आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी हा या पिढीतील एक आहे !

‘निज ज्येष्ठ अमावास्या (१४.७.२०२६) या दिवशी कु. समीहन (कान्हा) कुलकर्णी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. समीहन कुलकर्णी

कु. समीहन (कान्हा) कुलकर्णी याला सातव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष २०२३ मध्ये ‘कु. समीहन संदीप कुलकर्णी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२६ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५८ टक्के झाली आहे. ‘त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव’ यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१४.७.२०२६)

१. समंजस

‘कु. समीहन (कान्हा) त्याच्या सर्व मित्रांना समजून घेऊन खेळतो. माझे रामनाथी आश्रमात शिबिरासाठी जायचे ठरल्यावर त्याने मला सांगितले, ‘‘तू आश्रमात जा. मी घरी व्यवस्थित राहीन.’’ तेव्हा मला त्याचे कौतुक वाटले.

२. गायीविषयी प्रेम

त्याला गाय पुष्कळ आवडते. ‘आपण गाय घेऊया का ?’, असे तो सतत विचारतो.

३. सात्त्विक आहाराची आवड

त्याला दूध, लोणी, ताक हे पदार्थ पुष्कळ आवडतात.

४. धर्माभिमानी

तो प्रतिदिन शाळेत जातांना कपाळावर टिळा लावतो. एकदा आम्ही त्याला ‘छावा’ हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट दाखवला. हा चित्रपट पाहिल्यापासून तो सांगतो, ‘‘मला छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रमाणे बनायचे आहे.’’

५. त्याचे शिक्षक सांगतात, ‘‘समीहनकडे पाहून चांगले वाटते. तो नेहमी आनंदी असतो आणि इतरांनाही आनंद देतो.’’

६. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

त्याला ‘नामजप करूनच खेळायला जायचे’, असे सांगितल्यापासून तो नामजप पूर्ण करूनच खेळायला जातो. तो त्याच्या व्यष्टी साधनेचा आढावा देऊ लागल्यापासून प्रतिदिन रात्री स्वतःची चूक सांगून क्षमायाचना करतो. वर्ष २०२६ मध्ये महाशिवरात्रीच्या निमित्त माझ्याकडे प्रदर्शन कक्षाची सेवा होती. समीहन प्रदर्शन कक्षावर आल्यावर त्याने ‘कोणता नामजप करायचा’, असे मला विचारले.


संतांना जाणवलेली कु. समीहन संदीप कुलकर्णी याची गुणवैशिष्ट्ये !

पू. (सौ.) मनीषा पाठक

१. पू. (सौ.) मनीषा पाठक(सनातनच्या १२३ व्या संत, वय ४४ वर्षे), पुणे

अ. ‘कु. समीहन (कान्हा) आनंदी आणि उत्साही आहे.

आ. कान्हाची आई सेवेला गेल्यावर तो त्याच्या मोठ्या बहिणीसह घरी व्यवस्थित रहातो.

इ. पूर्वी कान्हाचा स्वभाव पुष्कळ चंचल होता. तो आईच्या समवेत सत्संगाला आल्यावर इकडे तिकडे फिरायचा किंवा खेळायचा. आता तो आधीच्या तुलनेत पुष्कळ शांत झाला आहे. आता तो सत्संगाला आल्यावर एके ठिकाणी बसून अभ्यास करतो, चित्रे काढतो आणि नामजप करतो.

ई. कान्हा दैवी बालकांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याला नियमित जोडतो आणि स्वतःचा आढावा उत्साहाने अन् प्रामाणिकपणे देतो. कान्हा व्यष्टी साधनेचा आढावा नियमित देत असल्यामुळे त्याच्यामध्ये सकारात्मक पालट जाणवत आहेत.’

(पू.) सौ. संगीता पाटील

२. पू. (सौ.) संगीता पाटील

(सनातनच्या ८५ व्या संत, वय ६७ वर्षे), पुणे

अ. ‘कान्हा सात्त्विक आहे.

आ. तो लहान असला, तरीही त्याचे विचार मोठ्या माणसासारखे आहेत.

इ. तो आपल्या सभोवती असल्यावर पुष्कळ चैतन्य जाणवते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २३.५.२०२६)

७. संत आणि गुरुदेव यांच्याप्रती भाव

अ. वर्ष २०२४ मध्ये आम्ही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हा त्याला एका संतांचे दर्शन झाले. आम्ही आश्रमात जाऊन आल्यापासून त्याच्यातील गुरुदेवांप्रतीचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा) भाव वृद्धींगत झाला आहे. तो आम्हाला विचारतो, ‘‘मला गुरुदेवांचे दर्शन होईल का ? मला त्यांना भेटायचे आहे. त्यांना भ्रमणभाष लावून देशील का ?’’

आ. जानेवारी २०२६ मध्ये मला साधना सत्संगाच्या शिबिरासाठी रामनाथी आश्रमात जायचे होते. तेव्हा त्याने मला विचारले, ‘‘मी (समीहन) प्रतिदिन नामजप आणि प्रार्थना करत आहे’, असे गुरुदेवांना सांगशील का ? त्यांच्याकडून मला चॉकलेट घेऊन येशील का ?’’

इ. मला कधी शारीरिक त्रास होत असल्यास तो म्हणतो, ‘‘गुरुदेवांना सांग. तुला बरे वाटेल.’’

ई. पू. (सौ.) संगीता पाटील यांच्याशी (सनातनच्या ८५व्या संत, वय ६७ वर्षे यांच्याशी) भ्रमणभाषवर बोलतांना तो त्यांना ‘तुमची प्रकृती कशी आहे ?’, असे विचारतो. समीहन त्यांना सांगतो, ‘‘आपण सगळे गुरुदेवांना भेटायला जातांना मी तुम्हाला गाडीतून घेऊन जाईन.’’

८. कान्हाच्या समवेत असतांना ‘माझ्या आनंदात वाढ होते’, असे मला वाटते.

‘हे गुरुमाऊली, माझी साधना होण्यासाठी कु. समीहनच्या माध्यमातून तुम्हीच मला साहाय्य करता’, त्याबद्दल मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे. ‘तुम्हीच आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना करून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. सई संदीप कुलकर्णी (कु. समीहनची आई), भोसरी, पुणे. (२३.५.२०२६)


बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.