सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१ अ. ‘विज्ञानवाद्यांनो, विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होण्याची कारणे समजून घ्या !

१. विज्ञानाचा उद्देश केवळ ‘भौतिक ज्ञानासाठी विज्ञान’ असा असल्याने ‘ईश्वरप्राप्तीसाठी विज्ञान’ हे विज्ञानात येत नाही.

२. विज्ञानामुळे पूर्वी मानवाला विविध गोष्टी करण्यासाठी लागणारा वेळ वाचला, उदा. स्वयंपाक करणे, प्रवास, एकमेकांना संपर्क करणे, शेती करणे, विविध उत्पादने तयार करणे इत्यादींसाठी मानवाला पूर्वी बराच वेळ लागायचा. आता फारच अल्प काळात या गोष्टी करता येतात. यांमुळे ‘त्या वाचलेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग कसा करावा ?’, हे मात्र विज्ञानाने शिकवले नाही. कलियुगात मानवाची वृत्ती मुळातच तमप्रधान असल्यामुळे या रिकाम्या वेळेचा वापर मानव साधना, नीतीमत्ता इत्यादी शिकण्यासाठी न करता सुखप्राप्तीसाठी करत आहे. त्यामुळे तो मायेत अधिकाधिक अडकत आहे.

३. विज्ञानामुळे अहं वाढल्यामुळे दुसर्‍यावर स्वामित्व गाजवण्याचे विचार प्रबळ होत गेले. त्यामुळे दोन महायुद्धे झाली आणि तिसरे काही वर्षांतच होणार आहे.’ (१४.२.२०१४)

२. वरील विषयाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

श्री. राम होनप

२ अ. वाईट शक्तींच्या ‘आसुरी कलेचा’, अविष्कार म्हणजे विज्ञानातील नवनवीन घातक शोध लागणे आणि कोट्यवधी लोकांची ‘नैतिक, वैचारिक आणि आध्यात्मिक’ या स्तरांवर हानी होणे

काही वैज्ञानिकांमध्ये नवीन शोध लावण्याची क्षमता मुळातच असल्याने ते शोध लावतात. काही वैज्ञानिकांना मानवजातीला घातक असणारे काही शोध लावण्याच्या प्रक्रियेत वाईट शक्तींची साथ मिळते. चौथ्या पाताळात ‘येहू’ नावाची वाईट शक्ती आहे. तिला ‘आसुरी कलाशक्ती’ आत्मसात आहे. या आसुरी कलाशक्तीत ‘विज्ञानाशी निगडित असंख्य संकल्पना आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान’ आहे. असे सूक्ष्म ज्ञान ‘येहू’ ही वाईट शक्ती काही वैज्ञानिकांना देते. तेव्हा त्या वैज्ञानिकांना ‘वैज्ञानिक शोध लावण्याचे स्फुरण होत आहे’, अशी जाणीव होते. त्यानंतर वैज्ञानिक सुचलेली संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विविध प्रयोग करतो. तेव्हा ‘येहू’ ही वाईट शक्ती सूक्ष्मातून त्या वैज्ञानिकांना शोधाविषयी सतत पुढील मार्गदर्शन करते. ‘वैज्ञानिकाने मानवजातीला घातक असलेला हा शोध अचूक आणि अल्प वेळेत लावावा’, यासाठी ‘येहू’ ही वाईट शक्ती स्वतःची सर्व शक्ती पणाला लावून त्या वैज्ञानिकांना साहाय्य करत असते. त्या वैज्ञानिकाने एक शोध लावला, तरीही तो मानवजातीला घातक असल्याने त्यातून कोट्यवधी लोकांची ‘नैतिक, वैचारिक आणि आध्यात्मिक’ या स्तरांवर हानी होत असते. तेव्हा ‘येहू’ या वाईट शक्तीला सनातन धर्माची हानी केल्याविषयी समाधान वाटते.

२ आ. विज्ञानाद्वारे व्यक्तीचे मन आणि वातावरण अल्पावधीत दूषित होऊन व्यक्तीला साधना अन् धर्माचरण यांचा विसर पडणे

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा (भ्रमणभाष, माहितीजाल, दूरदर्शनसंच इत्यादींचा) उपयोग करतांना त्यांद्वारे व्यक्तीचे मन आणि वातावरण यांवर तमोगुणाचा प्रभाव पडतो. त्यामुळे व्यक्तीवर काळ्या शक्तीचे आवरण येऊन तिचे मन, तसेच तिच्या भोवतीचे वातावरण अल्प कालावधीतच दूषित होते. अशा व्यक्तीला साधना आणि धर्माचरण यांचा विसर पडतो. अशी व्यक्ती दिशाहीन बनते, तसेच तिचे जीवन विज्ञानातील अधिकाधिक सुख उपभोगण्यात व्यर्थ जाते.

२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वैश्विक अशांतीचे मूळ कारण शोधून त्यावर मार्गदर्शन करणे

सध्याच्या प्रतिकूल काळात ‘समाजाची अधोगती का होत आहे आणि त्यावर उपाय काय ?’, हे बहुतेकांना समजणे कठीण आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य असल्यामुळे त्यांनी ‘कलियुगाचा प्रभाव आणि वाईट शक्तींचे प्राबल्य यांमुळे समाज विज्ञानाच्या आहारी जात आहे’, हे अंतर्ज्ञानाने जाणले. ‘समाजाची अधोगती रोखावी आणि लोकांना चिरंतन आनंदाची प्राप्ती व्हावी’, तसेच ‘वैश्विक अशांती दूर व्हावी’, यांसाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सर्वांना ‘विज्ञानामुळे होणारी हानी आणि साधनेचे महत्त्व’, समजावून सांगत आहेत.

२ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे अंतर्ज्ञान आणि द्रष्टेपण !

विज्ञानामुळे व्यक्तीची अधिकाधिक सुख उपभोगण्याची वृत्ती बनली आहे. त्यामुळे व्यक्ती संकुचित, स्वार्थी आणि अहंयुक्त बनली आहे. व्यक्तीतील अहं वाढल्यामुळे तिचे ‘इतरांवर अधिकार गाजवणे, इतरांना न्यून लेखणे आणि त्यांना नामशेष करणे ’, असे वर्तन घडू लागले आहे. परिणामी विविध राष्ट्रांमधील ‘संघर्ष, स्पर्धा आणि अशांती’ ही वाढली आहे. ही परिस्थिती तिसर्‍या महायुद्धाला पूरक आहे. या महायुद्धामुळे पृथ्वीवर भयंकर विनाश होणार आहे. हे सर्व सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी अंतर्ज्ञानाने जाणले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी लिखाणाद्वारे ‘विज्ञानामुळे होणारी हानी आणि साधनेची अपरिहार्यता’, समाजाला समजावून सांगितली आहे. यात त्यांचे द्रष्टेपणही आहे.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २६.५.२०२६, वेळ : सकाळी ११.३०, कालावधी : ३० सेकंद)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.