यक्तीचे आयुष्य केवळ एक कला करता करता निघून जाते; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलेतून साधना होण्यासाठी आणि कलेतील विविधांगी अभ्यासासाठी अनेक पैलू उघडून दिले आहेत. हे केवळ एक अवतारी पुरुषच करू शकतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या कलांचा सर्वांगाने अभ्यास करणे शक्य होत आहे.
– सुश्री तेजल पात्रीकर
३ इ. संगीतातील कार्य आपल्याला ‘नोन टु अननोन’पर्यंत (ठाऊक असलेल्या स्थूल शास्त्रापासून ठाऊक नसलेल्या, म्हणजेच सूक्ष्म स्तरापर्यंत) करायचे आहे ! : आज समाजामध्ये कलेतील शास्त्रोक्त अभ्यास, कला सादरीकरण करण्याच्या प्रात्यक्षिकांचे बारकावे अनेक ग्रंथांमध्ये, ऑडिओ-व्हिडिओ साठ्यामध्ये उपलब्ध आहेत; परंतु ‘कलेतील सूक्ष्म अभ्यास, कलेतील आध्यात्मिक बारकावे, कलेतून साधनेसाठी काय करावे ?, उदा. संगीतातील कोणत्या रागात, नृत्यातील कोणत्या मुद्रेमध्ये पंचतत्त्वांपैकी कोणते तत्त्व आहे ? कलेतील कोणता राग आध्यात्मिक प्रगतीला पूरक आहे ?’ इत्यादी अभ्यास आपल्याला कुठेच दिसत नाही. त्यामुळे समाजाला आज जे ज्ञान ठाऊक आहे (कलेतील स्थुलातील अभ्यास) त्याकडून समाजाला जे ठाऊक नाही, अशा कलेतील सूक्ष्म स्तरावरील अभ्यासाची दिशा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिली आहे. त्यामुळेच आज भूतलावर कुठेही उपलब्ध नसलेल्या कलेतील सूक्ष्म ज्ञानाचा अभ्यास महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हा अभ्यास पुढे येणार्या पिढ्यांसाठी उपयोगी होणार आहे.

३ ई. ‘कलेतून साधनेत प्रगती करता येते’, हे साधकांच्या माध्यमातून समाजाला दाखवून देणे : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा एक उद्देश ‘कलेतून ईश्वरप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणे’, हा आहे. त्यामुळे जे साधक कला शिकले आहेत, त्यांच्या कलेला साधनेची जोड देण्याचे मार्गदर्शन स्वतः सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) करत आहेत. मागील काही लेखांत आपण पूर्वीच्या काळातील काही संतांची उदाहरणे पाहिली, ज्यांनी संगीतातून ईश्वरप्राप्ती केली; परंतु ‘या काळातही गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार कलेच्या माध्यमातून साधना केल्याने कलेतून साधना करणारे साधक हळूहळू ‘जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होणे, पुढे संत, सद्गुरु पदापर्यंत जाणे’, असे ध्येय ठेवून प्रयत्न करत आहेत. या साधकांच्या माध्यमातून ‘कलेला साधनेचे माध्यम बनवून संत, सद्गुरु स्तरापर्यंत पोचता येते’, हेच गुरुदेव दाखवून देत आहेत. या काळातही हे गुरुदेवांच्या मार्गदर्शनामुळे होतांना दिसत आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात कलेतून ईश्वरप्राप्तीसाठी आलेले साधक हे पुढील पिढीसाठी अनुकरणीय (‘रोल मॉडल’) असणार आहेत.
३ उ. मानवजातीसाठी उपयुक्त अशा सात्त्विक नामजपांच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन करणे
३ उ १. देवतेची स्पंदने आकृष्ट होणारे सप्त देवतांचे नामजप सिद्ध करून घेणे : संगीत, नृत्य इत्यादी कला सतत करण्याला मर्यादा आहेत. आपण २४ घंटे हे करू शकत नाही; परंतु ईश्वराचे नामस्मरण हे आपण २४ घंटे (झोपेतही) करू शकतो आणि त्यातून व्यक्तीची साधनाही होते. हा समष्टी साधनेचा उद्देश लक्षात घेता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भावजागृती जलद होणारे, त्या-त्या देवतेची स्पंदने आकृष्ट होणारे सप्तदेवतांचे नामजप सिद्ध करून घेतले. या माध्यमातून नामजप म्हणतांना (कलेमध्ये) ‘ईश्वराप्रती भाव’ हा घटक कसा महत्त्वाचा आहे ? तसेच या ‘भावा’मुळे कलेतून ऐकण्यार्यांचीही भावजागृती कशी होऊ शकते ?’ हा भाग त्यांनी शिकवून तो नामजप समष्टीसाठी उपलब्ध करून दिला.
३ उ २. ‘विविध टप्प्यांतून नामजप कसा सिद्ध होतो ?’, हे समष्टीला शिकण्यासाठी नामजप ध्वनीमुद्रित करून संग्रहित करण्यास सांगणे : एकेक नामजप साधारण ३० ते ३५ वेळा ध्वनीमुद्रित (‘रेकॉर्ड’) करून तो गुरुदेवांना ऐकवायचा. त्यानंतर प्रत्येक नामजपात देवतेची स्पंदने, भाव आणि आनंद यांची स्पंदने येण्यासाठी ते मार्गदर्शन करायचे. एकेका नामजपाचे असे ३० ते ३५ टप्पेही ते संग्रहित करण्यास सांगायचे. यामुळे पुढे येणार्या पिढीला ‘हा नामजप एकदा म्हणून सिद्ध झालेला नाही, तर विविध टप्प्यांतून तो सिद्ध झाला’, हे शिकता येईल. हे समष्टीच्या दृष्टीकोनातून सांगितले.
अनेक वर्षे आपण संगीत कला म्हणून शिकतो; परंतु गायनात भाव यायला हवा. या भावामुळे आवाजात गोडवा निर्माण होतो, प्रत्येक स्वराची वेगळी अनुभूती घेता येते, असा कुठलाही विषय आज समाजात कला शिकवतांना शिकवला जात नाही. हाच भाग अन्य कलांच्या संदर्भातही आहे. ‘भाव’ हाच खरा आपल्या कलांचा पाया आहे. नामजपांच्या शिकवणीतून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हा पायाच घालून दिला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी या कलांच्या अभ्यासासाठी आम्हा साधकांची निवड केली आणि आमची क्षमता नसतांनाही तेच आमच्याकडून करूनही घेत आहेत, यासाठी त्यांच्या चरणी अनन्य भावे कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे.
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1042136.html
(क्रमशः)
– सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.४.२०२६)

काही संतांना ‘देहत्याग करावा’, असे वाटणे आणि काही संतांना ‘पुन्हा जन्म घ्यावा’, असे वाटणे यांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
अध्यात्मशास्त्रासंदर्भात कांहीही संशोधन न करणारे हे कसले बुद्धीप्रामाण्यावादी ?
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !
शांत, स्थिर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असलेले अकलूज येथील श्री. विष्णु जाधव !