गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, ४ जून (वार्ता.) – राज्यात वर्ष २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून शाळांचे शैक्षणिक वर्ष पूर्वीप्रमाणे जूनपासून करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘एप्रिल मासात वाढते तापमान आणि इतर कारणे यांमुळे विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती लक्षणीयरित्या घटत असल्याची गोष्ट मुख्याध्यापक संघटनेने निदर्शनास आणून दिली आहे. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा विचार चालू आहे. संबंधितांसमवेत बैठक झाल्यानंतर यासंबंधीचा प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात येणार आहे.’’

‘ब्रिज अभ्यासक्रम’ आणि तासिका पूर्ण करणे, हे आव्हान

राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाच्या संचालक मेघना शेटगावकर म्हणाल्या, ‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’च्या कार्यवाहीसाठी ‘ब्रिज अभ्यासक्रम’ आवश्यक आहे आणि तो एप्रिल मासात पूर्ण केला जात आहे. त्यामुळे जूनपासून शाळा चालू करण्यासाठी वर्षाचे आवश्यक शैक्षणिक तास कशा प्रकारे पूर्ण करता येतील याचा अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासाच्या अंतीच योग्य निर्णय घेतला जाणार आहे.’’