पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !

(रील्स म्हणजे छोटा व्हिडिओ, जो इन्स्टाग्रामवर प्रसारित केला जातो.)

अहिल्यानगर – पाकिस्तानशी संबंधित सामाजिक माध्यमांवर ‘रील्स’ पहाणे आणि त्यावर आक्षेपार्ह स्वरूपाच्या प्रतिक्रिया नोंदवल्याच्या संशयावरून महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात चौकशी मोहीम चालू केली. अहिल्यानगर, मुंबई, नाशिक आणि धुळे येथील ए.टी.एस्. पथकाने संयुक्त कारवाई केली असून ४ तरुणांच्या सामाजिक माध्यम व्यवहारांचे अन्वेषण चालू करण्यात आले, तसेच त्यांना नोटीसही बजावण्यात आली.

संबंधित तरुणांच्या सामाजिक माध्यम खात्यांचा तपशील, त्यांनी पाहिलेला आणि प्रसारित केलेला मजकूर, तसेच त्यांच्या ऑनलाईन व्यवहारांची पडताळणी केली जात आहे. डिजिटल उपकरणांमधील माहिती आणि सामाजिक माध्यमांवरील हालचालींचीही पडताळणी चालू आहे. ही कारवाई केवळ श्रीरामपूर शहरापुरती मर्यादित नसून तालुक्यातील काही ग्रामीण भागांतही चौकशी चालू आहे. काही व्यक्तींकडून आवश्यक कागदपत्रे आणि डिजिटल माहिती मागवण्यात आली असून त्याचे विश्लेषण केले जात आहे.