कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आणि पारंपरिक ज्योतिषशास्त्र यांतील भेद !

सध्या कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे सर्वच क्षेत्रांमध्ये झपाट्याने पालट होत चालला आहे. बर्‍याच क्षेत्रांमध्ये मनुष्याचे काम कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे व्हायला लागल्याने बर्‍याच जणांच्या नोकर्‍या त्यामुळे धोक्यात आल्या. इतर सर्वच क्षेत्रांप्रमाणे गेल्या काही दिवसांत या कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे ज्योतिष सांगणारी बरीच ‘ॲप्स’ बाजारपेठेत आली आहेत. सामाजिक माध्यमांमध्ये याविषयी बरीच विज्ञापने पहायला मिळाली. त्यात ‘एखाद्या ज्योतिषाला पैसे देऊन भविष्य जाणून घेण्यापेक्षा ‘एआय’द्वारे अचूक भविष्य जाणून घ्या !’ एका विज्ञापनात तर सांगितले गेले आहे, ‘ज्योतिषी तुम्हाला फसवतात, तुम्हाला त्यांच्या बोलण्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात; पण ‘एआय’ तसे करणार नाही. तो तुम्हाला तुमचे भविष्य अचूक सांगू शकेल.’

या विज्ञापनांचा उद्देश ‘लोकांना ज्योतिषशास्त्राचे महत्त्व कळणे, यापेक्षा ग्राहकांना आकर्षित करण्याचा आहे’, हे या विज्ञापनांवरून स्पष्ट लक्षात येते. ‘केवळ दिनांक सांगा आणि स्वतःचे भविष्य समजून घ्या’, अशा भंपक विज्ञापनेही पहायला मिळतात. यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री आणि प्रसिद्ध व्यक्ती यांच्या माध्यमातून विज्ञापने केली जातात. इथे एक भाग लक्षात घेणे आवश्यक आहे की, ‘ज्योतिषी तुम्हाला फसवतात’, असे या विज्ञापनांच्या माध्यमातून सांगणारे स्वत: मात्र या ‘ॲप्स’च्या माध्यमातून एकप्रकारे लोकांची फसवणूकच करत असतात. बहुतांश जणांचा उद्देश ‘व्यक्तीच्या अडचणी सुटून तिला आनंदी जीवन जगता यावे’, यापेक्षा ‘या व्यवसायाच्या माध्यमातून अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करून अर्थकारण साधण्याकडे आहे’, असे लक्षात येते.

१. पारंपरिक ज्योतिषशास्त्राचे महत्त्व

आपल्या शास्त्रामध्ये ज्योतिषी कसा असावा ? याविषयी सांगितले आहे. ज्योतिषी हा देश, काल, परिस्थिती यांचे भान असणारा आणि त्यानुसार मार्गदर्शन करणारा असायला हवा. त्याने कुंडली पाहून व्यक्तीला केवळ समस्या न सांगता त्यावर त्याच्या क्षमतेनुसार योग्य तो उपाय आणि उपासना सांगून मार्गदर्शन करणे आवश्यक असते.

श्री. श्रेयस पिसोळकर

याप्रकारे व्यक्तीला साहाय्य करतांना त्याला जीवनात समस्यांमधून बाहेर काढून पुढे घेऊन जाणे अपेक्षित असते. यासाठी ज्योतिषाची स्वत:ची साधना असणेही आवश्यक असते. ज्योतिष्याचे स्वत:चे आचरण शुद्ध असणे महत्त्वाचे आहे. व्यक्तीला मार्गदर्शन करतांना षड्रिपूंच्या आहारी न जाता तत्त्वनिष्ठपणे मार्गदर्शन करणे आवश्यक असते. ज्योतिषी ईश्वरनिष्ठ आणि धर्मनिष्ठ असला पाहिजे, तसेच तो जितेंद्रिय (सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला) असला पाहिजे. ज्योतिषशास्त्र हे केवळ बुद्धीने अभ्यास करण्याचे नाही, तर ‘व्यक्तीला कोणत्या उपायाने लाभ होऊ शकतो’, याचा विचार करून ‘अंत:प्रेरणेने उपाय सांगायचे’, असे आहे. यासाठी भगवंताला प्रार्थना करून व्यक्तीला उपाय सांगितल्यास त्याद्वारे त्याची समस्या निराकरण होण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. हे केवळ गुरूंकडून ज्योतिषशास्त्र शिकलेल्या आणि त्यांच्या अनुभवातून सिद्ध झालेल्या ज्योतिषांच्या माध्यमातूनच शक्य होऊ शकते.

२. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे ज्योतिषी नव्हे, तर केवळ गणकयंत्र !

सध्या कुंडली सिद्ध करणे, स्पष्ट ग्रह काढणे, यांसाठी बरेच ज्योतिषी संगणकीय प्रणालीचा (‘सॉफ्टवेअर’चा) वापर करतात. त्या माध्यमातून गणिते न्यून वेळेत होतात आणि वेळ वाचतो, तसेच लगेच कुंडली सिद्ध करता येते; पण पारंपरिक गणिताच्या माध्यमातूनही या सर्व गोष्टी करण्याचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. सध्या ‘कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे कुंडलीचे फळ आणि उपाय सांगणे, व्यक्तीच्या जीवनात कोणती गोष्ट कधी घडणार ?’, इत्यादी गोष्टी काही ‘ॲप्स’च्या माध्यमातून सांगणे चालू झाले आहे. यामध्ये अगोदरच कृत्रिम बुद्धीमत्तेला जी माहिती पुरवली जाते, केवळ त्याद्वारेच तो मार्गदर्शन करू शकतो; परंतु वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्योतिष्याला स्थळ, काळ, परिस्थिती यांचे आणि व्यक्तीच्या परिस्थितीचे भान असणे महत्त्वाचे असते ते कुठून येणार ? सरसकट सर्वांनाच तो त्याला (‘एआय’ला) शिकवलेले उपाय सांगत जाणार ! त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केवळ गणकयंत्र म्हणून गणिते करण्यापर्यंत आपण ग्राह्य धरू शकतो; परंतु कुंडलीचे फल कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे जाणून घेणे, हे दिशाभूल करणारे आणि तेवढे लाभदायक ठरेल, असे वाटत नाही, तसेच यात जो अंत:प्रेरणेचा भाग आहे, तो कुठेच नाही. त्यामुळे या कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे कळलेल्या कुंडलीच्या फलाचा स्वतःच्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांविषयी किती विचार करायचा, हे ज्याचे त्याने ठरवावे. वर सांगितलेल्यानुसार गुण असलेल्या ज्योतिषाकडून आपण मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे प्रयत्न केल्यास लाभ होणार, हे निश्चित !

३. ज्योतिषांना दक्षिणा देण्यामागील शास्त्र

शास्त्राने ज्योतिषांना जी दक्षिणा देण्यास सांगितले आहे, त्याचा उद्देश केवळ ‘ज्योतिष सांगणार्‍या व्यक्तीचे उदरभरण व्हावे’, हा एवढाच नसून ‘त्यांनी सांगितलेल्या उपायांचा लाभ पूर्णपणे व्हावा’, हा असतो, तसेच ज्योतिषाला दिलेल्या दक्षिणेच्या माध्यमातून व्यक्तीचा त्याग होऊन त्याला त्याचा लाभ होत असतो; पण केवळ बुद्धीने या शास्त्राचा अभ्यास करणार्‍यांना हा भाग लक्षात येणार नाही. ज्योतिषशास्त्र हे जरी विज्ञानाचा भाग असला, तरी विज्ञानाला अध्यात्माची जोड दिली, तरच त्याची दिशा योग्य रहाते. अन्यथा दिशाहीन वैज्ञानिक प्रगती ही मनुष्याला अधोगतीला नेऊन ठेवेल, यात शंका नाही.

४. पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणे महत्त्वाचे !

सध्या आपण तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. महायुद्धाच्या काळात आधुनिक साधनांची अनुपलब्धता असू शकते. अशा परिस्थितीमध्ये या शास्त्राचे आपल्याला जतन करायचे असेल, तर कोणत्याही आधुनिक माध्यमांवर अवलंबून नसणार्‍या पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा आधार घेणे आणि त्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

‘आपल्या ऋषिमुनींनी सिद्ध केलेल्या ज्योतिषशास्त्राचा योग्य लाभ घेण्याची बुद्धी सर्वांना होवो’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना !

– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (८.२.२०२६)

संपादकीय भूमिका

ज्योतिषशास्त्राला थोतांड म्हणणारे पुरोगामी ज्योतिष सांगणार्‍या ‘ॲप्स’च्या प्रचाराविषयी गप्प का ?