१७ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा संगीत (गायन, वादन, नृत्य, नाट्य) विषयक कार्याचा उद्देश, त्यांनी या कलांच्या आध्यात्मिक स्तरावरील अभ्यासाची आणि कार्याची दिलेली दिशा, ‘संगीत आणि अध्यात्म यांना कसे जोडायचे ?’ ते गुरुदेवांनी शिकवणे आदी सूत्रे पाहिली. या लेखात उर्वरीत सूत्रे देत आहे.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1040984.html

‘आज समाजात गायन, वादन, नृत्य, नाट्य इत्यादी कला या सादरीकरणाच्या कला (Performing Arts) म्हणून ओळखल्या जातात. साधारणतः समाजात या कलांचा अभ्यास आणि उपयोग कलेची तात्त्विक बाजू अन् प्रात्यक्षिकांचा भाग शिकणे, प्रत्यक्ष व्यासपिठावर कार्यक्रमांमधून किंवा सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांच्या व्यासपिठावर या कलांचे सादरीकरण करणे किंवा काही जण या कलांमध्ये ‘पीएच.डी.’च्या दृष्टीने अभ्यास करून संशोधन करतात. समाजात अनेक ज्येष्ठ कला उपासक, अभ्यासू कलाकारही याच अनुषंगाने समाजात कार्यरत असलेले आपण पहातो; परंतु ‘या कलांचा स्थूल अभ्यासासमवेत सूक्ष्म स्तरावर विविध आयामांनी अभ्यास कसा करावा ?’, याची दिशा देणे, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे वैशिष्ट्य आहे.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी गायन, वादन, नृत्य, नाट्य इत्यादी कलांच्या आध्यात्मिक स्तरावरील अभ्यासाची आणि कार्याची दिलेली दिशा
३ ए. पुढे येणार्या पिढ्यांसाठी कलेतून साधना, कलेतील अध्यात्मशास्त्र यांचा पाया बनवून ठेवण्याची दिशा देणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सांगतात, ‘आपल्याला कलेतील हा अभ्यास येणार्या पिढींसाठी करून ठेवायचा आहे. कलेतील केवळ एकच विषय घेऊन तो सखोल करण्यापेक्षा आता आपत्काळ जवळ असल्याने वेळ अल्प आहे. त्यामुळे कलेतील एकाच विषयात खोलवर जाण्यापेक्षा अनेक विषयांचा पाया आपल्याला निर्माण करून ठेवायचा आहे. येणारी पुढील पिढी आपण निर्माण करून ठेवलेल्या पायावर याचा आणखी सखोल अभ्यास करू शकेल. पुढे हे करणारेही समाजातील थोडेच असतील; परंतु त्यांना तरी कलेतील आध्यात्मिक साधनेची दिशा मिळावी, यासाठी आपण आता हे सगळे करून ठेवूया.’ यावरून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण आणि पुढील पिढ्यांना योग्य तो अभ्यास मिळावा’, यासाठीची त्यांची धडपड यातून दिसून येते. ‘आपण जो अभ्यास करून ठेवणार आहोत, त्याला उद्या येणारी पिढी शास्त्राप्रमाणे प्रमाण मानेल’, असेही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कलेविषयी मौलिक विचार
१. भारतीय संगीतास शास्त्रीय आधार असणे, हे भारताचे वैशिष्ट्य आहे !
२. ज्या कलेतून देवतांची स्पंदने व्यक्तीकडे आकृष्ट होतात, तीच खरी कला !
३. कलेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे, हीच कलेच्या माध्यमातून साधना आहे !
४. ‘साधना’ म्हणून कला आत्मसात् केल्यावरच खर्या अर्थाने कलाकाराचे जीवन सार्थ होते !
३ ऐ. ‘पुढे भारतीय गायन, वादन, नृत्य, नाट्य यांची शुद्धी करावी लागणार आहे’, असे सांगणे : परकियांच्या आक्रमणांमुळे भारतीय कलांची मूळ शुद्धता न्यून होत गेली. त्यामुळे कलेमधील शुद्ध आणि सात्त्विक पद्धती पुन्हा आपल्याला सिद्ध करून ठेवावी लागेल. त्यामुळे पुढील पिढीला आपण सात्त्विक कला देऊ शकू, उदा. आता अस्तित्वास असलेल्या शास्त्रीय संगीताच्या शृंगारप्रधान, अर्थहीन आणि त्या वेळेच्या यवनी राजांच्या खुशमस्करीसाठी निर्माण केलेल्या बंदिशींतील शब्द इत्यादी आपल्याला शुद्ध स्वरूपात आणावे लागतील. त्याचप्रमाणे ‘नृत्य, नाट्य या कलांमधीलही वरील भाग दुरुस्त करून तेही अधिक सात्त्विक कसे करता येईल ?’, हेही पहावे लागेल. या माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टींमधील सात्त्विकता वाढली, तर त्याचा कलाकार आणि दर्शक/श्रोते यांनाच लाभ होणार आहे, हा गुरुदेवांचा समष्टीचा विचार येथे दिसून येतो.

३ ओ. सर्व कलांतील अद्वैत अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करणे : गायन, वादन, नृत्य, चित्रकला, रांगोळी काढणे इत्यादी कलांची निर्मिती ही ईश्वरप्राप्तीसाठीच झालेली आहे. ईश्वरच या कलांचे उगमस्थान असल्याने एका स्थितीनंतर या सर्व कलांचे अद्वैतच अनुभवायला येते. त्यामुळे या कलांच्या माध्यमातून साधना करणार्या साधकाला कधी गायन चालू असतांना ‘नृत्य करावे’, असे वाटते, तर गायन ऐकल्यावर त्याला एखादी कलाकृती आपोआप सुचते, तसेच कधी नृत्य पहातांना रांगोळी सुचते. साधकाची साधना वाढल्यावर त्याला ‘समान स्पंदने असणार्या कलाकृती अचूक ओळखणे, म्हणजे दोन्हींतून एकसारखी अनुभूती येणार्या कलाकृती सुचणे’ साध्य होते. हेच ‘सर्व कलांतील अद्वैत अनुभवणे’ होय. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधक अशा कलाकृतींचा सूक्ष्मातील अभ्यास सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
३ औ. सूक्ष्म नादांचा अभ्यास करण्याची दिशा देणे : संतांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी त्यांच्या अस्तित्वामुळे निर्माण झालेल्या वातावरणामध्ये, तर कधी काही धार्मिक विधींमध्ये किंवा मंदिरांमध्येही विविध प्रकारचे सूक्ष्म नाद ऐकता येतात. ज्यांची सूक्ष्मज्ञानेंद्रिये जागृत आहेत, म्हणजेच ज्यांना सूक्ष्मातील कळते, त्यांना हे नाद सहजतेने ओळखता येतात. व्यक्तीची साधना वाढली की, त्याला सूक्ष्मातील स्पंदने जाणवायला लागतात. या सूक्ष्म नादाचा उगम स्थुलातील असू शकतो; परंतु त्यातून एक वेगळ्या प्रकारचाही नाद ऐकू येत असतो, उदा. नळाच्या पाण्याची धार सोडल्यावर पाण्याचा आवाज आपल्याला सहजतेने ऐकता येतो; परंतु संतांच्या खोलीत, सात्त्विक वातावरणामध्ये अशा प्रकारच्या नळाच्या पाण्याच्या आवाजामागे एक वेगळ्या प्रकारचा दैवी नादही ऐकायला येऊ शकतो. हा नाद आणि नळातील पाण्याचा आवाजाचा नाद या दोन्हींमधील भेद सूक्ष्मातील जाणणार्यांना सहजतेने लक्षात येऊ शकतो.
अशा प्रकारचे विविध दैवी नाद सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तूमध्ये, आश्रमात होत असलेले विविध धार्मिक विधी, यज्ञ यांमध्ये साधकांना ऐकता आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली असे नाद ध्वनीमुद्रित करण्यात आले आहेत. त्या नादांचा संगीताच्या दृष्टीनेही अभ्यास करण्याची दिशा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिली आहे. ‘केवळ स्थूल नाद नाही, तर सूक्ष्म नादांचा संगीताला धरून कसा अभ्यास करता येईल ?’, याचाही अभ्यास त्यांनी करण्यास सांगितला आहे.
आज समाजात कलेकडे (गायन, वादन, नृत्य, नाट्य इत्यादी) केवळ ‘परफॉर्मिंग आर्ट’ म्हणून पाहिले जाते. व्यक्तीचे आयुष्य केवळ एक कला करता करता निघून जाते; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलेतून साधना होण्यासाठी आणि कलेतील विविधांगी अभ्यासासाठी अनेक पैलू उघडून दिले आहेत. हे केवळ एक अवतारी पुरुषच करू शकतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या कलांचा सर्वांगाने अभ्यास करणे शक्य होत आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी या कलांच्या अभ्यासासाठी आम्हा साधकांची निवड केली आणि आमची क्षमता नसतांनाही तेच आमच्याकडून करूनही घेत आहेत, यासाठी त्यांच्या चरणी अनन्य भावे कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे.
(समाप्त)
– सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४८ वर्षे), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.४.२०२६)
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !