संपादकीय : गोहत्या आणि सर्वाेच्च न्यायालय !

 

‘गावो विश्वस्य मातर: ।’ (गाय ही विश्वाची माता आहे), असे आपल्या ऋषिमुनींनी अनादी काळापासून सांगितले आहे; मात्र दुर्दैवाने ज्या देशात गायीला देवत्व बहाल केले गेले, त्याच देशात गेल्या अनेक दशकांपासून गोमातेच्या रक्ताचा सडा पडत आहे. ज्या देशात गाईच्या अंगात ३३ कोटी देवतांचा निवास मानला जातो, त्याच भूमीवर गेल्या ७ दशकांपासून ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) लोकशाहीच्या नावाखाली गोमातेच्या रक्ताच्या नद्या वहात आहेत. गोवंश हत्या रोखण्यासाठी अनेक राज्यांनी कायदे केले; पण गोतस्करांचा उद्दामपणा आणि कायद्यातील पळवाटा यांमुळे हा प्रश्न जटील बनला होता. अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालयाने गोहत्येच्या प्रकरणात ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ (रासुका) लावण्याचे केलेले समर्थन, हा धर्माभिमानी आणि गोभक्त यांच्यासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय ठरला आहे. गोहत्या हा केवळ गुन्हेगारी विषय नसून तो थेट भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी आणि हिंदु अस्मितेशी निगडित प्रश्न आहे.

कायद्याचा वचक हवाच !

आजवर गोतस्करीला केवळ एक छोटा गुन्हा समजून सोडून दिले जात होते. आरोपीला अटक व्हायची आणि २४ घंट्यांत जामीन मिळून तो पुन्हा पशूवधगृहासाठी गायींची चोरी करायला मोकळा व्हायचा; मात्र सर्वोच्च न्यायालयाने आता हे मान्य केले आहे की, ‘गोहत्या हा सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणणारा विषय आहे. जेव्हा एखादी गाय कापली जाते, तेव्हा केवळ एका प्राण्याचा जीव जात नाही, तर कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा स्फोट होतो, ज्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा स्थितीत, जर प्रशासन या गुन्हेगारांवर ‘रासुका’ लावत असेल, तर त्यात काहीही अयोग्य नाही.’ न्यायालयाचे हे विधान ‘पुरो(अधो)गामी’ आणि ‘मानवाधिकारवादी’ टोळीच्या थोबाडात लगावलेली चपराक आहे, जे गोतस्करांच्या अटकेवर गळे काढत असतात.

गोवंश हत्या : एक व्यापक राष्ट्रविघातक षड्यंत्र !

गोहत्या करणे, हा हिंदु समाजाला मानसिकरित्या गुलाम बनवण्याचा आणि त्यांच्या श्रद्धेचा अपमान करण्याचा एक मार्ग आहे. मोगल काळापासून ते आजपर्यंत, हिंदूंची मने तोडण्यासाठी गोमातेचा बळी दिला जात आहे. मोगलांच्या काळात केवळ मुसलमान उघडपणे गोहत्या करत होते. इंग्रजांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी देशात प्रथमच पशूवधगृहे चालू केली आणि आज देशात लाखो पशूवधगृहे आहेत अन् प्रतिदिन सहस्रो गोवंशियांची हत्या होत आहे. भारत गोवंशियांचे मांस निर्यात करण्यात जगात दुसर्‍या क्रमांकाचा देश ठरला आहे. गोहत्या रोखण्यासाठी अनेकांनी आंदोलने केली; मात्र त्यांना अपयशच आले. धर्मसम्राट प.पू. करपात्रीस्वामी यांनी इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या काळात साधू-संतांसह संसदेवर मोर्चा काढून गोहत्या बंदी करण्याची मागणी केली; मात्र गोहत्या बंदी करण्याऐवजी या मोर्चावर गोळीबार करण्यात आला आणि त्यासह अनेक साधू-संतांना ठार करण्यात आले. इतके होऊनही हिंदू निष्क्रीय राहिले. आजचे गोतस्कर हे केवळ गुन्हेगार रािहलेले नाहीत, तर ते संघटित आतंकवादी झाले आहेत. अवैधरित्या गोवंश वाहून नेणारा ट्रक पकडणार्‍या पोलिसांच्या अंगावर ट्रक घालणे, गोभक्तांवर गोळीबार करणे आणि गायींना वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या हत्या करणे, ही त्यांची नित्याची कार्यपद्धत झाली आहे. अशा प्रवृत्तींना सामान्य कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यांच्यासाठी ‘रासुका’सारख्या कठोर कायद्याचीच आवश्यकता होती, ज्यामुळे त्यांना किमान १ वर्ष जामीन मिळणार नाही आणि त्यांचे जाळे उद्ध्वस्त होईल. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि गोवंश हा भारतीय शेतीचा कणा आहे. देशी गायीचे महत्त्व केवळ दुधापुरते मर्यादित नसून तिचे शेण आणि गोमूत्र ही भारताच्या नैसर्गिक शेतीची अन् पर्यायाने अन्नसुरक्षेची गुरुकिल्ली आहे. पद्धतशीरपणे गोवंश नष्ट करून भारताला खते आणि बियाणे यांच्या संदर्भात परकीय आस्थापनांच्या दावणीला बांधण्याचे हे मोठे षड्यंत्र आहे. गोवंश रक्षण म्हणजेच भारताची आर्थिक स्वायत्तता टिकवणे होय ! अनेक अन्वेषणांतून हे सिद्ध झाले आहे की, गोतस्करीतून मिळणारा पैसा हा अमली पदार्थांचा व्यापार, शस्त्र तस्करी आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारख्या राष्ट्रविघातक कृत्यांसाठी वापरला जातो. गोतस्करी हे या सर्व काळ्या धंद्यांचे उगमस्थान आहे. त्यामुळे गोतस्करांवर ‘रासुका’ लावणे; म्हणजे पर्यायाने देशातील आतंकवादी कारवायांची रसद तोडण्यासारखे आहे.

मानवतावाद्यांचे ढोंग उघड !

जेव्हा एखाद्या गाय चोरणार्‍याला चोप मिळतो, तेव्हा संपूर्ण देशातील पुरो(अधो)गामी मिडिया (प्रसारमाध्यमे) आणि राजकीय पक्ष ‘मॉब लिंचिंग’चा (झुंडीने आक्रमण केल्याचा) टाहो फोडतात; मात्र जेव्हा तेच गोतस्कर पोलिसांना मारतात किंवा जिवंत गायींना अमानुषपणे ट्रकमध्ये कोंबतात, तेव्हा हे मानवतावादी ‘ब्र’ही काढत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने आता मार्ग मोकळा केला आहे; पण खरी कार्यवाही ही केंद्र आणि राज्य सरकार यांच्या हातात आहे. केवळ कायदे करून चालणार नाही, तर प्रत्येक जिल्हाधिकार्‍याने आणि पोलीस अधीक्षकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की, त्यांच्या कार्यक्षेत्रात एकही गोवंश चोरीला जाणार नाही. जर असे घडले, तर गुन्हेगारावर तात्काळ ‘रासुका’ लावून त्याची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे. तरच कायद्याचा दरारा निर्माण होईल.

गोरक्षकांचे मनोधैर्य वाढण्याची वेळ !

आजपर्यंत अनेक गोसेवकांनी त्यांच्या प्राणांची बाजी लावून गायींचे प्राण वाचवले आहेत. अनेकदा त्यांनाच पोलीस आणि राजकीय व्यवस्था यांचा त्रास सहन करावा लागला. आता समाजाने अधिक संघटित होऊन प्रशासनावर दबाव निर्माण केला पाहिजे की, गोतस्करांना कोणतीही राजकीय सवलत मिळू नये. गोवंश रक्षण हे केवळ एका धर्माचे काम नसून ते राष्ट्ररक्षण आहे. गोमातेच्या रक्षणानेच या राष्ट्राचे कल्याण होणार आहे. जोपर्यंत शेवटचे पशूवधगृह बंद होत नाही आणि शेवटचा गोतस्कर कारागृहात सडत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहिला पाहिजे. अनेक राज्यांत आता गोहत्या बंदी कायदा करण्यात आला असला, तरी संपूर्ण देशासाठी तसा कायदा नसल्याने आजही ईशान्य भारतात गोहत्या करून गोमांस भक्षण केले जाते. गोव्यातही हेच चित्र आहे. देशातील अल्पसंख्यांक ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यासाठी बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून प्रतिदिन गोहत्या केल्या जातात अन् हिंदू काहीच करत नाहीत. हिंदूंची सरकारेही कठोर कृती करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद आहे. ही स्थिती केवळ हिंदु राष्ट्र स्थापन झाले, तरच पालटू शकत असल्याने गोरक्षकांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

संपूर्ण गोहत्या बंदीसाठी देशात हिंदु राष्ट्र आणण्याला पर्याय नाही !