Lenskart Say Sorry : ‘लेन्सकार्ट’कडून क्षमायाचना !

  • देशभरातील हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम

  • नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कर्मचार्‍यांना धार्मिक प्रतीके वापरण्याची अनुमती !

नवी देहली – लेन्सकार्ट या चष्म्यांच्या किरकोळ विक्री करणार्‍या आस्थापनाने अंततः क्षमा मागितली आहे. या आस्थापनाने हिंदु कर्मचार्‍यांना धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीके वापरण्यास बंदी घातली होती, तर मुसलमानांना त्यासाठी अनुमती देण्यात आली होती.

यावरून संपूर्ण देशातून विरोध झाल्यानंतर आता आस्थापनाने क्षमा मागितली. तसेच आता हिंदु कर्मचार्‍यांना प्रतीके वापरण्याची अनुमती देण्याचीही घोषणा केली.

आस्थापनाने ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. ग्राहक आणि समाज यांच्या चिंता दूर करण्यासाठी आम्ही आमची मार्गदर्शक तत्त्वे सार्वजनिक अन् पारदर्शक करत आहेत. नव्या धोरणात कर्मचार्‍यांना श्रद्धेशी संबंधित सर्व प्रतीके जसे की बिंदी, टिळा, कुंकू, मनगटावरील दोरा, मंगळसूत्र, कडा, हिजाब आणि पगडी स्वीकारण्यात आली आहेत. जर आमच्या कार्यस्थळाशी संबंधित कोणत्याही संवादामुळे कुणी दुखावले असेल किंवा त्यांच्या श्रद्धेला येथे स्वीकारले गेले नाही, असे वाटले असेल, तर आम्हाला याविषयी मनापासून खेद आहे. ही लेन्सकार्टची ओळख नाही आणि कधीही असणार नाही.

‘लेन्सकार्ट’च्या शेअरमध्ये ५ टक्क्यांची घसरण

लेन्सकार्टचा ‘आयपीओ’ वादाच्या घटनेपूर्वी ५३४ रुपयांवर होता; मात्र वरील वाद समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने लेन्सकार्टच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांची घसरण झाली. सामाजिक माध्यमांवरील आर्थिक बहिष्काराच्या आवाहनाचा परिणाम आस्थापनाच्या विक्रीवर आणि ‘ब्रँड व्हॅल्यू’वर होईल, या भीतीने गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले.

२. निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, या आस्थापनाच्या २ सहस्र ४०० हून अधिक शाखा अशा लोकांकडून चालवल्या जातात, जे त्यांच्या श्रद्धा आणि परंपरा यांसह काम करतात. लेन्सकार्ट भारतात निर्माण झालेले, भारतियांनी आणि भारतियांसाठी चालवलेले आस्थापन  आहे. भविष्यात आमची प्रत्येक धोरणे, प्रशिक्षण साहित्य आणि संवाद समावेशक मूल्ये दर्शवतील आणि ती ग्राहकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहातील.

संपादकीय भूमिका

‘नाक दाबले की तोंड उघडते’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मद्रोही आणि धर्मांध यांच्यावर आर्थिक बहिष्काराचे अस्त्र उगारल्याविना ते ताळ्यावर येणार नाहीत, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे, हेच या घटनेतून शिकले पाहिजे !