भारत-पाकिस्तान यांच्यात अणूयुद्धाचा धोका कायम ! – US Intelligence Report

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुख तुलसी गॅबर्ड

वॉशिंग्टन (वॉशिंग्टन) – अमेरिकेच्या ‘सिनेट’मध्ये (संसदेच्या वरिष्ठ सभागृहात) सादर करण्यात आलेल्या अमेरिकी गुप्तचर समुदायाच्या ३४ पानांच्या ‘वार्षिक धोका मूल्यांकन’ अहवालानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधात अणूयुद्धाचा धोका कायम आहे; कारण भूतकाळात जेव्हाही हे दोन्ही अणूशस्त्रधारी देश समोरासमोर आले आहेत, तेव्हा तणाव वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. जरी भारत आणि पाकिस्तान उघडपणे युद्ध इच्छित नसले, तरी अशा घटना घडत आहेत, ज्यात आतंकवादी घटक सतत संकट निर्माण करणारी परिस्थिती निर्माण करू शकतात. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळ झालेल्या आतंकवादी आक्रमणाने हे दाखवून दिले होते की, आतंकवादी आक्रमणे युद्धाची ठिणगी पेटवू शकतात. राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे अलीकडील अणू-तणाव अल्प झाला होता.

पाकिस्तानी क्षेपणास्त्रांमुळे अमेरिकेला धोका ! – तुलसी गॅबर्ड, अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख

येत्या काळात जगात धोकादायक क्षेपणास्त्रांची संख्या पुष्कळ वेगाने वाढू शकते. पाकिस्तान अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करत आहे, जी भविष्यात अमेरिकेवर आक्रमण करू शकतात, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुख तुलसी गॅबर्ड यांनी वॉशिंग्टनमधील खासदार आणि अधिकारी यांच्या एका बैठकीत दिली.

अमेरिकेवर आक्रमण करू शकणारी ३ सहस्र क्षेपणास्त्रे

गॅबर्ड यांनी सांगितले की, ‘इंटेलिजन्स कम्युनिटी’चा अंदाज आहे की, सध्या अनुमाने ३ सहस्र क्षेपणास्त्रे अशी आहेत, ज्यांची अमेरिकेवर आक्रमण करण्याची क्षमता आहे; परंतु वर्ष २०३५ पर्यंत ही संख्या १६ सहस्रांपेक्षा अधिक होऊ शकते. रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तान यांसारखे देश नवीन क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि शस्त्रे विकसित करत आहेत. पाकिस्तान अशी आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करू शकतो, जी अतिशय दूरपर्यंत मारा करू शकतात, तर इराणही वर्ष २०३५ पूर्वी असे क्षेपणास्त्र विकसित करू शकतो.

रशिया आणि चीन अमेरिकेची क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली भेदू शकतात !

गॅबर्ड यांनी सांगितले की, चीन आणि रशिया असे प्रगत तंत्रज्ञान विकसित करत आहेत, जे अमेरिकेच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला भेदू शकतात.

गॅबर्ड यांच्या उत्तरामुळे खासदार संतापले

या बैठकीच्या वेळी व्हर्जिनियाचे खासदार मार्क वॉर्नर यांनी गॅबर्ड यांना विचारले, ‘तुम्ही ट्रम्प यांना सल्ला दिला होता का की, जर इराणला लक्ष्य बनवले गेले, तर तो आखाती देशांवर आक्रमण करेल आणि हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करेल ?’ या प्रश्नाचे गॅबर्ड यांनी थेट उत्तर दिले नाही. त्या म्हणाल्या की, मी अंतर्गत संवादाचा खुलासा केलेला नाही आणि करणारही नाही. मी हे सांगू इच्छिते की, गुप्तचर समुदायातील आम्ही सर्व जण राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या निर्णयात साहाय्य करण्यासाठी उपलब्ध असलेली सर्वोत्कृष्ट वस्तूनिष्ठ गुप्त माहिती प्रदान करत असतो.

संपादकीय भूमिका

भारत आणि पाक दोन्हीही अण्वस्त्रधारी देश असल्याने त्यांच्यातील तणावामध्ये अणूयुद्धाचा धोका नेहमीच रहाणार आहे. त्यातही अमेरिका पाकला सर्व प्रकारचे साहाय्य करत असल्याने हा धोका भारतासाठीच अधिक असल्याचे दिसून येतो. यावर अमेरिका का बोलत नाही ?